
मी योगिनी :डॉ. वैशाली दाबके
योगविषयक संकल्पनांमध्ये पंचकोश ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. पातंजल योगसूत्रांमध्ये पंचकोश संकल्पनेचा निर्देश नाही. मात्र पतंजलींच्या योगसूत्रांचा स्रोत असलेल्या उपनिषदांमध्ये पंचकोश संकल्पना दिसते. उपनिषदांपैकी तैत्तिरीय उपनिषदात ब्रह्मानंदवल्लीमध्ये ही संकल्पना वरुण आणि भृगू यांच्या संवादात्मक कथेतून रंजक पद्धतीने स्पष्ट केली आहे.
ती गोष्ट अशी - एकदा भृगू आपल्या पित्याकडे वरुणाकडे गेले आणि म्हणाले, 'भगवंत मला ब्रह्म म्हणजे काय ते शिकवा.' वरुण म्हणाले, 'ज्याच्यापासून हे प्राणिमात्र निर्माण होतात, ज्याच्यामुळे जिवंत राहतात आणि ज्याच्यामध्ये पुन्हा लय पावतात ते ब्रह्म होय.' अशारीतीने ब्रह्माचं लक्षण सांगून वरुणांनी सांगितलं, 'तू तप कर आणि ब्रह्म म्हणजे काय ते जाण.' भृगूंनी तप केलं. ते वरुणांकडे परत आले आणि म्हणाले, 'मला ब्रह्म समजलं. अन्न म्हणजे ब्रह्म होय.' वरुण म्हणाले, 'तू पुन्हा तप कर. भृगूंनी पुन्हा तप केलं, त्यांनी पुन्हा वरुणाकडे येऊन सांगितलं की प्राण म्हणजे ब्रह्म होय. अशा रीतीने पुन्हा तीन वेळा वरुणांच्या सांगण्यावरून भृगूंनी तप केलं आणि क्रमाक्रमानं मन, विज्ञान आणि आनंद म्हणजे ब्रह्म असं जाणलं. आनंद म्हणजे ब्रह्म हे जाणल्यावर भृगू पुन्हा वरुणाकडे आले नाहीत कारण ब्रह्म हे आनंदस्वरूप आहे याचा त्यांनी अनुभव घेतला.
वरकरणी ही साधी गोष्ट दिसली तरी या गोष्टीतून, भृगूंना पंचकोश म्हणजेच अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या कोशांचं ज्ञान कसं झालं ते अतिशय कौशल्यानं मांडलं आहे.
आपल्याला दिसणारं आपलं शरीर हेच निव्वळ आपलं अस्तित्व नाही तर आपलं अस्तित्व इतर अनेक स्तरांशी जोडलेलं आहे. पंचज्ञानेंद्रियांना न दिसणारी आवरणं आपल्या शरीराभोवती आहेत. या सूक्ष्म आवरणांनाच ऋषींनी उपनिषदांमध्ये कोश असं म्हटलं आहे. हे कोश पुढीलप्रमाणे –
१. अन्नमयकोश - म्हणजे अन्नामुळे जगणारं, पुष्ट होणारं आणि पुन्हा अन्नाशीच एकरूप होणारं आपलं शरीर. थोडक्यात शरीर म्हणजे अन्नमय कोश. याच कोशाचं ज्ञान भृगूंना प्रथम झालं.
२. प्राणमयकोश - म्हणजे आपल्या शरीरातील प्राणशक्ती. नित्य चालू असणाऱ्या आपल्या श्वासोच्छ्सातून ही शक्ती आपण अनुभवत असतो. अन्नमयकोशाच्या पलीकडे असलेलं आणि त्याहून सूक्ष्म असलेलं प्राणमय शरीर प्राणऊर्जेनं तयार झालेलं असतं. तोच प्राणमय कोश होय.
३. मनोमयकोश - म्हणजे मन. प्राणमयकोशापेक्षा मनोमयकोश सूक्ष्म आणि बलशाली असतो. मनात सतत विचाररूपी वृत्ती निर्माण होत असतात आणि लय पावत असतात. संकल्प आणि विकल्प करणे हे या कोशाचं कार्य आहे. मनाची जशी घडण असेल तशीच कृती शारीरस्तरावर म्हणजे अन्नमय कोशात घडत असते.
४. विज्ञानमयकोश - मनोमयकोशाच्या पलीकडे विज्ञानमय कोश आहे. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. योग्य-अयोग्य, चांगले-वाईट यांमधील भेद जाणण्याचे म्हणजेच विवेकज्ञान निर्माण करणं आणि निर्णय घेणं हे या कोशाचे कार्य आहे.
५. आनंदमयकोश- वरील चारही कोशांच्या पलीकडे असलेला, त्यांच्यापेक्षा अधिक सूक्ष्म आणि बलशाली कोश म्हणजे आनंदमय कोश. आनंद म्हणजे क्षुल्लक बाह्य गोष्टीतून मिळणारा आनंद नाही तर विवेकज्ञानातून प्रकट होणारा स्व-रूपाचा अनुभव आहे. आनंदमयकोशाच्या पलीकडे शुद्ध चैतन्य म्हणजेच ब्रह्म आहे. ब्रह्मालाही आनंद असंच म्हणतात. ब्रह्मसाक्षात्कारामुळे सगळीकडे एकच ईश्वरी तत्त्व भरून राहिलं आहे हे अनुभवाला येतं. मानवी अनुभवांपैकी ही उच्चतम अवस्था आहे. या अनुभवामध्ये आनंदाव्यतिरिक्त इतर कुठलाही भावना राहात नाही. योगी, संत या परमानंदाचा नित्य अनुभव घेत असतात. विशुद्ध, अलौकिक परमानंद म्हणतात ती हीच अवस्था. पंचज्ञानेंद्रियांना अनुभवाला येणाऱ्या मूर्त अशा अन्नमय-कोशापासून ते आनंदमय-कोशापर्यंतचा व त्याही पलीकडचा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे नेणारा आहे. हे पाच कोश विशेषतः पहिले चार कोश एकमेकांशी अधिक संलग्न आहेत. यांपैकी एकाही कोशाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाला की त्याचा परिणाम इतर कोशांवर होतो. जसं मन उदास असलं म्हणजेच मनोमयकोश योग्य कार्य करत नसेल तर त्याचा परिणाम प्राणमय तसेच अन्नमयकोशावर होतो.
मन शांत असेल तर श्वास अगदी नियमित, शरीरही स्वस्थ असतं अर्थात प्राणमय आणि अन्नमय कोश व्यवस्थित काम करतात हा अनुभव आपल्याला नेहमीच येतो. अलीकडे कितीतरी रोग मनोकायिक आहेत असं वैद्यकशास्त्र सांगतं. याचाच अर्थ रोग मनोमयकोशात उत्पन्न होतो. त्यामुळे प्राणमयकोश असंतुलित होतो आणि त्याचा परिणाम शरीरावर म्हणजे अन्नमयकोशावर होतो. याउलट अन्नमयकोशाचे कार्य बिघडले की त्याचा परिणाम प्राणमय आणि मनोमय कोशावरही होतो. या तीन कोशांचे कार्य सुरळीत नसेल, तर विज्ञानमय कोशाचेही संतुलन ढळतं म्हणजेच आपली विचारशक्ती क्षीण होते.
म्हणूनच एकात्मक (Holistic) योगोपचार पद्धतीमध्ये मनोमयकोशासाठी अंतरंग साधना, प्राणमयकोशासाठी प्राणायाम आणि अन्नमयकोशासाठी आसनं, योग्य आहार, शिथिलीकरण इत्यादी उपाय सांगितले आहेत. अशारीतीने आपलं व्यक्तित्व म्हणजे केवळ बाह्यशरीर नाही तर पंचकोशात्मक अस्तित्व आहे आणि याचं संतुलन म्हणजेच सर्वांगीण संतुलन असं ही संकल्पना स्पष्ट करते.