Tuesday, September 30, 2025

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ६ प्रकल्पात नियोजनाचा अभाव; MMRDA वर उभारलेले खांब तोडण्याची वेळ

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ६ प्रकल्पात नियोजनाचा अभाव; MMRDA वर उभारलेले खांब तोडण्याची वेळ

मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन ६ प्रकल्पात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (MMRDA) नियोजनशून्यता चव्हाट्यावर आली आहे. कारशेडच्या स्थानात अचानक बदल झाल्यामुळे कांजुरमार्ग परिसरात आधीच बांधलेले काही मेट्रोचे खांब आता पाडावे लागत असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचे समोर आले आहे.

मेट्रो ६ प्रकल्पात झालेल्या अलाइनमेंट बदलांमुळे उभारलेले काही खांब आता अडथळा ठरत असून, त्यांचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. कारशेडसाठी सुरुवातीला ज्या ठिकाणी जागा निश्चित केली होती, ती बदलून राज्य सरकारने २०२३ मध्ये कांजुरमार्गच्या उत्तरेला नवीन जागा दिली. परिणामी मेट्रो मार्गात तांत्रिक बदल करावे लागले, त्यामुळे आधी उभारलेले खांब पाडावे लागले.

या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे सिव्हिल काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. मात्र कारशेडचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. राज्य सरकार व MMRDA यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे वेळ आणि निधी या दोन्ही बाबतीत प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे.

सुमारे १५.३१ किमी लांबीच्या आणि १३ स्थानकांच्या मेट्रो लाईन ६ प्रकल्पाच्या माध्यमातून अंधेरीच्या स्वामी समर्थ नगरपासून विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत जोडणी होणार आहे. हा मार्ग जेव्हीएलआर आणि पवई तलावावरून जाणार असून, या मार्गाची संपूर्ण उभारणी MMRDA करत आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ६,७०० कोटी रुपये आहे.

२०२५ मध्ये मुंबई उच्चन्यायालयाने कांजुरमार्गच्या नवीन जागेवर कारशेड उभारणीस परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पूर्णता पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक निधीचा असा अपव्यय होत असल्याने आता MMRDA वर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

एकूणच मुंबईत आधुनिक सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे उभारले जात असले, तरी नियोजनातील त्रुटी आणि गैरव्यवस्थापनामुळे हे प्रकल्प वेळेत आणि खर्चात पूर्ण होण्याच्या दिशेने न सरकता मागे जात आहेत. मेट्रो लाईन ६ हे त्याचेच ताजे उदाहरण आहे.

Comments
Add Comment