
मुंबई : मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर यार्ड पुनर्रचना आणि आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग कामाची आवश्यकता असल्याने १० ऑक्टोबरपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत.
या ब्लॉक दरम्यान १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते संध्याकाळी ५.२० वाजेपर्यंत तर २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत कर्जत परिसरातील गाड्यांची वाहतूक विस्कळीत राहणार आहे. हा ब्लॉक भिवपुरी स्थानक, जांब्रुंग केबिन, ठाकूरवाडी, नागनाथ केबिन ते कर्जत या संपूर्ण विभागात लागू राहणार आहे.
या दोन दिवसांत कर्जत-खोपोली दरम्यान अप आणि डाउन लोकल गाड्यांची सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. तसेच कर्जत-सीएसएमटी लोकल गाड्या काही वेळा नेरळ किंवा अंबरनाथ येथेच थांबवल्या जाणार आहेत. जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस, सीएसएमटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस, बिकानेर-यशवंतपूर एक्स्प्रेस, तसेच पनवेल-नांदेड एक्स्प्रेस यांसारख्या गाड्या भिवंडी, भिवपुरी रोड, नेरळ, वांगणी आणि चौक येथे नियमन करण्यात येणार आहेत. यामुळे काही गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावतील.
२ ऑक्टोबरलाही काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नेरळ, अंबरनाथ आणि ठाणे येथून गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन व टर्मिनेशन केले जाणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डचे आधुनिकीकरण ही एक मोठी योजना आहे. जुन्या पद्धतीच्या इंटरलॉकिंग सिस्टीमऐवजी आधुनिक प्रणाली बसवली जात आहे. कर्जत हे एक महत्त्वाचे जंक्शन असून, पुणे, खोपोली, लोणावळा आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हे केंद्रबिंदूचे स्थानक आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या दोन दिवसांमध्ये गाड्यांच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे.