Tuesday, September 30, 2025

Ashish Shelar : गांधी-शास्त्रींचे दुर्मिळ दस्तऐवज खुले! सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते मुलुंडमधील प्रदर्शनाचे उद्घाटन

Ashish Shelar : गांधी-शास्त्रींचे दुर्मिळ दस्तऐवज खुले! सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते मुलुंडमधील प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने आयोजित केलेल्या एका विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघामध्ये आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित अत्यंत दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रे आणि छायाचित्रे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाचा पुराभिलेख संचालनालय (Directorate of Archives) 'सेवा सप्ताह' निमित्ताने हे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरिकांना खास आवाहन केले.

"राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची दस्तऐवजे प्रदर्शनामध्ये सर्वसामान्यांसाठी शासनाने खुली केली आहेत. आपली ही ऐतिहासिक विरासत जास्तीत जास्त नागरिकांनी नक्की पहावी," असे आवाहन मंत्री शेलार यांनी केले. या प्रदर्शनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी संबंधित अनेक दुर्मिळ वस्तू मांडण्यात आल्या आहेत. दुर्मीळ छायाचित्रे, महत्त्वाची पत्रे, काही इतर आवश्यक कागदपत्रे या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, पुराभिलेखागार विभागाचे संचालक सुजीत उगले आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री शेलार यांनी यावेळी महाराष्ट्राच्या पुराभिलेख समृद्धीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "राज्य शासनाकडे एकूण साडे सतरा कोटी (१७.५ कोटी) इतकी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत आणि कागदपत्रांच्या दृष्टीने महाराष्ट्र अत्यंत समृद्ध आहे." ही महत्त्वाची कागदपत्रे योग्य पद्धतीने जतन व्हावीत, यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, शासन वांद्रे-कुर्ला संकुलात पुराभिलेख भवन उभे करत आहे. हे भवन पूर्ण झाल्यावर ही कागदपत्रे अभ्यासकांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >