विद्यार्थीदशेमध्ये यश-अपयश हे प्रत्येकांच्या जीवनात येत असते. मात्र त्यावर मात करता आली पाहिजे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करायला हवे. तसेच पालकांनी शैक्षणिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे. मुलांचा आत्मविश्वास वाढवायला हवा. त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षणाची आवड निर्माण करा, ते ओझं वाटायला नको. कारण शिक्षण हेच मुलांच्या परिवर्तनाचे साधन आहे हे मुलांना पटवून दिले पाहिजे.
मुलांना अभ्यासाची आवड नसते, ही काही नवीन गोष्ट नाही. अशी अनेक मुले आहेत ज्यांना अभ्यास ही शिक्षा वाटते आणि ते फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतात. बाहेर आपले मित्र खेळतात मग आपणच का अभ्यासात डोकं खुपसून बसायचं, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. यात मुलांचाही दोष नाही; परंतु मुलांचा अभ्यास न करण्याच्या सवयीमुळे पालकांना त्यांची खूप चिंता वाटत असते. कारण मुलांनी अभ्यास केला नाही तर, साहजिकपणे शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी नीट समजणार नाही आणि मग ज्या वेगाने शिकायला हवे त्या गतीने ते सर्व काही शिकू शकणार नाही; परंतु मुलांच्या अभ्यासात रस नसण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत, येथे जाणून घ्या की, पालक म्हणून तुम्ही मुलाला अभ्यास करण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकता. जेव्हा मुलं अभ्यास करत असतील तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ बसू शकता. पण, मुलांचे टेन्शन वाढवणार नाही यासाठी प्रयत्न करा. जर कोणी मुलासोबत बसले तर त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होते आणि कंटाळा येत नाही, पण पालकांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भीती वाटत असेल किंवा आई-वडील मुलांना ओरडत असतील तर मुलं घाबरतात. त्यामुळे अभ्यासामधून त्यांचे पूर्णपणे लक्ष विचलित होते. आजच्या काळात अनेक मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम परीक्षा जवळ आली की, वेगवेगळी कारणे सांगून पालकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. तेव्हा परीक्षा केव्हाही सुरू झाली तरी मुलांनी नियमित अभ्यास करायला हवा. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना अभ्यास करण्यास प्रवृत्त करायला हवे. तरच मुलांना अभ्यास करण्यास गोडी लागेल. अनेक मुले अभ्यास करण्यास दुर्लक्ष करतात याची कारणे शोधली पासहिजेत. ती सुद्धा मुलांना विश्वासात घेऊन. त्यासाठी घरामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करायला हवे. म्हणजे मूल अभ्यास करण्यास प्रेरित होईल. तसेच त्यांना अभ्यास करण्यास उत्तेजन मिळेल.
मुलांवर तशाप्रकारे प्रभाव पाडला पाहिजे. त्यासाठी पालकांचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. मुले शाळेतून घरी आल्यावर लगेच त्यांना अभ्यासाला बसवू नये. त्यांना थोडा वेळ खेळण्यासाठी द्यावा. नंतर त्यांना अभ्यासाला बसवावे. अशावेळी घरातील वातावरण शांत ठेवावे. त्यांची बसण्याची जागा सुद्धा ठरवावी. त्याआधी शाळेच्या वेळेच्या नंतर अभ्यासासाठी वेळ निश्चित करावी. सर्व शाळांची वेळ सारखी नसते. म्हणजे मुलं वेळच्या वेळी अभ्यास करतील. बऱ्याच वेळा आई-वडील टीव्ही लावून एखादी मालिका बघतात. त्याच्या आवाजाचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. तेव्हा पालकांनी सुद्धा मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत टीव्हीला विश्रांती द्यावी. असं केल्याने मुलांना नियमित अभ्यासाच्या वेळेत अभ्यास करण्याची सवय लागते. यासाठी घरात अभ्यासासाठी वातावरण निर्माण करायला हवे. अभ्यासाच्या वेळेत पालकांनी आपल्या आवडी-निवडीवर निर्बंध घातले पाहिजेत. मुले चांगला अभ्यास करून उत्तीर्ण कसे होतील याकडे अधिक लक्ष द्यावे. प्रत्येक विषयांची शालांत स्तरापर्यंत पुस्तके असतात. त्यातील प्रत्येक परीक्षेला अभ्यासक्रम कोणता आहे. त्याचे परीक्षेपूर्वी अध्ययन झाले का? त्यातील कोणता भाग समजला नसेल तर अध्यापकांकडून समजून घ्यावा. म्हणजे परीक्षेला कोणत्याही प्रकारची शंका निर्माण होणार नाही. त्यामुळे ते परीक्षेत नेत्रदीपक प्रगती करू शकतात.
आई-वडील आपल्यासाठी जी मेहनत घेतात त्याची मुलांना जाणीव असायला हवी. बऱ्याच मुलांना पालक सांगतात की, तू शाळेत पहिला आल्यास, तुला एक मोठं बक्षीस देणार असे आधीच त्यांना सांगायचं हे चुकीचं आहे. विशेष किंवा प्रथम श्रेणीत पास झाल्यास तुझ्या आवडीचे कपडे घेणार किंवा तुला टू व्हीलर घेऊन देणार? अशामुळे मुलांना उत्तेजन मिळते. आपण चांगल्या गुणांनी पास झाल्यास आपल्याला आपले आई-वडील बक्षीस देणार म्हणून मुले अभ्यास करण्याकडे अधिक लक्ष देतात. त्यासाठी त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतात. अशावेळी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुलांसाठी बक्षीस जरी मिळाले तरी मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात. काही ठिकाणी पर्यायी विषय असतात. त्यातील योग्य व आपल्या मुलांच्या आवडीचा विषय निवडावा. दहावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याचा अंतिम निर्णय मुलांवर सोडवा. मात्र प्रत्येक शाखेविषयी माहिती त्याला देण्यात यावी. शेवटी आवड ही महत्त्वाची असते. मुलांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडल्यास तो अधिक जोमाने अभ्यास करेल. त्यासाठी प्रामाणिकपणे आपल्या भविष्याचा विचार करून अभ्यास करायला हवा. काही पालक अभ्यास करा म्हणून मुलांना प्रत्येक दिवशी सांगतात. तेव्हा असं न करता त्यांना आपल्या अभ्यासाची जाणीव व्हायला हवी. त्यांनी स्वत:हून अभ्यासाला बसायला हवं. त्यात त्यांनी आपण धड्याचे वाचन करून सारांश लेखन सुद्धा करायला हवं. म्हणजे अभ्यासाची नियमित सवय मुलांनीच लावायला हवी. महत्त्वाची बाब म्हणजे मुुलांच्या आवडी-निवडीप्रमाणं मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं.त्यासाठी विविध विषयांवर विचारवंतांची व्याख्याने आयोजित केली असतील तर अशा व्याख्यानांना मुलांना घेऊन जाणे. आपल्या परिसरात वैचारिक नाटक, चित्रपट मुलांना दाखवावे. ऐतिहासिक स्थळांना भेट देणे व मुलांना वर्षातून एकदा तरी सहल काढावी. त्याचप्रमाणे अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात यावं. जेणेकरून मुलांना प्रेरणा मिळून मुलांचा आत्मविश्वास वाढण्याला मदत होते. यामुळे अभ्यासाकडे अधिक मुले लक्ष देतात.
त्यांना एक नव्याने अभ्यास करण्याची ऊर्जा मिळालेली असते. काही मुलांना आपण अभ्यास करताना आई किंवा वडील आपल्या सोबत असावे असे वाटते. तसं काही मुलं आई-वडिलांना बोलूनही दाखवितात. मात्र सध्याच्या धावपळीच्या जीवनात ते सर्वच पालकांना शक्य नसते. तरी आपण अभ्यास करताना पालकांनी थोडावेळ आपल्यासोबत बसावे असे मुलांना वाटते. तेवढाच आधार त्यांना वाटत असतो. काही शंका असल्यास ताबडतोब आपल्या शंकांचे निरसन होऊ शकते असे मुलांना वाटते. तेेव्हा मुलांच्या आवडीप्रमाणे थोडावेळ मुलांबरोबर पालकांनी बसायला काहीच हरकत नाही. त्यामुळे त्यांना अभ्यास करण्यास धीर येतो. त्यांचा अभ्यासाचा उत्साह वाढतो. थोडक्यात असे म्हणता येईल की, मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे हे आई-वडिलांसाठी एक आवाहन असते. मात्र त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना अभ्यास करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केल्यास मुलं बिनधास्तपणे अभ्यास करण्यास प्रोत्साहित होतील.
-रवींद्र तांबे