
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींना लवकर बरे वाटावेे, यासाठी प्रार्थनाही केली आहे. दरम्यान नड्डा यांनी सदर दुर्घटनेमागील कारणे जाणून घेण्यासाठी भाजपा खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वात आठ खासदारांची चौकशी समिती स्थापन केली आहे. यात अनुराग ठाकूर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, तेजस्वी सूर्या, ब्रज लाल (माजी पोलीस महासंचालक), अपराजिता सारंगी, रेखा शर्मा आणि पुत्ता महेश कुमार यांचा समावेश आहे. एनडीए खासदारांचे हे शिष्टमंडळ करूरला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेणार आहे. तसेच चौकशीनंतर अहवालही सादर करणार आहे.
करूर शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय यांची जाहीर सभा होती. या सभेसाठी पन्नास हजारांपेक्षा जास्त लोक जमले होते. गर्दी खूप जास्त असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक काहीतरी गोंधळ झाल्याने लोकांमध्ये भीती पसरली आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. या चेंगराचेंगरीत ४० जणांचा मृत्यू झाला.
अनेक लोक एकमेकांवर आदळले आणि गुदमरून जमिनीवर पडले. ही घटना घडल्यानंतर विजय यांनी तात्काळ आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पोलिसांनी आणि स्थानिक लोकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
आयोजकांनी अंदाजे १०,००० लोकांसाठी मैदानात व्यवस्था केली होती, परंतु प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा तीन पटीने अधिक लोक या रॅलीसाठी जमले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, ही रॅली दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत नियोजित असताना, लोक शनिवारी सकाळी ११ वाजेपासूनच मैदानात जमायला सुरुवात झाली होती. पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, "विजय जेव्हा सायंकाळी ७:४० वाजता पोहोचले, तेव्हा गर्दी अनेक तास पुरेसे अन्न आणि पाण्याशिवाय वाट पाहत होती. हीच खरी परिस्थिती होती."
आयोजनातील त्रुटी, अपुऱ्या व्यवस्था आणि अभिनेत्याच्या येण्यास झालेला विलंब यामुळे ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. अशा राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दीचे व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.