
परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान
नवी मुंबई : दसरा सणासाठी झेंडू, आंब्याच्या डहाळ्या, आपट्याची पाने खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मात्र दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सणासुदीच्या दिवसांत मोठा नफा मिळेल, या आशेवर पावसाने पाणी फेरले आहे. त्यामुळे ऐन दसरा सणाला मोठी मागणी असूनही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे.
राज्यात यंदा झेंडूचे उत्पादन मुबलक प्रमाणात झाल्याने सणासुदीच्या काळात झेंडूला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पदरी निराशा आली आहे. नाशिक, पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील झेंडूची पिके पावसामुळे मोठ्या प्रमाणावर सडली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील फुले गळून पडली, तर काही ठिकाणी झाडेच उन्मळून पडली आहेत. त्यामुळे उत्पादन तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरवर्षी सणासुदीच्या काळात झेंडूच्या क्रेटला ४५० ते ५०० रुपये इतका दर मिळत असतो. यंदा मात्र पावसामुळे झालेल्या हानीमुळे शेतात उगवलेल्या फुलांच्या दर्जावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. अनेक भागांत निम्म्याहून अधिक फुलांची नासाडी झाली असून, उर्वरित फुलांचा दर्जा घसरल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिणामी, झेंडूच्या त्याच क्रेटला घाऊक बाजारात फक्त २०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरी व वाहतूक खर्च भागवणेही कठीण झाले आहे. यातच सणासुदीच्या काळात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेंडूची शेती पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
शहरी भागात झेंडूचे दर गगनाला
झेंडू फुलांचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागात जरी सध्या दर घसरले असले, तरी शहरी बाजारपेठेत चांगल्या प्रतीचा झेंडू कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने झेंडूचे दर गगनाला भिडले आहेत. नवरात्री आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. त्या तुलनेत झेंडूच्या फुलांचा पुरवठा मर्यादित आहे. परिणामी, महिन्याभरापूर्वी ४० रुपये पाव किलोने विकला जाणारा झेंडू सध्या १२०-१६० रुपये पाव किलोने विकला जात आहे. तसेच पुढील काही दिवसांत दर झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यापारी आणि विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
घाऊक बाजारातील फुलांचे दर
झेंडू : ४० रुपये किलो, आता १२० -१६० रुपये किलो मोगरा : १६० रुपये किलो, आता २४० – ३०० रुपये किलो शेवंती : ८० रुपये किलो, आता १५० रुपये किलो चाफा : ४०० रुपये किलो, आता ६००-८०० रुपये किलो गुलाब : १० रुपये १ नग, आता २० रुपये १ नग
शेतकरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीची भरपाई मिळावी, अशी आमची मागणी आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे फुलशेती अधिकच धोक्यात येत असून दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. – राहुल जाधव, झेंडू उत्पादक शेतकरी, सिन्नर