
महाराष्ट्रातील दक्षिण भाग, विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने दहशत माजवली. २३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेती, जनजीवन आणि पायाभूत सुविधा यांचा विचका केला. हवामान विभागाने २३ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परतीच्या पावसाच्या रूपात आलेल्या या अवकाळीने शेतकऱ्यांच्या टाळूवर हात ठेवला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आठवड्यातील घडामोडी आणि त्यांचे परिणाम यांचा आढावा घेताना, हा पाऊस केवळ नैसर्गिक संकट नसून, हवामान बदलाचा जागतिक प्रभाव स्थानिक पातळीवर खोलवर दाखवतो आहे.
सप्टेंबरपर्यंत दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडत होता. २३ तारखेपासून परिस्थिती गंभीर झाली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने पश्चिमेकडे सरकत महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आणि मैदानी भागात मुसळधार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात २४ तारखेला ६८ पैकी २१ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली. मिरज आणि तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला, ज्यामुळे कांदा,द्राक्ष आणि सोयाबीन, मका, मूग, उडीद, बाजरी, मटकीसारख्या खरीप आणि कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. बांधावर जाऊन पाहणीनंतर आमदार रोहित आर. पाटील यांनी नमूद केले की, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, जिल्हाधिकारी आणि कृषी आयुक्तांशी बोलणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. द्राक्षबागांवर छाटणीनंतर आलेल्या पावसाने दावण्या आणि करपा रोगाची शक्यता वाढवली असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुहास बाबर यांनी आपापल्या तालुक्यातील नुकसानभरपाईसाठी कृषी आणि महसूल विभागाला सक्रिय केले.
सातारा जिल्ह्यातही अवकाळीने हाहाकार माजवला. दुष्काळग्रस्त माण तालुक्यात २७ तारखेला मुसळधार पावसाने माणगंगा नदीला पूर आणला. म्हसवड शहरात रस्ते बुडाले, वीजपुरवठा खंडित झाला आणि शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. कोयना धरण क्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळला, ज्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढली आणि विसर्गाची शक्यता निर्माण झाली. महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी पावसाने झोडपून काढले, ज्यामुळे रस्ते बंद पडले आणि प्रवाशांना अडकण्याची वेळ आली. जिल्ह्यातील १५० हून अधिक गावांवर परिणाम झाला असून, जनावरांचे मृत्यू आणि पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर होती. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली. २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान अतिमुसळधार पावसाने तसेच परवा रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने ओढे-नाले फुटले, अनेक गावांचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले; ऊस, भात आणि भाजीपाला पिके पाण्यात बुडाली. सातारा, कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, काही मार्ग बंद पडले. या अवकाळीचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम प्रचंड आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्रात ५० हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, लाखो शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. ऊस कारखान्यांना गाळप वेळेवर होण्यात अडचणी येत आहेत, तर द्राक्ष उत्पादकांना निर्यात बाजारपेठेस धक्का बसणार आहे. जनावरांचे मृत्यू सुमारे ५०० वर पोहोचले असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढली आहे. रस्ते, पूल आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधा धडकून पडल्या, ज्यामुळे शाळा-कॉलेजं बंद पडली आणि परीक्षा रद्द झाल्या. नोकरीसाठी परीक्षेच्या उमेदवारांना पावसामुळे प्रवासात अडचणी आल्या.
सरकारी पातळीवर तातडीची मदत सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांनी पंचनामा करून नुकसानभरपाईची प्रक्रिया हाती घेतली असून, मुख्यमंत्री मदत निधीतून प्रति हेक्टर ५००० ते १०००० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असून, आपत्ती नियोजन केंद्र सक्रिय आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी मदतीची रक्कम अपुरी असल्याचे सांगितले आहे. हवामान अभ्यासकांनी २७ ते ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला असून, शेतीसाठी सल्ला दिला आहे. हा अवकाळी पाऊस म्हणजे हवामान बदलाचा इशारा आहे. गेल्या काही वर्षांत अशी संकटे वाढली असून, शेतकऱ्यांना हवामानस्नेही शेतीकडे वळावे लागेल. धरण व्यवस्थापन आणि पूर्वसूचना यावर भर देणे गरजेचे आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांनी या संकटातून सावध होऊन भविष्यातील तयारी करावी. यंदा पावसाने जो काही फटका दिला आहे, शेतकऱ्यांच्या कंबरड्यावर बसलेल्या या फटक्याला धीर देऊन, नव्या आशेने पुढे जाण्याची वेळ आली आहे.
भविष्यातील आव्हान हवामान बदलामुळे पावसाच्या पद्धतीत अनिश्चितता वाढली आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, पूर आणि दुष्काळ यांची वारंवारिता वाढली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूरसारख्या शेतीप्रधान भागांना हवामानस्नेही शेती पद्धती, सुधारित धरण व्यवस्थापन आणि अचूक हवामान अंदाज यांची गरज आहे. पीक विमा योजना अधिक प्रभावी करणे, जलसंधारण प्रकल्प राबवणे आणि शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर पाण्याचा निचरा आणि पूर नियंत्रणासाठी पायाभूत सुविधा बळकट कराव्या लागतील. पण, यासाठी जागृतपणे धोरणे अमलात येण्यासाठी नेत्यांचा सर्वपक्षीय दबावगट देखील कार्यरत करावा लागेल. महापूर, दुष्काळ आणि अवकाळी हे तिसरे आव्हान बनत आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी तितकी जागृती नव्याने निर्माण करावी लागेल.
-प्रतिनिधी