
चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण दुर्घटना घडली. वीज केंद्रातील बांधकाम सुरू असलेली एक मोठी पोलादी कमान (Arch) कोसळल्याने नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून, सुमारे १० हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ९ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व कामगार उत्तर भारतातील स्थलांतरित मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या १० हून अधिक कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
बचाव कार्य
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले असून, कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून मृतदेह आणि जखमी कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक पोलीस आणि महसूल अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेच्या कारणांचा तपास करत आहेत.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या दुर्घटनेमुळे वीज केंद्राच्या बांधकाम स्थळांवरील सुरक्षा मानकांवर आणि कामगारांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.