मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि त्याठिकाणी दोन नवीन पूल उभारणीला आता गती देण्यात येत असून या कामांसाठी आता महापालिकेने तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्प कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून या पुलांच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्यावतीने केला जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने उत्तर मुंबईतील महत्त्वाच्या रस्ते जोडणी व पूल प्रकल्पांसाठी सुमारे २२०० कोटींची निविदा प्रक्रिया जाहीर केली आहे. याआधी विलंब झालेल्या या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता गती मिळाली आहे. या प्रकल्पांत रामचंद्र नाल्यावर पूल बांधकाम (एमडीपी रोड ते रायन इंटरनॅशनल स्कूलला जोडणारा), लगून रोड ते इन्फिनिटी मॉल जोडणारा पूल, तसेच महाकाली जंक्शन ते चारकोप नाका पर्यंत मालाड–मार्वे रोड रुंदीकरण व मीठ चौकीजवळील नाले सुधारणा या कामांचा समावेश आहे. या कामांच्या निविदाची जाहिरात महापालिका पूल विभागाने प्रकाशित केली आहे.
आगामी कोस्टल रोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मीठ चौकी व एव्हरशाईन नगर भागातील वाहतूक व्यवस्थापनासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. इतर प्रकल्पांसह या प्रस्तावांचा नियमित आढावा घेत पीयूष गोयल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना प्रक्रिया लवकर पूर्ण करून शक्य तितक्या लवकर कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. परिणामी, हे प्रकल्प आता निविदा प्रक्रियेपर्यंत पोहोचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, महापालिकेने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निविदा काढल्या. यामध्ये कोस्टल रोडला मार्वे रोडशी जोडणारा नवीन ट्रॅफिक आर्म, तसेच दोन नवीन पूल उभारणीचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार असल्याचा विश्वास उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. हा प्रकल्प केवळ उत्तर मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील नागरिकांसाठीही लाभदायी ठरेल आणि प्रवास अधिक वेगवान व सुलभ होईल,असाही विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.MUNICIPAL