Sunday, September 28, 2025

कोकणातील शेतकऱ्यांची नवी उभारी

कोकणातील शेतकऱ्यांची नवी उभारी

राज्यात शेतकऱ्यांची जी शेतीची विदारक चित्र माध्यमांवर येतात तशी स्थिती कोकणातही अनेकवेळा आली आहे. येत आहे. अगदी यावर्षीही कोकणातील भातपिकांची कोणाही शेतकऱ्याला कोणतीही शाश्वती देता येणार नाही अशी आताची स्थिती आहे. पावसाने यापूर्वी कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी अनेक भागातील भातशेती मध्यंतरीच्या काळात जो पाऊस कोसळत होता त्यांने भातशेती पाण्याखाली गेली आहे. भातशेती पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर आहे आणि सिंधुदुर्गातही अनेक गावातील भातशेती पाण्याखाली होती. भातशेतीला पाऊस आवश्यक होता; परंतु जो पाऊस कोसळला तो अधिकचा कोसळला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस काही थांबत नाही. महाराष्ट्रातील अनेक विभागामध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात जो पाऊस कोसळला त्या पावसाने शेतीची अपरीमित हानी झाली. कोकणामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या पंधवरड्यात जर पावसाने हजेरी लावली तर पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत असतो. ऑक्टोबर महिन्यात पाऊस हजेरी लावण्यापुरता असतो; परंतु मे ते सप्टेंबरपर्यंत अविश्रांतपणे पाऊस कोसळत असतो. गेल्या दोन-पाच वर्षांत या ऋतुचक्रात काहीसा बदल झालेला दिसतो; परंतु कोकणात काही भागांत भरपूर पाऊस कोसळतो. काही घरांमध्ये पाणी भरणे, त्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळी हंगामात दोन-पाच वेळा अशा प्रसंगांना तोंड द्याव लागतंच लागतं. नदी वा खाडी किनारी भागांमध्ये दरवर्षी पाणी वाढतं. कधी-कधी सह्याद्रीपट्ट्यातील भागात भरपूर पाऊस कोसळला तरी त्याचा फटका खालील गावांना बसतो; परंतु जी काही परिस्थिती निर्माण होते त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न कोकणातील सर्वसामान्यजन, शेतकरी करीत असतो. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे पाऊस हा सारख्याच प्रमाणात पडत असतो.

रायगड जिल्ह्यात डोंगर उतारावर लोकवस्ती आहे. यामुळे वाडी, गाव दुर्दैवाने डोंगर खचल्याने त्याखाली येण्याची शक्यता असते असे प्रसंग यापूर्वीही कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. बाजारपेठा पाण्याखाली सर्वसाधारणपणे दरवर्षीच येतात. नदीपात्रातील गाळ काढण्यात आला पाहिजे. त्यातून नदी किनारी असणाऱ्या लोकवस्तीला पाणी वाढण्याचा धोका संभवणार नाही. भातशेती यावर्षी कोकणामध्ये तिन्ही जिल्ह्यात पाण्याखाली आली आहे. राज्यात शेतकऱ्यांची जी शेतीची विदारक चित्र माध्यमांवर येतात तशी स्थिती कोकणातही अनेकवेळा आली आहे. येत आहे. अगदी यावर्षीही कोकणातील भातपिकांची कोणाही शेतकऱ्यांला कोणतीही शाश्वती देता येणार नाही अशी आताची स्थिती आहे. पावसाने यापूर्वी कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी अनेक भागातील भातशेती मध्यंतरीच्या काळात जो पाऊस कोसळत होता त्यांने भातशेती पाण्याखाली गेली आहे. भातशेती पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर आहे. सिंधुदुर्गातही अनेक गावातील भातशेती पाण्याखाली होती. भातशेतीला पाऊस आवश्यक होता; परंतु जो पाऊस कोसळला तो पाऊस अधिकचा कोसळला आहे. त्यामुळे भातपीक ‘पोसवण’ जे म्हणतात ते वेळेत होण्याऐवजी तो कालावधी लांबणीवर पडण्याची एक शक्यता आहे आणि त्याबरोबर भातपीक तयार न होता लोंबीमध्ये दाणे तयार होण्याची शक्यता मंदावली आहे. परिणामी ‘चिम’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणातील शेतकऱ्याचे नुकसान होऊनही तो कधी शासनदरबारी जात नाही. काही द्या म्हणून मागत नाही. माध्यमांसमोर कोकणातील शेतकऱ्यांने कधी आक्रोश केल्याचे चित्र कधीच दिसणार नाही. केवळ भात शेतीचेच नव्हे तर आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी बागायतदार शेतकरीही कधी नुकसानीसाठी पुढे येताना दिसत नाही. आताच्या स्थितीतही कोकणातील सुपारी बागायतदार शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये नारळ, पोफळीच्या बागायती आहेत. सुपारी तयार होण्यापूर्वीच त्याचा खच पडला आहे. सुपारी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले; परंतु एकतर कोकणातील शेतकरी संघटीत नाही. विविध राजकीय पक्षांच्या विचारसरणीत आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी संघटीत होत नाही. त्याला दुसऱ्याचे नेतृत्व मान्य नसते. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याच्या मनातील खदखद त्याच्या मनातच राहून जाते. त्याला संघटीत स्वरूप कधीच येत नाही.

कोट्यवधी रुपयांची आंबा, काजू बागायतीत नुकसान होऊनही कधी एकत्र दाद मागण्यात आली नाही. कोकणातील बागायतदार शेतकरी जागा नसला तरीही कोकणातील लोकप्रतिनिधी आंबा, काजू, कोकम या विषयाची चर्चा विधीमंडळात करतात. कोकणात शेतकऱ्यांचे संघटीत होऊन कधी मोठाले मोर्चे निघालेत असेही कधी घडले नाही. याचे कारण कोकणातील शेतकरी शासनाच्या नुकसानभरपाईवर अवलंबून राहत नाहीत. कोकणातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली नसतो. आवश्यक असणारे कर्ज काढतो. जे कर्ज घेणार ते परतफेड करण्यासाठी शासनाची शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल याची प्रतीक्षा न करता आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमित कसे जातील याबाबतीत तो अधिक काळजी घेतो. कोकणातील हत्तीबाधित भागातील शेतकऱ्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या शेती-बागायती नष्ट करूनही तो शेतकरी पुन्हा उभा राहतो. हे कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. दिवाळीच्या जवळपास काही भातपीक तयार होतं; परंतु यावर्षी या पावसाच्या संततधार हजेरीने सर्व वेळापत्रकच कोलमडले. हळव्या भातपिकाचीही नासाडी झाली आहे. कोकणातील या पावसाने भात, नाचणी अशी वरकस होणारी शेतीही हातातून गमवावी लागली आहे. यावर्षी कोसळणारा पाऊस हा कमी वेळेत अधिकचा पाऊस कोसळतो. या कोसळणाऱ्या पावसाने होणाऱ्या ढगफुटीने अचानक वाढणाऱ्या पाण्याने कोकणातील अनेक भागांमध्ये नुकसान झाले आहे; परंतु तरीही कोकणातील शेतकरी नव्या दमाने नवी उभारी घेऊन उभा राहतो. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या रोजच्या नुकसानीतही तो उभा आहे. हत्ती इलो...!

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली काही वर्षे रानटी हत्ती येत आहेत. दोडामार्ग, सावंतवाडी या तालुक्यातून हत्तीचा वावर आहे. आतापर्यंत नारळ, पोफळीच्या बागा भातशेती असं सारच हत्तीने उद्ध्वस्त केलं आहे. दोडामार्ग तालुक्यातील जवळपास सर्वच गावातून हत्तीच वास्तव्य राहिलं आहे. मनुष्य वस्तीत हत्ती येत असल्याने भीतीचं वातावरण आहे. हत्तीपकड मोहीम यापूर्वी राबविण्यात आली. हत्ती २० वर्षांपूर्वी दोडामार्ग भागात आले ते कायमस्वरूपीच स्थिरावले आहे. मध्येच कर्नाटक राज्यामध्ये काही काळ जातात; परंतु माघारी फिरतात. गेल्या पंधरवड्यात हत्ती गोव्यातही भ्रमंती करून आले. आता पुन्हा सिंधुदुर्गात आहे. वनविभागही या हत्तींच्या प्रश्नावर हतबल आहे. हत्तीच अभयारण्य आणि वनतारा अशा मुद्यांवर वारंवार चर्चा होत आहे. हत्तीच्या उपद्रवांनी शेतकरी कालही हैराण होता. आजही पूर्वीसारखाच हैराण आहे. कोणत्याही गावातून वस्तीत होणाऱ्या हत्तीच्या मुक्तसंचाराने शेतकरी चिंतातूर आहेत. दिर्घकालिन उपाययोजना शासनाने करणे आवश्यक आहे.  -संतोष वायंगणकर

Comments
Add Comment