
‘आशिया कप क्रिकेट'चे सामने संपले, विजेता ठरला, तरी अजून त्यातल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या सामन्यांच्या चर्चा सुरूच आहेत. सर्वाधिक चर्चा आहे, ती स्पर्धा निर्विवाद जिंकूनही भारताला न मिळालेल्या स्मृतिचषकाची. जो स्मृतिचषक या स्पर्धेचं अभिमान चिन्ह होता, ते चिन्ह विजेत्या संघाला न देताच संयोजक चिन्ह घेऊन पळून गेले! आतापर्यंत कोणत्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेची अशी नाचक्की झाली नसेल. क्रिकेट जगतात तर नाहीच नाही. क्रिकेट हा खरा 'साहेबा'चा खेळ. तो अत्यंत सभ्य मानला जातो. निदान 'साहेबा'चा प्रभाव होता, तोपर्यंत तरी त्या खेळाचा आब आणि डौल तसाच दाखवला जात असे. पण, 'साहेबा'नेच या खेळाची देणगी त्यांच्या साम्राज्याच्या वसाहतींना दिली आणि जेव्हां तेच 'साहेबा'पेक्षा हा खेळ भारी खेळू लागले, खेळाचं अर्थकारण युरोपमधून आशिया खंडात सरकलं, तेव्हां या खेळाचं रूप बदललं, काही नियमही बदलले. मनगटाच्या नजाकतीने खेळायचा हा खेळ दंडातल्या ताकदीने खेळला जाऊ लागला. जसं खेळाचे तंत्र बदललं, तसा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. मैदानातली खेळाडूंची देहबोली, भाषा आणि डावपेचही अधिक रांगडे होत गेले.
आताच्या 'आशिया कप'च्या बक्षीस समारंभाने तर हेही दाखवून दिलं, की परिपक्व हातातून हा खेळ आता अपरिपक्व हातांमध्ये गेला आहे. क्रिकेट हे आता राष्ट्रवादाचं हत्यार झालं आहे. मैदानाबाहेरच्या राजकारण्यांनी खेळाची सूत्रं आपल्या हाती घेतल्याने क्रिकेट हा आता 'चेंडू-फळी'चा खेळ राहिलेला नाही. तो आता त्या त्या देशाच्या राजकारणाचा भाग झाला आहे. पाकिस्तानसारख्या अर्धवट, अतिरेकी देशातले राजकारणी खेळातही तीच वृत्ती दाखवतात. त्याने या प्रतिष्ठित खेळाचं हसं होणार. विजेत्या संघाला ज्याच्या हातून चषक द्यायचा आहे, तो पाहुणाच चषक घेऊन पळाला, अशी घटना जगातल्या कुठल्याही देशातल्या लहानातल्या लहान गावातल्या छोट्याशा स्पर्धेतही कधी घडली नसेल. पण, अशी घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर घडली आणि ज्याने हा चषक नेला, तो आजही तो बऱ्या बोलाने द्यायला तयार नाही, ही हद्द आहे! पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी आपल्या देशाची खेळाच्या मैदानातली इभ्रतही या एका घटनेने धुळीला मिळवली आहे.
आशिया खंडातला सध्याचा भूराजकीय तणाव जगजाहीर आहे. किंबहुना या तणावासाठी या खंडाबाहेरूनच बऱ्याच हालचाली सुरू आहेत. अशात 'आशिया चषक स्पर्धा' आयोजित करणं हेच मोठं धाडस होतं. पण, क्रिकेटचं अर्थकारण असं धाडस करण्यास सगळ्यांनाच उद्युक्त करत असतं. त्यात कोणा एकाचा अपवाद असू शकत नाही. ज्या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ आहे, त्याच्याशी सामना खेळायची वेळ येणारच आहे, तर अशा स्पर्धेत भारताने भाग घ्यावा की नाही, यावरून आधी बराच काथ्याकूट झाला. पण, अखेर संयोजकांची ताकद, त्या स्पर्धेत गुंतलेले मोठे हितसंबंध यामुळे भारताला खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारत हाच आशियात क्रिकेटचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने भारतीय संघ नसता, तर ही स्पर्धा असून नसल्यासारखीच झाली असती. त्यामुळे, भारताला स्पर्धेत सहभागी करून घेतलं, तरी भारताने स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघाशी कसं वागायचं, हे कसं कोण सांगू शकणार? भारताने पाकिस्तानबरोबर सामने खेळायचं ठरवलं, पण सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर कप्तान आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जे औपचारिक हस्तांदोलन असतं, त्याला स्पष्ट नकार दिला.
आपल्या तिन्ही सामन्यांवेळी भारताने आपला हा निर्णय अत्यंत शांतपणे, प्रतिकात्मक पद्धतीने अमलात आणला. पाकिस्तान संघाला कदाचित हे अपमानास्पद वाटलं असेलही. पण, त्यासाठी त्यांनी प्रत्युत्तराचा कोणता मार्ग अवलंबला? गोलंदाज हॅरीस रऊफने फलंदाजाला बाद केल्यानंतर अहमदाबाद विमान दुर्घटनेची आठवण करून देणारे हातवारे भर मैदानात केले. तसाच प्रकार साहबजादा फराहानचा. त्यानेही अर्धशतक झळकावल्यानंतर आपली बॅट बंदुकीसारखी हवेत रोखून त्यातून गोळीबार केल्याची ॲॅक्शन केली. त्यातून त्याला पहलगामची आठवण करून द्यायची होती. या दोन्ही बाबी क्रिकेटच्या नियमात दंडनीय आहेत, की नाही माहीत नाही. पण, संवेदनशील वातावरणातील स्पर्धेत आगीत तेल ओतणाऱ्या होत्या, एवढं नक्की. या कृतीबद्दल पाकिस्तानातील राजकारण्यांनी, पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे यजमान मोहसीन नकवी यांनी साधी नापसंतीही व्यक्त केली नाही. ती केली असती, तर कदाचित अंतिम सामन्यानंतर घडलेला बक्षीस वितरणावेळचा अशोभनीय प्रसंग टळला असता.
या नकवी यांनी पहलगामच्या दुर्घटनेनंतरही आगलाऊ ट्वीट केली होती. त्यांच्या मनात भारताविषयी किती अढी आहे, हे सगळा भारत जाणतो. त्यामुळेच त्यांच्या हातून विजेत्याचा चषक स्वीकारायला भारताने नकार दिला. अशा प्रसंगी थोडं समजुतीने घेऊन दुबईतील शेख किंवा आशिया क्रिकेट परिषदेच्या एखाद्या अन्य पदाधिकाऱ्याच्या हस्ते या एका चषकाचं वितरण करता आलं असतं. पण नकवी हातातला चषक सोडायलाच तयार नव्हते. ते चषकासह व्यासपीठावरून निघून जाताच आशिया क्रिकेट परिषदेचे अन्य पदाधिकारीही त्यांच्या मागून निघून गेले. बक्षीस वितरणासाठी लावलेला विजेत्या संघाच्या नावाचा फलकही त्यांनी उतरवला. हे सगळंच असमंजस, अपरिपक्वपणाचं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बेजबाबदारपणे कसं वागू नये, याचं प्रात्यक्षिक होतं. आंतराष्ट्रीय क्रिकेट नियम मंडळाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई तातडीने करायला हवी. नकवींना त्यांच्या पदावरून हटवायलाच हवं!