
वैशाली गायकवाड
कर्तृत्ववान ती राज्ञी : रूपाली भोसले - पाटोळे
सुप्रभात मैत्रिणींनो, आज आपण शिल्पकलेतून निर्जीव गोष्टींचे सगुण रूप साकारत निसर्ग संवर्धनासोबत सामाजिक भान जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व रूपाली भोसले पाटोळे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
बालपणीच एका अपघाताने आई-वडिलांचे छत्र हरपले असताना जिद्द, सातत्य, संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करत कलासक्त असणाऱ्या रूपालीताईंनी स्वतः सोबत अनेकांना घडविले. शाळेत असतानाच प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या कायम अग्रेसर होत्या. त्यामुळे तिथेच त्यांचा नेतृत्व गुण विकसित झाला. महाविद्यालयात त्यांनी आर्ट या शाखेत प्रवेश मिळवून सायकॉलॉजीमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी मास्टर ऑफ पॉटरी ही पदवी बंगळूरु येथे जाऊन मिळवली. तिथे ५५ मुलांमध्ये त्या एकट्याच मुलगी होत्या. दगड, माती , लाकूड या सगळ्या आव्हानात्मक गोष्टींमध्ये या मुलीचा निभाव कसा लागणार अशा पद्धतींच्या सगळ्या प्रश्नांना स्वतःच्या शिक्षणाने रूपालीताईंनी चोख उत्तर दिले. या शिक्षणासाठी त्यांना कॅनरा बँकेतर्फे सहकार्य मिळाल्याचे त्या आवर्जून सांगतात.
त्यानंतर त्यांनी ठाणे येथे त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळण्यासाठी एक जागा मिळवली. तिथूनच रूपालीताईंचा कलाविष्काराचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या कलेने त्यांना आत्मविश्वास दिला, आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम बनवले; परंतु कला ही स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ताईंनी कैदी महिला, अंध मुलं, मतिमंद मुलांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या कलेने त्यांचे विविध पद्धतीने कौशल्य विकसित केले व या सगळ्या उपक्रमामुळे त्यांच्यातील उत्कृष्ट शिक्षिकेचा त्यांना शोध लागला.
त्यांच्या कलाकुसरीला फायनल टच देणाऱ्या छोटूभाईंमुळे खूप मोठे दालन त्यांच्यासाठी उघडे झाले. अनेक सेलिब्रिटी जॅकी श्रॉफ, मनिषा कोईराला, आशा भोसले, जावेद अख्तर अजूनही अनेक दिग्गज व्यक्तीमत्त्वंाकडून कौतुक होऊन त्यांना अधिकाधिक काम मिळायला लागले. आर्थिक सबलतेमुळे रॉ मटेरियल, मनुष्यबळ यासारखे प्रश्न सहज सुटत गेले. आपल्या कामाबद्दल समर्पित भावना, प्रामाणिकपणा असेल तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर छोटूभाईंसारखी देव माणसं निश्चितच आपल्याला भेटतात असे त्या कृतज्ञतापूर्वक नमूद करतात.
त्यांच्याच क्षेत्रात अधिक उत्कृष्टपणे काम करणाऱे दिग्गज व्यक्तिमत्त्व गौतम पाटोळे यांच्याशी रूपालीताईंचा विवाह झाला व त्यांच्यातील कलाकाराला नवा दृष्टिकोन मिळाला. त्या नवी मुंबईत स्थायिक झाल्या. तिथे गेल्यानंतर तिथल्या कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांनी आणि यजमानांनी अर्बन हार्ट येथे एक आर्ट फेस्टिवल भरवले. यामुळे अनेक दडलेल्या कलाकारांचे कलाविष्कार समाजासमोर आले. आपल्याला अवगत असलेल्या कलेतून सामाजिकदृष्ट्या त्याचा कसा उपयोग होईल या विचारांनी त्यांच्या दोघांचीही वाटचाल चालू होती.
समाजातील गरजू व्यक्तींना किंवा वंचितांना आपल्या शिक्षणाचा उपयोग होऊन त्यांचे आत्मबल वाढवण्यासारखा खरा आनंद आणि समाधान दुसऱ्या कशातच नसल्याचा मंत्र रूपालीताईंना गवसला. या सगळ्या घोडदौडीत रूपालीताई आणि गौतम सरांच्या घरी वीर नावाच्या बाळाचे आगमन झाले. सजीव शिल्प घडवण्याच्या प्रवासात त्या अत्यंत रममाण झाल्या; परंतु त्यांचे कामच सगळीकडे त्यांची ओळख झाल्याने त्यांच्यातील कलाकाराला सहकार्य करत त्यांना नवीन ऑफर्स येऊ लागल्या आणि त्यांनी त्या स्वीकारल्या देखील. हे सगळं करत असताना त्यांना स्वतःला काय हवं हे नेमकं उमगलं.
नवी मुंबईतील आर्ट कॉलेज मधील मुलांना शिकवायला मिळाले व त्याच वेळेस "era of women" या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. या संस्थेद्वारे त्या ग्रीनेशा हा इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचा उपक्रम गेली पंधरा वर्षे राबवत आहेत. भारतीय जवानांसाठी इको फ्रेंडली राख्या बनवल्या, इपीसीएच नावाचा एक्सपोर्ट प्रमोशन ऑफ हँडीक्राफ्ट कौन्सिलमध्ये त्या सहभागी झाल्या, प्रोजेक्ट अफेक्टेड महिलांसाठी त्यांनी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम केले, ग्रुप शोजमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या सगळ्या नंतर एक मोठं आव्हान आलं ते म्हणजे कोविड. कोविडमध्ये सगळं जणू काही ठप्प झालं. त्यांच्या यजमानांना मोठ्या आजारपणाचा सामना करावा लागला. दोघेही कलाकार असल्याने आर्थिक गणितांची खूप बेरीज वजाबाकी झाली; परंतु येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात त्यांच्या कलेने त्यांना पुन्हा एकदा उभं केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यांचे सुशोभीकरण करण्याचं काम त्यांना मिळालं.
नैसर्गिक संवर्धन निसर्गाची जपणूक हा ध्यास असणाऱ्या रूपालीताईंनी कर्जत येथे एक जागा घेऊन तिथे आपल्या संस्कृतीची आपल्या पारंपरिक गोष्टींची जपणूक करत जनजागृती करण्यासाठी ‘रूट्स’ची निर्मिती केली. या स्टुडिओमधून अनेक अँटिक, युनिक गोष्टी जतन केल्या जातात. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला त्या बघायला मिळणे, तिथल्या मूळ अन्नाची चव घ्यायला मिळणे यासारखे दुसरे भाग्य नाही. रूट्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तिथल्या प्रोजेक्ट अफेक्टेड महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे पवित्र कार्य केले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत मुंबई आर्ट गॅलरीचा बेस्ट शिल्पकार पुरस्कार, ललित कला अॅकॅडमी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, विविध सामाजिक संस्था, तसेच राज्यपालांच्या हस्ते देखील त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
आपल्या भारतातील संस्कृती आणि परंपरा जाणून घेत अधिक संशोधन करून भारतातच आपण उत्तम व्यवसाय किंवा नोकरी करू शकत असल्याचे रूपालीताई सांगतात. महिला या ज्ञानी आहेत त्यासोबत त्या प्रगल्भ देखील आहेत. त्यामुळे नव्या जुन्याची सांगड घालत अत्यंत सशक्तरीत्या त्या पुढची पिढी घडवू शकतात. अनेक आव्हाने त्यांच्यापुढे ठेवल्यास त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य प्रत्येकीमध्ये आहे. ते ओळखून सक्षम बनण्याचा सल्ला रूपालीताई सगळ्यांना देतात. भविष्यकालीन संकल्पनेमध्ये आदिवासी पाड्यातील महिलांसाठी त्यांच्या तिथल्या कलाकुसरीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देत निसर्ग संवर्धन करत रस्त्यांचे, शहरांचे सुशोभीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे.
कोणत्याही क्षेत्रात आपण कितीही मोठे झालो किंवा पारंगत झालो तरीही आपली पायमुळं आपल्या मातीशी घट्ट बांधून ठेवण्याचे संस्कार देणारी ही शिल्पकला आणि रूपालीताई सारखे शिल्पकार हे खरोखरच अभिमानास्पद आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास, परंपरा आणि तत्त्वज्ञान याची जाणीव त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून दिसून येते. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून त्यांनी दाखवून दिले आहे की गरीबी, अंधकार, विसर, उपेक्षा या अडथळ्यांवर कला, प्रेम, धैर्य आणि समर्पणाने सहज विजय मिळवता येतो. शिल्पकलेच्या माध्यमातून अनेकांना प्रकाशवाटा दाखवणाऱ्या रूपालीताईंसारख्या संवेदनशील शिल्पकाराला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.