
पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचे आश्वासन
मुंबई: मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे लोकांच्या घरांचे, पिकांचे आणि गुरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून, आता शेतकऱ्यांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधक आणि शेतकरी सातत्याने करत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मोठे आश्वासन दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या व्यथा मांडल्या. “शेतकऱ्यांशी बोलताना अनेकांनी सांगितले की गेल्या कित्येक वर्षांत असा पाऊस झाला नाही. शेतकरी सध्या खचून गेले आहेत, पण आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहोत,” असे ते म्हणाले. जेव्हा जेव्हा राज्यात अशी नैसर्गिक आपत्ती किंवा संकट आले आहे, तेव्हा तेव्हा सरकारने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीतही या विषयावर गंभीर चर्चा झाली असून, सरकार मदत करताना हात आखडता घेणार नाही, असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.
६० लाख हेक्टरवरील नुकसानीचा प्राथमिक अंदाज
अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टर जमिनींवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. शिंदे यांनी सांगितले की, “पुढच्या दोन ते तीन दिवसांत नुकसानीचा अंतिम आणि नेमका आकडा समोर येईल.” शेतकऱ्यांच्या नुकसानीची अचूक माहिती मिळाल्यानंतर मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही सगळे एकत्र मिळून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ.
?si=eoyU6zpaYcLd7jZj
उद्ध्वस्त घरांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मदत
अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून, काही ठिकाणी खायला घरात अन्न नसण्याची भयावह परिस्थिती आहे. “शेतकऱ्यांना मदत करताना सरकार कोणत्याही परिस्थितीत हात आखडता घेणार नाही,” असे शिंदे यांनी पुन्हा स्पष्ट केले. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, याची आठवण करून देताना त्यांनी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या 'शेतकरी सन्मान योजनेचा' उल्लेख केला.
या नैसर्गिक आपत्तीत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पुस्तकांचेही नुकसान झाले आहे. शिंदे यांनी आश्वासन दिले की, “नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची पुस्तकेही सरकार पुरवणार आहे.” तसेच, पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आहे आणि खासगी डॉक्टरही योगदान देत आहेत.
एकंदरीत, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असले तरी, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या एकत्रित भूमिकेतून सरकारने त्यांना मदतीचा मोठा आधार दिला आहे हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळात झालेली चर्चा आणि मदत करताना हात आखडता न घेण्याचे आश्वासन, ओल्या दुष्काळाच्या मागणीकडे सरकार सहानुभूतीपूर्वक पाहत असल्याचे दर्शवते. राज्यातील संपूर्ण यंत्रणा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असून, लवकरच ठोस आर्थिक मदत जाहीर होईल, अशी आशा आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे.
शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत. हे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी राज्यातील शेतकरी पावसामुळे आणि पुरामुळे अडचणीत असून त्यासाठी शिवसेनेकडून निधी संकलित केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच यंदाचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे भव्य होणार नसून यात केवळ मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शिवसैनिक हजर राहणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.