 
                            मुंबई : आजचा काळ म्हणजे वेगवान जीवनशैली आणि सततची स्पर्धा. या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण स्वतःला वेगवेगळ्या कामांमध्ये झोकून देतोय. मल्टीटास्किंगचा ट्रेंड वाढला असला, तरी कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एकाग्रता.
जर मन स्थिर नसेल, तर कितीही प्रयत्न केला तरी कोणतेही काम नीट पार पाडता येत नाही. म्हणून, एकाग्रता म्हणजे यशाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही.
एकाग्रता वाढवण्यासाठी करा हे उपाय:
स्वतःवर विश्वास ठेवा
जेव्हा वाटतं की मन सतत भरकटत आहे, तेव्हा स्वतःला मनातून ठाम सांगा – "मी हे नक्की करू शकतो!" अशा सकारात्मक विचारामुळे मानसिक ताकद वाढते आणि तुम्ही लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करू शकता.
हळूहळू प्रगती करा
एका दिवसात मोठा बदल घडवणं शक्य नाही. सुरुवातीला साध्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा – जसं की वेळेवर उठणं, नियोजन करून काम करणं. यामुळे एकाग्रतेचा सराव सोप्या पद्धतीने करता येतो.
डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा
कामाच्या वेळी मोबाईल, सोशल मीडिया यासारख्या गोष्टी लक्ष विचलित करतात. त्यामुळे या गोष्टींपासून अंतर ठेवा. गरजेचं काम करताना फोन सायलेंटवर ठेवणं किंवा बाजूला ठेवणं फायदेशीर ठरू शकतं.
ध्यान आणि मानसिक शांतता
ध्यान केल्याने मन शांत होतं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. दररोज १०-१५ मिनिटं तरी शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि कामात एकाग्रता वाढते.
इच्छाशक्ती बळकट करा
एखादं उद्दिष्ट ठरवून त्याकडे मनापासून वाटचाल केली, तर ती गोष्ट नक्की साध्य करता येते. हीच इच्छाशक्ती तुमचं मुख्य बळ ठरते. जिथे मनापासून इच्छाशक्ती असते तिथे एकाग्रता आपोआप निर्माण होते.
नियमित व्यायाम करा
शारीरिक आरोग्याचं मानसिक स्वास्थ्याशी थेट नातं असतं. व्यायाम केल्याने शरीरासोबतच मनही ताजंतवानं राहतं. त्यामुळे दिवसभरात किमान काही वेळ चालणे, योगा किंवा हलका व्यायाम यासाठी काढा.
एकाग्रता ही कुणालाही मिळणारी जादू नसून, ती सराव आणि योग्य सवयींमुळे विकसित होते. जर तुम्ही वरील गोष्टी सातत्याने केल्या, तर नक्कीच तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्ही कोणत्याही कामात लक्षपूर्वक प्रगती करू शकाल.

 
     
    




