तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ३३ चिनी विमानांचा आणि आठ जहाजांचा ताफा तैवान जवळच्या समुद्रात आला असल्याची माहिती दिली. यापैकी तीन जहाजांचा ताफा प्रचंड वेगाने तैवान जवळ येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.
याआधीही चिनी विमानांच्या आणि जहाजांच्या ताफ्याने तैवानजवळ जाऊन धमकावण्याचे प्रकार केले आहे. चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई सीमेत घुसखोरी करण्याचे प्रकार तर अधूनमधून घडत असतात. पण यावेळी मोठा ताफा एकत्रित स्वरुपात तैवानच्या दिशेने येत आहे. यामुळे तैवानची संरक्षण यंत्रणा सतर्क झाली आहे. चीन आणि तैवान दरम्यानच्या सागरी सीमेवर हालचालींना वेग आला आहे. राजधानीचे शहर असलेल्या तैपेईत तणावाचे वातावरण आहे.
तैवान स्वतःला अधिकृत चीन म्हणवतो तर चीनमधील कम्युनिस्ट सरकार हे ते ज्या देशाचे नेतृत्व करतात तोच अधिकृत चीन असल्याचे सांगतात. तैवान हा चीनचाच भाग आहे, असेही बीजिंगमधील कम्युनिसट सरकारचे म्हणणे आहे. याच मुद्यावरुन चीन आणि तैवान यांच्यात वाद आहे. या पार्श्वभूमीवर चिनी हालचालींमुळे तैवानमध्ये तणाव आहे.