
नवी दिल्ली : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सोमवारी पाकिस्तान सरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले. हे लोक आंदोलन आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून गणले जात आहे. अवामी अॅक्शन कमिटीने आंदोलनाची हाक दिली होती. अवमी कमिटीने बंद आणि चक्का जामचा नारा दिला होता. या आंदोलनाने भागात चांगलाच तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने इस्लामाबादवरून सुरक्षा दल पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाठवली आहेत. त्याचबरोबर या भागातील इंटरनेट सेवादेखील मध्यरात्रापासून बंद करण्यात आली आहे.
अवामी कमिटीला गेल्या महिन्यापासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये चांगला जनाधार लाभत आहे. त्यांच्या नावावर हजारो लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या भागातील सर्व लोकांचा पाकिस्तान सरकारने पाक व्याप्त काश्मीरकडे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या भागाचा विकास करण्यासाठी अवामी कमिटीने ३६ मागण्या ठेवल्या आहेत. यात स्ट्रक्चरल रिफॉर्म, पाक व्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये राहण्यास आलेल्या काश्मीरी शरणार्थींसाठी १२ जागा राखीव ठेवण्यासाठीची मागणी केली आहे. याचबरोबर अनुदान आणि राज्यातील प्रोजेक्ट्समधून मिळणारा कर वाढवून देण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे.
अवामी कमिटीचीचे प्रमुख नेते शौकत नवाज मीर म्हणाले, ‘आमचे कॅम्पेन हे कोणत्याही संस्थेविरूद्ध नाही. मात्र आमच्या लोकांना गेल्या ७० वर्षात मुलभूत अधिकार नाकारण्यात आले आहे. हे आंदोलन त्याबाबत आहे. आता खूप झाले. आमचे हक्क आम्हाला द्या नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा.’
दरम्यान, हजारो लोक रस्त्यावर उतरलेले पाहिल्यानंतर पाकिस्तान सरकार लगेचच सक्रीय झाले आहे. काही दिवसांपासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये सशस्त्र दलाच्या अनेक गाड्या शहरात मार्च करत आहेत. हजारो सशस्त्र सैनिक पंजाबमधून पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी महत्वाच्या शहरांच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटवर नाकाबंदी केली आहे. इस्लमाबादमधील सरकारने एक हजार अतिरिक्त पोलीस दल देखील तैनात केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘शांतता ही लोकं आणि प्रशासन या सर्वांची जबाबदारी आहे.’ याचबरोबर अवामी कमिटीच्या लोकांसोबत सरकारनं चर्चेचा वेग वाढवला आहे. मात्र १३ तासांच्या चर्चेनंतर कमिटीने वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. त्यांनी चर्चा ही अपूर्ण आणि कोणत्याही निष्कर्षाविना संपल्याचे सांगितले.