Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

फिलिपीन्सला भूंकपाचा मोठा तडाखा, अनेक इमारती कोसळल्या, २० जणांचा मृत्यू

फिलिपीन्सला भूंकपाचा मोठा तडाखा, अनेक इमारती कोसळल्या, २० जणांचा मृत्यू

मनिला: फिलीपीन्समध्ये मंगळवारी ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप आला. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत तसेच यात कमीत कमी २० जणांचा मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याची माहिती दिली. भूकंपाचा केंद्र आणि प्रभावित क्षेत्राबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार भूकंपामध्ये मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार दुपारच्या सुमारास अनेक भागांमध्ये भूकंपाचे मोठे झटके जाणवले. यात लोकांमध्ये एकच गोंधळ झाला. अनेक लोक घर-कार्यालयांच्या बाहेर आले. भूकंपाचे झटके इतके तीव्र होते की खासकरून अनेक जुन्या इमारती कोसळल्या. यात ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले.

भूकंपाच्या तीव्रतेमुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. अंधार आणि भूकंपाचे आफ्टरशॉक येत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. सेबूच्या गव्हर्नरने लोकांना शांत राहण्याचे आणि कोसळणाऱ्या वास्तू व भिंतींपासून दूर, मोकळ्या जागेत राहण्याचे आवाहन केले आहे.

फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सीस्मोलॉजीने सुरुवातीला त्सुनामीचा किरकोळ धोक वर्तवला होता आणि किनारी भागातील लोकांना दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, नंतर पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.

फिलीपिन्स हा देश भूगर्भीयरीत्या पॅसिफिक 'रिंग ऑफ फायर' (Pacific 'Ring of Fire') या क्षेत्रात मोडतो. यामुळे येथे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होणे ही एक सामान्य घटना आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांचा आणि नुकसानीचा नेमका आकडा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment