Tuesday, September 30, 2025

लता मंगेशकर यांच्या नावाने पुण्यात आशियातील सर्वात मोठ्या रुग्णालयाची उभारणी

लता मंगेशकर यांच्या नावाने पुण्यात आशियातील सर्वात मोठ्या रुग्णालयाची उभारणी

‘मी लता दीनानाथ’ या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांची घोषणा

पुणे : ‘पुढील वर्षी लता मंगेशकर यांच्या नावाने पुण्यामध्ये चाळीस एकर परिसरात आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारण्यात येणार आहे,’ असे ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

लता मंगेशकर यांच्या ९६व्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘मी लता दीनानाथ’ या लतादीदींच्या लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांच्या सादरीकरण कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांनी ही घोषणा केली. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री प्राजक्ता माळी, सुशील कुलकर्णी, शिरीष रायरीकर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने गायिका मधुरा दातार यांना ‘दीदी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

‘लतादीदींनी बाबांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून दीनानाथ मंगेशकर रूग्णालय नावाचे रोपटे लावले. आता त्याचा मोठा विस्तार झाला आहे. पुढच्या वर्षी दीदींच्या नावाने चाळीस एकर परिसरात आशियातील सर्वात मोठे रूग्णालय उभारण्यात येणार आहे. या रूग्णालयात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्यात येणार आहेत,’ असे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

‘मंगेशकर रूग्णालयावर झालेल्या दोषारोपाच्या काळातही रूग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी चोख कामगिरी बजावली. त्यांनी कामात तसूभरही चुकारपणा केला नाही,’ असे मत शेलार यांनी व्यक्त केले. मंगेशकर कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यात मंगेशकर कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. लता मंगेशकर या खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या सांस्कृतिक दूत आहेत. संगीत क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.’

‘मध्यंतरी मंगेशकर रूग्णालयावर अनेकांनी टीका केली. ती का केली हे कळले नाही. मात्र, कुलकर्णी यांनी समोर येत आमची बाजू मांडली,’ अशी भावना मंगेशकर यांनी व्यक्त केली. त्यास उत्तर देताना कुलकर्णी म्हणाल्या,‘दीनानाथ मंगेश रुग्णालय, डॉ. धनंजय केळकर यांच्याकडून कोणतीही चूक झाली नव्हती. त्यामुळे त्यांची बाजू मांडली.’

‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर’

मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने यंदा प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, अभिनेत्री प्राजक्ता माळी, डॉ. धनंजय केळकर, पत्रकार सुशील कुलकर्णी यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार असून २४ एप्रिलला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >