
मुंबई : प्रसिद्ध विनोदी कलाकार, दिग्दर्शक आणि अभिनेता सारंग साठ्ये याने त्याची १२ वर्षांची साथीदार पॉला हिच्याशी विवाह केला आहे. २८ सप्टेंबर २०२५ रोजी, परदेशातील Deep Cove या निसर्गरम्य ठिकाणी, अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला दोघांचे निकटवर्तीय आणि काही निवडक मित्रमंडळी उपस्थित होती.
सारंगने हा खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, लग्नाचे काही निवडक फोटो आणि भावनिक कॅप्शनसह लागणीची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
सारंगने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “हो, आम्ही लग्न केलं! आपणा सर्वांना माहिती आहे की लग्न कधीच आमच्या आयुष्यात प्राधान्याचं नव्हतं. मात्र, आम्हाला वेगळं ठेवू शकणारी एकमेव गोष्ट होती कागदाचा तुकडा. मागचं वर्ष अत्यंत आव्हानात्मक होतं. जगभर पसरलेल्या द्वेषाच्या सावटामुळे आम्हालाही पहिल्यांदाच भीती वाटली. पण प्रेम हेच खरं, आणि ते नेहमीच द्वेषावर मात करतं.”
तसेच पुढे म्हणाला, “आमच्या प्रेमाला आणि मैत्रीला एक अधिकृत रूप देण्यासाठी आम्ही २८ सप्टेंबर २०२५ रोजी लग्नगाठ बांधली. आमच्या आवडत्या झाडाखाली, निसर्गाच्या सान्निध्यात, आम्ही गाणी गायली, एकमेकांना शब्द दिले आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचा संकल्प केला. ही आमची छोटीशी, पण खूप खास गोष्ट आहे प्रेम नेहमीच विजयी होतं!”
सारंगच्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री प्रिया बापटने, “तुमच्यासाठी खूप आनंदी आहे! प्रेम आणि शुभेच्छा!” असे लिहिले. त्याचप्रमाणे सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, क्षिती जोग, अभिजीत खांडकेकर, नेहा पेंडसे, सौरभ चौघुले आणि इतर अनेक कलाकारांनी दोघांना शुभेच्छा दिल्या.
सारंग आणि पॉला यांनी मिळून ‘भाडिपा’ नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते. आज ते केवळ वैयक्तिक जोडीदार नसून, व्यावसायिक भागीदारही आहेत. त्यांच्या सहकार्याने अनेक डिजिटल प्रकल्प साकारले गेले आहेत, जे तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले.
१२ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीने, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रेम, विश्वास आणि मैत्री यांची नव्याने जाणीव करून दिली आहे.