Tuesday, September 30, 2025

ST Transport Fare Increase : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीत प्रवास थेट १०% महागणार; चाकरमान्यांच्या खिशाला मोठा फटका, शिवनेरी ते...

ST Transport Fare Increase : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीत प्रवास थेट १०% महागणार; चाकरमान्यांच्या खिशाला मोठा फटका, शिवनेरी ते...

मुंबई : सध्या राज्यात सणासुदीचा काळ सुरू आहे. विशेषतः दिवाळी तोंडावर आल्यामुळे मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत नोकरी आणि कामासाठी आलेले लाखो चाकरमानी आपल्या गावी जाण्याची तयारी करत आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे पर्यटनाचा देखील प्लॅन करतात. याच ऐन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने (MSRTC) एक मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आता एसटीने प्रवास करणे महागणार आहे. महामंडळाने तिकिट दरात वाढ केल्यामुळे, दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच सुट्टीमध्ये बाहेर फिरायला जाणाऱ्या कुटुंबांनाही आता जास्त खर्च करावा लागणार आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या दरवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये थोडी नाराजी पसरली असून, दिवाळीचा प्रवास आता जास्त खर्चिक ठरणार आहे.

काय आहे नेमका निर्णय?

सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना एसटी महामंडळाने भाडेवाढीचा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने (MSRTC) दिवाळीच्या निमित्ताने तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दरवाढीचा निर्णय एका विशिष्ट कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवाशांना या दिवसांमध्ये प्रवास करताना जास्त पैसे मोजावे लागतील. ही १०% भाडेवाढ येत्या १५ ऑक्टोबरपासून ते ५ नोव्हेंबर या २२ दिवसांच्या कालावधीसाठी लागू असेल. महत्त्वाचे म्हणजे, महामंडळाच्या सर्वच बसेससाठी ही भाडेवाढ लागू होणार नाही. 'शिवनेरी' आणि 'शिवाई' या बसेस वगळता, इतर सर्व साध्या, जलद आणि निम-आरामदायक बसेससाठी ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.

एसटी महामंडळाचा महसूल वाढवण्याचा 'मास्टर प्लॅन'

दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाची खऱ्या अर्थाने मोठी परीक्षा असते. कारण या सणासुदीच्या काळात राज्यभरातील चाकरमानी आपापल्या मूळ गावी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. शाळांना सुट्ट्या असल्याने आणि नागरिक गावी जात असल्याने, बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडते. या काळात एसटी महामंडळ लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करते. याच काळात महामंडळाच्या महसुलात मोठी वाढ होते. प्रवाशांचा हा वाढता ओघ आणि दिवाळीतील मागणी लक्षात घेता, एसटी महामंडळाने आपल्या तिजोरीत आणखी वाढ व्हावी या उद्देशाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची संख्या वाढते, त्या प्रमाणात महसूल वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महामंडळाला अतिरिक्त आर्थिक पाठबळ मिळेल.

प्रवाशांवर दरवाढीचा भार

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. महामंडळाच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने, एसटीला सातत्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या आर्थिक अडचणींमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा महामंडळासाठी नेहमीच एक मोठी अडचण ठरलेला आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी हे तुटपुंज्या पगारावर काम करतात, असा दावा वारंवार केला जातो. कर्मचाऱ्यांच्या पगार आणि सुविधांच्या प्रश्नामुळे एसटी महामंडळाला अनेकदा संपासारख्या परिस्थितीलाही सामोरे जावे लागले आहे. या गंभीर आर्थिक पार्श्वभूमीवर, महामंडळाचा महसूल वाढवून आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याचा प्रयत्न म्हणून ही भाडेवाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांचा ओघ वाढलेला असताना ही दरवाढ करून जास्तीत जास्त महसूल गोळा करण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट आहे. मात्र, महामंडळाच्या या प्रयत्नामुळे आता सामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे. महामंडळाच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दरवाढीचा भार सामान्य नागरिकांना सोसावा लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >