
लंडन: ब्रिटनची राजधानी लंडनमधील टाविस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामुळे पुतळ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपूर्वी हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर भारतीय उच्चायुक्तालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.
भारतीय उच्चायुक्तालयाचा निषेध
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय उच्चायुक्तालयाने तात्काळ लंडनच्या स्थानिक प्रशासनाकडे या विटंबना प्रकरणावर आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच, पुतळ्याचे झालेले नुकसान त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. लंडन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुतळ्याचे झाले नुकसान
लंडनमध्ये महात्मा गांधींचा पुतळा शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारा म्हणून ओळखला जातो. यापूर्वीही, लंडनमध्ये पुतळ्याच्या विटंबनेच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. या ताज्या घटनेमुळे गांधीजींच्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये संतापाची लाट आहे.