कंदिलाची काच ज्या रंगाची असते, तशा रंगाची ज्योत आत आहे असे लोकांना वाटते. तसेच आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती येतात त्या व्यक्तींच्या अनुभवावरूनच त्या व्यक्ती ज्या संस्थेचे सदस्य आहेत, त्या संस्थेविषयी लोक आपले मत बनवत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ऐकून सर्वांना माहीत असते; परंतु त्या संघटनेविषयीचे आपले मत लोकं त्यांना संघ स्वयंसेवकांचा जो अनुभव येतो त्याआधारे ठरवत असतात -
श्रीपती शास्त्री हे पुण्यातील संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते. कन्याकुमारीला विवेकानंद शिलास्मारक उभे करण्याचा एक मोठा उपक्रम संघ कार्यकर्त्यांनी हाती घेतला होता. या उपक्रमासाठी प्रत्येक प्रांतात एक समिती तयार करावी असे ठरले. महाराष्ट्र प्रांतामध्ये या समितीचे अध्यक्ष म्हणून अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील यांनी काम करावे असा सर्वानुमते प्रस्ताव आला. यासंबंधी बोलणे करण्याकरता श्रीपती शास्त्री त्यांच्या घरी भेटायला गेले. शंकररावांनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला व पुढचा प्रश्न केला की या समितीचा कोषाध्यक्ष कोण असणार आहे? तो जर संघाचा कार्यकर्ता असेल तरच मी ही अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारीन. शंकरराव हे काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत हे सर्वश्रुत होते. त्यामुळे शंकररावांनी हा प्रस्ताव लगेच स्वीकारला व संघाचाच कोषाध्यक्ष असला पाहिजे असा आग्रह धरला, या दोन्ही गोष्टींचे श्रीपती शास्त्रींना आश्चर्य वाटले. तसे त्यांनी विचारले तेव्हा शंकरराव म्हणाले, की संघासंबंधी कोण काय बोलतो यावरून मी संघासंबंधीचे मत ठरवत नाही. मी आतापर्यंत संघाची जेवढी माणसे पाहिली आहेत ती सर्व चारित्र्यसंपन्न माणसे आहेत. अशा माणसांनी कोणतेही काम हाती घेतले तर ते देशहिताचे असणार याची मला खात्री आहे म्हणून मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. संघाचा कार्यकर्ता हा प्रत्येक पैशाचा चोख हिशोब ठेवणारा असतो असा माझा व माझ्या सहकाऱ्यांचाही अनुभव आहे. सामाजिक पैशाचा अपव्यय संघ कार्यकर्ता कधीही होऊ देत नाही. म्हणूनच कोषाध्यक्ष संघाचा कार्यकर्ता असावा असा आग्रह मी धरला.
तमिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचे काम करणारे नरसिंहन या नावाचे एक व्यापारी होते. करुणानिधींची त्यांची उत्तम ओळख होती व पक्षाला ते भरपूर निधीही देत असत. एक संघ कार्यकर्ते त्यांना आपल्याबरोबर संघाच्या कार्यालयामध्ये घेऊन गेले. संघाचे अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुरेशराव केतकर त्यावेळी कार्यालयात होते. त्यांनी नरसिंहन यांची ओळख करून घेतली. थोड्या गप्पाही झाल्या. सुरेशरावांनी त्यांना आपल्याबरोबर भोजनाचा आग्रह केला. कार्यालयातील इतर सर्व लोकांबरोबर नरसिंहनदेखील जेवायला बसले. कार्यकर्त्यांची आत्मीयतेची वागणूक, साधी राहणी व उच्च विचारसरणी पाहून ते अतिशय प्रभावीत झाले. त्यांनी सांगितले की मी आतापर्यंत पक्षाच्या अनेक बैठका, सभा व संमेलनांना गेलो आहे. मात्र तेथील दृश्य अगदी वेगळे असते. प्रत्येक कार्यकर्ता स्वतंत्रपणे जेवणासाठी जातो. अनेक जण पंचतारांकित हॉटेलमधून जेवण मागवतात. तुम्ही संघवाले इतक्या आत्मीयतेने एकमेकांशी वागता, सहजपणे एकमेकांबरोबर बसून जेवता, हे दृश्य इतरत्र दुर्मीळ आहे.
महाराष्ट्रात जसे पंढरपूर हे प्रसिद्ध देवालय आहे, तसेच केरळमध्ये गुरुवायूर हे मंदिर आहे. तिथे दुपारच्या पूजेनंतर महाप्रसाद म्हणून फक्त नंबुद्री ब्राह्मणांना भोजन देण्यात येत असे. तेथे ही परंपरा असल्यामुळे या विषयाला कोणी आजपर्यंत आक्षेप घेतलेला नव्हता. या प्रथे विरुद्ध कल्लड सुकुमारन या मार्क्सवादी पुढाऱ्याने एक चळवळ सुरू केली. ते त्रिवेंद्रमहून मोर्चाने गुरुवायूर मंदिराकडे निघाले. तेथे जाऊन ते आंदोलन करणार होते. संघाच्या कार्यकर्त्यांना हे वृत्त समजले. संघाचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते त्या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्या वेळचे प्रांत प्रचारक भास्करराव कळंबी यांनी गावोगावी या मोर्चाचे स्वागत करण्याची व्यवस्था केली. प्रत्येक गावी होणारे चहापान, नाश्ता अथवा भोजन हे सर्वांचे एकत्र होत असे.
त्यात कुठल्याच जातीचा व्यक्ती कधी वेगळा राहिला नाही. अशाच प्रकारे गावोगावी स्वागत होत हा मोर्चा गुरुवायूर येथे येऊन पोहोचला. गुरुवायूर मंदिर व्यवस्थापनाने या मोर्चाचे स्वागत केले व त्या दिवशी नंबुद्री ब्राह्मणांच्या पंक्ती बरोबर मोर्चात आलेले सर्वजण जेवायला एकत्रित बसले. आंदोलन करणाऱ्यांची तोंडे अगदी बघण्याजोगी झाली. सर्व कार्यक्रम संपल्यावर ते मंदिर व्यवस्थापकांना भेटले. त्यावेळी मंदिर व्यवस्थापकांनी सांगितले की, “कोणत्याही जातीबद्दल आमच्या मनात द्वेष नाही. जी परंपरा होती ती आम्ही चालू ठेवली होती. या ठिकाणचे संघाचे कार्यकर्ते आम्हाला येऊन भेटले व त्यांनी सहभोजनाची कल्पना मांडली. या कार्यकर्त्यांचा आम्हाला अतिशय चांगला अनुभव आहे. त्यामुळे कोणतेही वितुष्ट न येता हा कार्यक्रम ते योग्य पद्धतीने संपन्न करतील अशी खात्री असल्याने आम्ही तात्काळ त्यास संमती दिली. संघ कार्यकर्त्यांमुळेच हे सहभोजन चांगल्या पद्धतीने होऊ शकले.” त्या मोर्चामध्ये गावोगावी भेटलेले संघ स्वयंसेवक हे सर्व जाती जमाती मधले होते व ते आपसात तसेच मोर्चातल्या सर्वांशी आपुलकीने वागत होते. हे पाहूनच मोर्चातल्या सर्वांचे संघासंबंधीचे मत पूर्णपणे बदलले होते.
वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार आजपर्यंत फक्त ब्राह्मण वर्गाला होता; परंतु सर्व हिंदूंना हा अधिकार असला पाहिजे असे कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती एकदा म्हणाले. संघाचे कार्यकर्ते त्यांना जाऊन भेटले. तुम्ही वेदशिक्षण देण्याची व्यवस्था करा. सर्व जातीतील पात्र विद्यार्थी शिक्षणासाठी आम्ही घेऊन येतो, असे त्यांनी सांगितले. त्याच वर्षीपासून हा पुजारी प्रशिक्षण वर्ग सुरू झाला व दरवर्षी १०० हून अधिक विद्यार्थी वेदांचे अध्ययन करून बाहेर पडू लागले. तमिळनाडूतील शेकडो मंदिरांमध्ये सक्षम पुजारी नव्हतेच. हे वेगवेगळ्या जातीतले वेदाभ्यास केलेले विद्यार्थी त्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा करू लागले. सर्व मंदिरांच्या विश्वस्तांनी हा बदल आनंदाने मान्य केला. आज तमिळनाडूतील जवळजवळ ७०% टक्के मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी आहेत व ते उत्तम वैदिक पद्धतीने पूजाअर्चा करतात. विशेष म्हणजे सर्व समाजाला हा बदल चांगला वाटला व मोठ्या प्रमाणावर नागरिक या पुजाऱ्यांकडे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येतात. जाती भेद व विशेषतः जातीविद्वेश नाहीसे झाले पाहिजेत असे केवळ म्हणून भागत नाही. ती गोष्ट कृतीने सिद्ध व्हावी लागते.
पुण्यातील सुधाकर घोडके हे कार्यकर्ते सहकार खात्यात ऑडिट विभागात कामाला होते. त्यांची सोलापूरला बदली झाली. लगेच दुसऱ्या घराची व्यवस्था होऊ शकत नव्हती, त्यामुळे ते काही दिवस तेथील संघ कार्यालयात राहिले होते. जवळच्या एका गावी ऑडिटला गेले असताना तेथील सहकारी संस्थेत त्यांना बरेच आर्थिक घोटाळे आढळले. त्यांनी त्या संचालकांना सांगितले की योग्य पद्धतीने रजिस्टर व खर्चाच्या पावत्या जुळवून मग मला बोलवा. नंतरच मी ऑडिट करीन. त्यांनी आडून आडून घोडके यांना हे पटवायचा प्रयत्न केला की तुमच्या आर्थिक अपेक्षा आम्ही पुऱ्या करू, तुम्ही ऑडिट करा. पण घोडके तेथे न थांबता कार्यालयात निघून आले. त्या दिवशी रात्री दोन तीन पुढारी त्यांचा पत्ता शोधत कार्यालयात आले. त्यांनी घोडकेना स्पष्ट सांगितले की इतक्या वर्षांमध्ये कोणी ऑडिटमध्ये या चुका काढलेल्या नाहीत, तुम्ही विनाकारण खोलात जाऊ नका. तुम्हाला हवे तेवढे पैसे आम्ही आता रोखीने देतो. आम्हाला हिशोब क्लियर करून द्या. नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. घोडके यांनी हे स्पष्ट सांगितले की मी पैशांनी विकत घेतला जाणारा माणूस नाही व तुमच्या धमक्यांना घाबरणारा माणूसही नाही. मी सांगितल्याप्रमाणे हे हिशोब तुम्ही योग्य पद्धतीने दाखवलेत तरच मी ऑडिट करीन नाहीतर मागच्या ऑडिटरचे रिपोर्टदेखील पुन्हा तपासणीस घेण्याचे माझ्याकडे अधिकार आहेत हे विसरू नका. पैसे घेऊन आलेले लोक उलट पावली निघून गेले. त्या दिवशी रात्री जेवायला जाण्याएवढे पैसे घोडक्यांच्या खिशात नव्हते. तेथील सुधीर जोगळेकर या प्रचारकाकडून पंधरा रुपये उसने घेऊन घोडके जेवायला गेले; परंतु दाराशी चालत आलेले हजारो रुपये त्यांनी नाकारले. संघाचा कार्यकर्ता भ्रष्टाचार करत नाही व करू देत नाही, हे त्यांनी कृतीने दाखवून दिले. असे हजारो घोडके समाजाच्या वेगवेगळ्या थरांमध्ये आज कार्यरत आहेत. कोणताही गाजावाजा न करता ते कृतीने दाखवून देतात की आपण सच्चे संघ स्वयंसेवक आहोत.
१९७७ सालच्या निवडणुकीमध्ये बस्तर विभागातून संघाचे एक प्रचारक लारंग साई यांना सर्वपक्षीय नेत्यांच्या आग्रहावरून निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. ते निवडून आले व मजूर खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याला भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात मुकुंदराव गोरे यांना फोनवर संपर्क केला. मुकुंदराव व साई हे दोघेही प्रचारक होते. पूर्वी एका बैठकीमध्ये पुण्यातील विडी कामगारांच्या समस्यां संबंधी मुकुंदरावांनी माहिती सांगितली होती. लारंग साई असे म्हणाले की आता मी त्या खात्याचा मंत्री असल्याने मी या कामगारांना न्याय देऊ शकतो. मी व माझा सेक्रेटरी असे दोघेच उद्या सकाळच्या लवकरच्या विमानाने पुण्यात येतो. तुम्ही दोघेजण मोटरसायकलवर आम्हाला कार्यालयात घेऊन या. आपण चहा घेऊ व थेट कार्यक्षेत्रात जाऊ. या विषयाचा कुठेही गाजावाजा मी करणार नाही. त्याप्रमाणे मुकुंदरावांनी केले. विडी कामगारांच्या क्षेत्रात काम करणारे मजदूर संघाचे प्रचारक माधवराव क्षीरसागर व दोघे तिघे दुभाषी बरोबर होते.
चार तास लारंग साई विडी कामगारांच्या भेटी घेत गंज पेठ, नाना पेठ व गणेश पेठ भागात घरोघर फिरले व त्यांच्या सर्व समस्या त्यांनी नावनिशीवार लिहून घेतल्या. त्यानंतर त्यांनी विडी कारखानदारांची व लेबर ऑफिसर्सची बैठक घेतली. केंद्राने कामगार हिताचे जे कायदे केलेले आहेत ते तंतोतंत पाळले गेले पाहिजेत. कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होणे, कामगारांच्या आरोग्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या राहण्यासाठी चांगली घरे उपलब्ध करून देणे, यासाठी सरकारने पैसे दिलेले आहेत. त्यांचा तुम्ही उपयोग का करत नाही? असा प्रश्न लारंग साई यांनी विचारला व पुढच्या सहा महिन्यात मी पुन्हा येऊन या गोष्टी झाल्या की नाही हे पाहणार आहे हेही सांगितले. या विषयाचा एवढा प्रभाव पडला की विशेषतः या क्षेत्रातील विडी कामगारांसाठी चांगली घरे उपलब्ध झाली. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या व किमान वेतन देण्यात होणारी टाळाटाळ पूर्णपणे बंद झाली. या घटनेचे वर्णन करताना मुकुंदराव गोरे म्हणाले की पॉवर ऑलवेज करप्ट्स अँड अब्सोल्युट पॉवर करप्ट्स आब्सोल्युटली अशी प्रचलित म्हण आहे. परंतु संघाचा संस्कार घेतलेला कार्यकर्ता सर्वोच्च सत्ता स्थानी पोहोचला तरी त्याच्या डोक्यातील सेवाभाव नाहीसा होत नाही याचे हे जिते जागते उदाहरण आहे.
मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे, या शिक्षण पद्धतीत फक्त कारकून निर्माण करण्याची क्षमता आहे, समाज परिवर्तन करण्याची क्षमता नाही. त्यामुळे ही शिक्षण पद्धत बदलली पाहिजे हा विषय अनेक शिक्षण तज्ज्ञांनी आजवर परिषदांमधून मांडला; परंतु संघाचे कार्यकर्ते चर्चा करत बसले नाहीत. विद्याभारती या संस्थेमार्फत संघ कार्यकर्त्यांनी देशभरात शाळा, महाविद्यालये व वनवासी भागातील संस्कार वर्ग, तसेच एकल विद्यालये अशा ३०००० शिक्षण संस्था उभ्या केल्या. या शिक्षण संस्थांमध्ये भारतीय संस्कृतीला सुसंगत असे उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांकडून फी कमीत कमी घेतली जाते. या शाळा विनाअनुदानित आहेत. इथे प्रवेश मिळावा म्हणून मोठ्या मोठ्या उद्योगांचे मालक व सरकारी अधिकारी रांगा लावून उभे राहतात असा अनुभव आहे. भारतीय संस्कृतीचा उत्तम अभ्यास या विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. त्यांना संस्कृतचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर आधुनिक गणित, विज्ञान व संगणक यांचेही शिक्षण दिले जाते. या सर्व शाळांमधून व्यवसाय शिक्षणाची उत्तम व्यवस्था आहे. त्यामुळे काही ना काही व्यावसायिक कौशल्य घेऊन विद्यार्थी येथून बाहेर पडतात. आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेल्या जवळजवळ सर्व त्रुटी प्रत्यक्ष कृतीने संघ स्वयंसेवकांनी दूर करून दाखविलेल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या आखणीमध्ये विद्याभारतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा सहभाग दिलेला आहे.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काही ना काही चांगले बदल घडून यावेत अशी आपली अपेक्षा असते. या बदलांसाठी केवळ गाजावाजा न करता स्वतःच्या कृतीतून परिवर्तन घडवून आणणारे हजारो कार्यकर्ते आज देशभर विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. प्रचार माध्यमांमधून संघा संबंधी जे बोलले जाते किंवा राजकीय नेते संघासंबंधी ज्या टिप्पणी करतात त्यावरून संघासंबंधीचे मत ठरवण्याऐवजी प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांकडे पाहिले, तर संघ काय आहे याचे नेमके दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. शरद श्रीकृष्ण कुंटे