भारताची पहिली महिला ट्रकचालक : योगिता रघुवंशी

दुर्गा माता ही भक्ती आणि शक्तीचं रूप मानलं जातं. महिला सशक्तीकरणाचे ते एक प्रतीक आहे. आजच्या काळात स्त्री चूल आणि मूल अशी पारंपरिक चौकट मोडून प्रत्येक क्षेत्रांत अग्रेसर आहे. समुद्र ते अवकाश असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे तिने आपल्या कर्तृत्वाची पताका उंचावलेली नाही. अशीच आहे तिची कहाणी धैर्य आणि दृढनिश्चयाची. जिथे पूर्णतः पुरुषांचे वर्चस्व मानले जाई आणि हे वर्चस्व मोडण्याचे धाडस कोणत्याच स्त्रीने केले नव्हते ते धाडस तिने केले. या धाडसामुळेच ती भारताची पहिली महिला ट्रकचालक ठरली. ही गोष्ट आहे योगिता रघुवंशी यांची.


योगिता महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये चार भावंडांसह वाढली. तिने वाणिज्य आणि विधी शाखेची पदवी मिळवली. तिचे लग्न एका ट्रकचालकासोबत झाले. ट्रक चालकांविषयी एक वेगळीच प्रतिमा समाजात आढळते. योगिताचा पती त्यास अपवाद होता. लग्नानंतर त्याने आपल्या पत्नीला कायद्याचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले. त्यावेळेस ती आई सुद्धा होती. पतीचा पाठिंबा आणि स्वतःच्या दृढनिश्चयाने ती वकील बनली. मात्र दुर्दैवाने काही वर्षांतच तिच्या पतीचे निधन झाले.


याशिका आणि यशविन या आपल्या लहान मुलांना एकल पालक बनून वाढविण्याचे आव्हान योगिता समोर होते. पतीच्या निधनानंतर ट्रक तसाच उभा होता. तिने एका ड्रायव्हरला कामावर ठेवले होते; परंतु तो ड्रायव्हरच ट्रकचे सगळे भाडे लाटायचा. त्यामुळे तोटा होत होता. यावर एकाच उपाय होता तो म्हणजे योगिताने स्वतः ट्रक चालवणे. तिला हे उमजल्यानंतर तिने सर्व गोष्टी स्वतःच्या हातात घेण्याचे ठरवले.



खरे तर योगिताने एखाद्या ज्येष्ठ वकिलाकडे कनिष्ठ वकील म्हणून काम केले असते, तर तिला माफक वेतन दरात काम करावे लागले असते. केसेस मिळवण्यासाठी अनेक कष्ट करावे लागले असते. शिवाय या तुटपुंज्या वेतनात घरखर्च भागवणे अवघड झाले असते. यापूर्वी तिने एके ठिकाणी काम केले होते जिथे तिला ३ हजार रुपये वेतन मिळायचे. याउलट ट्रक चालवण्याच्या पहिल्याच आठवड्यात तिला २ हजार रुपये मिळाले होते. जर आपण महिनाभर काम केले तर ८ हजार रुपये सहज मिळतील या अपेक्षेने तिने हा व्यवसाय स्वीकारला. कोणत्याही ट्रकचालकास दररोज भरपूर काम मिळते. काम भरपूर पण ट्रकचालकांची वानवा अशी काहीशी अवस्था असते. त्यामुळे वकिली पेशापेक्षा ट्रक चालवणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य ठरले असते.


असा सारासार विचार करून योगिताने ट्रक चालविण्याचा निश्चय मनाशी पक्का केला. योगिताचा पहिला प्रवास भोपाळ ते अहमदाबाद होता. पहिल्यांदा प्रवास सुरू करताना तिच्या काळजात धडधड होत होती. तिच्यासाठी हे सारं नवीन होतं पण ती त्यासाठी तयार होती. योगिताला तर रस्ते किंवा कोणता रस्ता कोणत्या महामार्गावर जातो हे देखील माहीत नव्हते. लोकांना रस्त्यांची माहिती विचारत विचारत शेवटी ती पोहोचली. तिने तिच्या मनाची तयारी केली होती. योगिताला स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जे शक्य होतं ते करायचं होतं. तिला सन्मानाने आपल्या मुलांना वाढवायचं होतं.


हळूहळू ती देशभरातील विविध शहरांमध्ये ट्रक चालवू लागली. देशभरातील शहरांमध्ये ट्रक चालवताना तिला अनेक समस्या येत होत्या. एक स्त्री ट्रक चालवते यावर कोणाचाच विश्वास बसत नसे. अनेकांना वाटे की ती कोणत्यातरी ट्रकचालकाची बाई आहे. आज देखील योगिता ट्रक चालवते यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. महामार्गावरील मेकॅनिक, ढाब्यांवर काम करणारे पुरुष तसेच इतरत्र असलेले पुरुष वेगळ्याच नजरेने तिच्याकडे पाहतात. पण जेव्हा ते योगिताच्या हातातील स्टीअरिंग पाहतात तेव्हा त्यांचे स्वरूप बदलते. "पण यापैकी कोणीही मला त्रास देत नाही. तसा प्रसंग कधीच घडला नाही." असं योगिता म्हणते.


एक मात्र ती कबूल करते की या पुरुषप्रधान व्यवसायात काम करताना एक स्त्री म्हणून तिला अनेक टोमणे सहन करावे लागले. ‘या कामापेक्षा दुसरं काहीतरी काम कर,’ असे सल्लेदेखील अनेकांनी दिले. मात्र योगिता आपल्या निश्चयावर ठाम राहिली. आपण आपले काम प्रामाणिकपणे केले. कोणत्याही मोहाला वा भीतीला बळी पडलो नाही तर कोणताही व्यवसाय अशक्य नाही. इतरांचे सहकार्य देखील मिळते, असं योगिताला वाटते. योगिता रघुवंशीसारख्या स्त्रिया या कोणत्याही महिलेसाठी आदर्श आहेत. खऱ्या अर्थाने त्या समाजातील आधुनिक दुर्गेचं रूप आहेत.


-अर्चना सोंडे


Comments
Add Comment

ग्रंथ हेच गुरू

वैभववाडी : मंदार सदाशिव चोरगे ग्रंथ कोंडून ठेवू नका, कपाटात सुरक्षित... जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र

लढाऊ रेवती

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे राजेशाही आयुष्य पाहिल्यानंतर सामान्य जीवन जगण्यास आले तर कोणीही आपल्या नशिबाला दोष

व्यक्तिमत्त्व विकास

मोरपिस : पूजा काळे व्यक्तिमत्त्व विकासाच्या टप्प्यात साहित्याच्या योगदानाचा विषय महत्त्वाचा ठरतो. भाषा

अनुवादातून संवाद

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर अनुवाद हा विषय भाषिक आदान-प्रदानाशी अत्यंत जवळचा विषय आहे. भारत हा या अर्थाने अतिशय

वृद्धांचा सन्मान आणि सुरक्षितता

माध्यमांनी वृद्धांचे सकारात्मक योगदान आणि त्यांचे अनुभव प्रदर्शित करून समाजातील वृद्धांविषयीचे नकारात्मक

चव, चिकाटी आणि चैतन्याचा स्वाद

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवी अन्नपूर्णा हे त्या शक्तीचं एक रूप. अन्न देणं,