Tuesday, September 30, 2025

पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ कधी सुरु होणार? एमएसआरडीसीने सांगितलं...

पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ कधी सुरु होणार? एमएसआरडीसीने सांगितलं...

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या प्रकल्पावरील प्रकाश यंत्रणेचे आणि उर्वरित तांत्रिक काम पूर्ण करून विविध विभागांमार्फत चाचण्या घेण्यात येणार आहेत. येत्या डिसेंबर महिनाअखेरपर्यंत सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण करून नववर्षाच्या सुरुवातीलाच मिसिंग लिंक खुला करण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई या दोन शहरातील प्रवासाचा कालावधी द्रुतगती मार्गामुळे कमी झाला असताना, आता आणखी एक मोठी झेप घेण्यास सज्ज आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे, तसेच प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार असल्याची माहिती पुणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) देण्यात आली. ‘एमएसआरडीसी’ने सात वर्षांपूर्वी (मार्च २०१९) सुमारे १३.३ किलोमीटर लांबी असलेल्या, आठ मार्गिकांसह नियंत्रित प्रवेश असलेला मिसिंग लिंक हा प्रकल्प हाती घेतला. परंतु, कोरोना प्रादुर्भाव, खडकाळ आणि खडतर भूप्रदेश आणि बांधकामाचा विशाल स्तर यामुळे या प्रकल्पाला चार वेळा मुदतवाढ द्यावी लागली. परंतु, आता या प्रकल्पाचे काम ९६ टक्क्यांहून अधिक झाले असून अंतिम टप्प्यात आहे.

प्रकल्पातील भुयारी मार्ग आणि पहिला ‘व्हायाडक्ट’ मार्गांचे काम संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यानुसार भुयारी मार्गात पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षितता, वायुविजन, देखरेख यंत्रणा आणि आपत्कालीन, निर्गमन मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या सुरक्षा तपासण्यांना सुरुवात झाली आहे. याशिवाय, अनिवार्य प्रमाणपत्रे आणि पर्यावरणीय परवानगी मिळवण्याचे कामही प्रगतिपथावर असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

‘हा मार्ग लोणावळा-खंडाळा घाटातील गर्दी आणि अपघातप्रवण भागाला वळसा घालणारा आहे. त्यामुळे प्रवासातील अंतर सुमारे सहा किलोमीटरने वाचणार आहे. तसेच, वाहनांना ताशी १२० किलोमीटर वेग साधता येणे शक्य होणार असून, दोन्ही शहरातील प्रवास सुलभ आणि गतिशील होऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याचा ठरेल,’ असेही वसईकर यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >