
क्वेट्टा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे मंगळवारी दुपारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात दहा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि ३० पेक्षा जास्त जखमी झाले. क्वेटामधील झरघुन रोडवरील एफसी (फ्रंटिअर कॉर्प्स) मुख्यालयाच्या कोपऱ्यावर हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज काही किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे आसपासच्या अनेक इमारतींच्या आणि वाहनांच्या काचा फुटल्या.
आत्मघातकी स्फोटानंतर लगेच घटनास्थळावरुन गोळीबाराचा आवाज ऐकू आला. थोडा वेळ गोळीबाराचा आवाज येत होता. आधीच स्फोटामुळे सर्वत्र धूर पसरला होता आणि व्यवस्थित दिसत नव्हते, त्याचवेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. थोडा वेळ सर्वजण गोंधळले होते. नंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे पथक, रुग्णवाहिका आले आणि सर्व जखमींना वेगाने रुग्णालयात नेण्यास सुरुवात झाली.
क्वेट्टातील घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पोलिसांनी स्फोट प्रकरणी तपास सुरू केला आहे. परिसरातील कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्फोटकांनी भरलेले वाहन मॉडेल टाऊन येथून फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयाजवळ आले आणि स्फोट झाला असे काही फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
जखमींना सिव्हिल हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला आणि घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर आणखी काही जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या वाढली आहे.