आई जगदंबे

कृपावंत जगदंबेच्या अंतरंगी वसलेली दया-माया महानवमी माळेत जीव ओतते. आई भक्ताला पावते. दैत्याबरोबर नऊ दिवस नऊ रात्रींचा केलेला जागर, संघर्ष म्हणजे वाईट वृत्तीचा संहार. अहंकाराला दिलेला अग्नी. विनाशकारी दृष्ट शक्ती लोप पावल्यानंतर कृतार्थ नजरेने लेकराला पाहणारी माता जगदंबा, तीचा विजय असो. हे देवी तुझ्या रूपातील भव्यदिव्य तेजाने डोळ्यांचे पारणे फिटते. माया ममतेची खाण आहेस तू. तारणहार आहेस तू. विकृतीने पछाडलेल्यांचा विनाश करणाऱ्या अंबाबाईचा ऊदो ऊदो.. तुझ्या चरणी माथा नमिताना संकटहरणी तुझे गुणगान गातो आम्ही. तल्लीन होत भजनात रंगतो. ‘आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, ऊदे ग् अंबाबाई, आई ऊदे ग् अंबाबाई.’ जनहित कल्याणकारीणी सोहळा देवयानी सिद्धिदात्रीचा...उत्क्रांतीचा सूर्य उगवता, सण आला आनंदाचा.. तारांगणातील अभूतपूर्व अशा महानवमीच्या आनंदाला झेंडू फुलांची माळ महिषासूरमर्दिनीला समर्पित करतो. यावेळी मनात तृप्तीचे भाव येतात. दुर्गादेवीद्वारा महिषासुराचा वध म्हणजे विघ्नावर विजयाची पताका. दैवी चमत्कारात स्थिरावलेली चिरकाल आदिशक्ती महिषासूरमर्दिनी देवी महालक्ष्मी. महात्म्याच्या अंकुशाची प्रमुख देवी असलेल्या वैश्विक रूपातल्या शक्तीचा उत्सव साजरा होतोय.


महिषासूर वधासाठी देवीचे प्रगटीकरण म्हणजे सर्व देवतांचे तेजोमय मंडळ एकत्रित येणे. विरता आणि साहसी वृत्ती देवीशक्तीत सामावल्या आहेत. ‘या देवी सर्व भूतेषू शक्तीरुपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:’ हे देववचन स्त्री वर्गाने सिद्ध करून दाखवलय. निसर्गाने स्त्रीला अद्भुत शक्ती देऊ केलीय, ज्यामुळे ती कोणत्याही संकटाशी दोन हात करू शकते. स्त्री शक्तीला देवी-देवतांचा आशीष असल्याने त्यांचा परीपूर्ण भाव तिच्यात उतरतो. महाकाय, प्रबळ, शूर, चाणाक्ष, प्रेमळ, दयावंत, कृपावंत असे दैवी गुण तिच्यात येतात. माझ्या मनात तीची रूपं साकार होऊ लागतात.. ‘ती तेवत राहील जोवर, तोवर आत्मभानाची ज्योत पेटवत ठेवू अवती भवती.. नाहिसा होईस्तोवर अंधकार. गळून पडतील शस्त्र... धुवून निघतील मनं, कात टाकतील जुन्या भिंती, खपल्या धरतील जखमेवर, विजय होईल सत्याचा जेव्हा लाचार होईल असत्य. संस्कृती सदाचाराशी पडेल गाठ. अपयशाची असेल ती खुणगाठ मशाली पेटतील, पेटवतील वात. दशदिशातून वाजतील नगारे. येतील सनईचे सूर. स्वागत होईल नवविचारांचे. प्रकाशाच्या वाटेत उभी असेल ती दिशादर्शकासारखी. ताई, माई आणि प्रेयसीच्या भूमिकेत सरेल बाईपण तेव्हा वंदन करतील पुरुषपण.


कुठल्यातरी गावात, शहरात, चौकात घंटा नाद होत असेल. गोंधळी ताल धरून नाचतील, नाद घुमेल. ‘नाचत ये अंबे नाचत ये फुलांचा शेला झेलीत ये, पायीचे पैंजण वाजवित ये, भक्तांच्या हाकेला धावत ये, अंबे भक्तांच्या हाकेला धावत ये.! गजर, गोंधळ, जागरणात तीची प्रतिमा आकारू लागेल.


भवानी आईच्या रंगरूपाशी निगडित स्त्री वर्ग म्हणजे... ‘अबला नहीं सबला है तू, नारी नहीं चिंगारी है तू.’ स्त्री शक्ती निर्माणाचे केंद्र आहे. माणूस म्हणून जगताना, हक्क बजावताना स्वयंसिद्धेला नवे मार्ग स्वीकारावे लागतील. धाडस, चातुर्य, त्याग, श्रद्धा, सृजन, कष्टाळू वृत्ती याची कर्तिधर्ति ती स्वतः आहे. तिच्या अंगोपांगी असलेल्या विविधांगी गुणांमुळे ‘सूपरवूमन’ म्हणून ती आज वावरतेय. स्त्री म्हणजे अशी व्यक्ती जी आंनद शोधून तुम्हाला जगवते. वादळ स्वतःच्या अंगावर घेते. तिच्याशिवाय आपले अस्तित्व नाही. स्त्री म्हणजे प्रेमाचा झरा आणि सहनशक्तीचं टोक. दुःख घेऊनही माफ करण्याची समज फक्त स्त्रीकडेचं असते. जेव्हा भगवान स्त्रीला या सृष्टीवर आकार देत होते, तेव्हा नारदांनी प्रश्न केला. ‘देवा, आपण जी रचना करत आहात, एक स्त्री म्हणून ज्याला आकार देत आहात, ती शरीर आणि मनाने कोमल आहे. समाजात वावरताना येणाऱ्या संकटांशी ती मुकाबला करू शकेल का.? तेव्हा भगवान म्हणाले. अरे, तू जिला कमजोर मानतोस , ती आतून अत्यंत खंबीर आहे. मी असा जीव बनवला आहे जो कणखर आणि सोशिक आहे. तो इतरांना सांभाळेल. नेतृत्वात तारणकर्ता ठरेल. ताकदवान पुरुष हिच्या पोटी जन्म घेतील. अशी ही किमयागार अश्विन मासी देवरूपात प्रगटेल.


दुर्गाचे वर्णन मूळ शक्ती, प्रबळ स्वभाव, सद्गुण योगमय, बुद्धीची आई आणि विकारांपासून मुक्त असे केले आहे. तिला राक्षसांपासून संरक्षक, उपकारकर्ता मानले जाते. देवी शांती, समृद्धी बहाल करत धर्मावर हल्ला करणाऱ्या आसुरी शक्तींचा नाश करते. सिंहावर स्वार झालेली देवीमाता समस्त स्त्री वर्गाचे प्रतिनिधित्व करते. दुर्गेला आठ हात आहेत. हातात एकेक शस्त्र आहे. आई जगदंबाने सर्वोत्तम पुरुषांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे. आदिमशक्ती आईकडून जग चालवले जाते. तिच्यासारखे दुसरे अविनाशी रूप नाही. माता दुर्गेची शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी रूपे आहेत जिचे वर्णन ‘देवीकवच’
स्तोत्रात आढळते.


‘अयि गिरि नन्दिनी नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवर विन्ध्यशिरोधिनिवासिनी विष्णुविलासिनि जिष्णुनुते.’ देवी दुर्गेला समर्पित शक्तिशाली महिषासूरमर्दिनी स्तोत्र महिषासुरावर विजय साजरा करत. स्तोत्र पठणाने भक्त मार्गातील अडथळे दूर होतात. नकारात्मक ऊर्जा, प्रभाव आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होते. शौर्य सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या शक्तिशाली भजनातून आईचा आशीर्वाद मिळतो. स्तोत्र पठण भक्तांसाठी देवीवरील भक्ती आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. प्रेम-वात्सल्यसिंधू आशीर्वाद देण्यास उभ्या असलेल्या आईला कोटी कोटी वंदन.


-पूजा काळे



Comments
Add Comment

ग्रंथ हेच गुरू

वैभववाडी : मंदार सदाशिव चोरगे ग्रंथ कोंडून ठेवू नका, कपाटात सुरक्षित... जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र

लढाऊ रेवती

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे राजेशाही आयुष्य पाहिल्यानंतर सामान्य जीवन जगण्यास आले तर कोणीही आपल्या नशिबाला दोष

व्यक्तिमत्त्व विकास

मोरपिस : पूजा काळे व्यक्तिमत्त्व विकासाच्या टप्प्यात साहित्याच्या योगदानाचा विषय महत्त्वाचा ठरतो. भाषा

अनुवादातून संवाद

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर अनुवाद हा विषय भाषिक आदान-प्रदानाशी अत्यंत जवळचा विषय आहे. भारत हा या अर्थाने अतिशय

वृद्धांचा सन्मान आणि सुरक्षितता

माध्यमांनी वृद्धांचे सकारात्मक योगदान आणि त्यांचे अनुभव प्रदर्शित करून समाजातील वृद्धांविषयीचे नकारात्मक

चव, चिकाटी आणि चैतन्याचा स्वाद

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवी अन्नपूर्णा हे त्या शक्तीचं एक रूप. अन्न देणं,