Tuesday, September 30, 2025

वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी समुपदेशन

वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी समुपदेशन

गुन्हेगारांना समुपदेशन करण्याची आवश्यकता, पद्धती आणि उपाययोजना लक्षात घेणार आहोत. गुन्हेगार सुधारून समाजात पुन्हा सन्मानाने जगू शकतील यासाठी समुपदेशन ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. केवळ शिक्षा देणे पुरेसे नसते; गुन्हेगारी वृत्तीच्या मुळाशी असलेली कारणे शोधून त्यावर मानसिक आणि भावनिक स्तरावर उपचार करणे आवश्यक असते. गुन्हेगारांना समुपदेशन करणे का गरजेचे आहे? याचा विचार केल्यास लक्षात येते की, गुन्हेगारांना समुपदेशन करणे हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीत बदल होऊन तो गुन्हेगार होणे या मुद्द्याचा अभ्यास केला असता आपण समजू शकतो की, गुन्हेगारी प्रवृत्ती ही अनेकदा मानसिक ताण, भावनिक आघात, सामाजिक आणि आर्थिक समस्या किंवा चुकीच्या संगतीमुळे येते. समुपदेशन या मूळ कारणांवर काम करून त्यांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करते. गुन्हेगारांचे पुनर्वसन आणि समाज जोडणी खूप गरजेची आहे. शिक्षेनंतर गुन्हेगार पुन्हा समाजात परततात. त्यांना स्वीकारले जावे, त्यांनी नोकरी करावी आणि शांततापूर्ण आयुष्य जगावे यासाठी पुनर्वसनाची आवश्यकता असते. समुपदेशन त्यांना नवीन जीवनासाठी मानसिकदृष्ट्या तयार करते. पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता कमी करणे म्हणजेच प्रभावी समुपदेशनामुळे गुन्हेगार त्यांच्या चुकांची जाणीव करून घेतात आणि भविष्यात पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. मानसिक आरोग्य सुधारणा करणे शक्य होते जसे की, अनेक गुन्हेगार नैराश्य किंवा अंमली पदार्थांचे व्यसन यांसारख्या मानसिक समस्यांनी ग्रस्त असतात. समुपदेशन या समस्यांवर उपचार करून त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते.

गुन्हेगारांना समुपदेशन कसे केले जाते? यावर चर्चा करणे काळाची गरज आहे. समुपदेशन ही एक क्रमबद्ध प्रक्रिया आहे. गुन्हेगाराची पार्श्वभूमी, गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याची मानसिक स्थिती लक्षात घेऊन समुपदेशनाची योजना आखली जाते. गुन्हेगाराशी विश्वासपूर्ण संबंध प्रस्थापित करणे ही यातील प्रमुख पायरी आहे. सर्वात आधी, समुपदेशकाने गुन्हेगाराशी विश्वासाचे आणि आदराचे नाते निर्माण करणे आवश्यक असते. यात सहानुभूती आणि संवेदनशीलता महत्त्वाची आहे, ज्यामुळे गुन्हेगार मोकळेपणाने आपल्या भावना आणि समस्या बोलून दाखवतो. समस्येचे निदान आणि विश्लेषण करणे म्हणजेच समुपदेशक गुन्हेगाराच्या गुन्हेगारीवृत्तीच्या मूळ कारणांचा शोध घेतो. यात त्याचे बालपण, कौटुंबिक इतिहास, शिक्षण, सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि मानसिक स्थितीचे विश्लेषण केले जाते.

समुपदेशनाचे टप्पे आणि तंत्र या प्रक्रिया जाणून घेतल्यास आपल्याला ही संकल्पना अजून खोलात जाऊन समजावून घेता येईल. वैयक्तिक समुपदेशन जसे की एकास-एक, समोरासमोर चर्चा करून गुन्हेगाराला त्याच्या विचारांची आणि भावनांची जाणीव करून दिली जाते. समूह समुपदेशन यामध्ये समान समस्या असलेल्या गुन्हेगारांना एकत्र आणून त्यांना एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाते. संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी या तंत्रात गुन्हेगारांच्या नकारात्मक आणि चुकीच्या विचारसरणीला आव्हान देऊन त्यांना सकारात्मक विचार आणि वर्तन विकसित करण्यास मदत केली जाते. गुन्हेगारांना कौशल्य प्रशिक्षण देणे म्हणजे यात संघर्ष सोडवण्याचे कौशल्य, राग व्यवस्थापन आणि सामाजिक कौशल्ये शिकवली जातात.

उपाययोजना आणि अंमलबजावणी बाबतीत बोलायचं म्हटल्यास चर्चेनंतर ठरवलेल्या उपायांची अंमलबजावणी करण्यास गुन्हेगाराला प्रोत्साहित केले जाते आणि त्याच्या प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन केले जाते. गुन्हेगारी वृत्ती सोडण्यासाठी समुपदेशनात कोणत्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. गुन्हेगारांना जबाबदारीची जाणीव करून देणे, त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली करून घेणे आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारायला लाऊन, इतरांना दोष देणे थांबवण्यास प्रवृत्त करणे. गुन्हा केल्याच्या परिणामांची जाणीव गुन्हेगाराला करून देणे जसे की त्यांच्या कृत्यामुळे पीडित व्यक्ती आणि त्यांच्या स्वतःच्या कुटुंबावर झालेल्या नकारात्मक परिणामांची जाणीव करून देणे. राग आणि भावनिक व्यवस्थापन गुन्हेगाराच्या रागाचे मूळ रागाच्या उद्रेकाची कारणे ओळखण्यास त्याला मदत करणे. नियंत्रण तंत्र आजमावणे देखील यात आवश्यक असते. राग नियंत्रित ठेवण्यासाठी श्वासोच्छ्वास व्यायाम, शांत राहण्याचे तंत्र आणि इतरांशी संवाद साधण्याचे योग्य मार्ग शिकवणे. मूल्य प्रणाली आणि नैतिकता गुन्हेगारांमध्ये नैतिक मूल्यांची स्थापना, प्रामाणिकपणा, आदर आणि सहानुभूती, दया यांसारख्या नैतिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगणे.

कायद्याचे पालन करणे, कायदा सूव्यवस्था यावर गुन्हेगारांनी विश्वास ठेवणे अपेक्षित आहे. कायद्याचे उल्लंघन करण्याचे तोटे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्याचे फायदे समुपदेशन दरम्यान स्पष्ट केले जातात. भविष्यातील नियोजन, ध्येय निश्चिती याची गुन्हेगाराला जाणीव करून देणे आजमितीला आवश्यक आहे. सकारात्मक आणि वास्तविक जीवनाची ध्येये निश्चित करण्यास त्यांना मदत करणे, गुहेगारातील कौशल्ये विकसित करणे हे देखील महत्त्वाचे कार्य आहे. गुन्हेगारी सोडून नोकरी मिळवण्यासाठी, व्यवसायासाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा देखील तत्त्वाचा भाग आहे. समुपदेशन दरम्यान गुन्हेगारी सोडून चांगल्या जीवनासाठी कोणत्या उपाययोजना सांगितल्या गेल्या पाहिजेत? यावर अभ्यास झाल्यास गुन्हेगारी कमी व्हायला निश्चित मदत होईल. समुपदेशनानंतर गुन्हेगाराला समाजात यशस्वी होण्यासाठी काही ठोस उपाययोजना अमलात आणणे आवश्यक असते. गुन्हेगाराला शिक्षण आणि रोजगार व्यावसायिक प्रशिक्षण कारागृहात असताना किंवा बाहेर आल्यावर कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभ्यासक्रम पूर्ण करायला लावणे. गुन्हेगाराला नोकरी शोधण्यास मदत करणे अथवा आधीच्या कामाच्या ठिकाणी पुन्हा रुजू होण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करणे. सामाजिक आधार तसेच सकारात्मक आधार गट व्यसनमुक्ती किंवा गुन्हेगारी वृत्ती सोडलेल्या लोकांच्या समूहात सामील होण्यासाठी गुन्हेगाराला प्रोत्साहित करणे. कुटुंबाशी संवाद साधून तुटलेले नातेसंबंध पुन्हा जोडण्यास त्यांना मदत करणे जेणेकरून गुन्हेगार सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल. गुन्हेगारांचे मानसिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी नियमित समुपदेशन देत राहणे तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही नियमितपणे मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा समुपदेशकाशी संपर्क ठेवण्यास सांगणे. व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे. अमली पदार्थांचे व्यसन असल्यास, त्यावरील उपचारांसाठी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होण्यास मदत करणे हा सर्व या प्रक्रियेचा भाग आहे. गुन्हेगाराच्या विश्रांती आणि सकारात्मक छंद यावर काम करणे क्रमप्राप्त आहे.

खेळ, कला, संगीत किंवा वाचन यांसारख्या सकारात्मक छंदांमध्ये मन रमवण्यासाठी प्रोत्साहित करणे. गुन्हेगाराला तणाव व्यवस्थापन समजावून सांगणे जसे की ध्यान किंवा योगासने नियमितपणे करण्यासाठी, अध्यात्मिक गोडी लागण्यासाठी मार्गदर्शन करणे. गुन्हेगारांचे समुपदेशन हा एक दीर्घकालीन, मात्र अत्यंत प्रभावी उपाय आहे. गुन्हेगाराला शिक्षा देण्याबरोबरच त्याला मानसिक आधार देऊन, त्याच्या विचारांना योग्य दिशा देऊन आणि त्याला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत करूनच एका सुरक्षित आणि सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकते. कोणीही जन्मजात गुन्हेगार नसतो तर परिस्थिती, काही कारणास्तव स्वतःवरील सुटलेला ताबा, चुकीची संगत यामुळे तो गुन्हेगार बनतो. अनेकदा आपण पाहतो जामिनावर सुटलेले, पे रोलवर बाहेर आलेले, तडीपार केलेले गुन्हेगाराच पुन्हा गुन्हा करण्यात सक्रिय असतात तसेच ते इतरांना शक्यतो लहान अथवा तरुण मुलांना सुद्धा काही प्रलोभने दाखवून गुन्ह्यात सहभागी व्हायला उत्तेजित करतात. अशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते आणि नंतर ती नियंत्रणा बाहेर जाते. या गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्यासाठी समुपदेशन हे प्रभावी माध्यम आहे.

-मीनाक्षी जगदाळे

Comments
Add Comment