Monday, September 29, 2025

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा

नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेले काम अद्याप पूर्णत्वास न गेल्याने येथील स्थानिकांसह पर्यटकांतही नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत सन २०१८ साली मुंबई ते काशिद रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गेली ५ वर्षे ठेकेदारामार्फत हे काम संथ गतीने सुरू आहे. येथे बांधण्यात येणाऱ्या ब्रेक वॉटर बंधारा, रो-रो जेट्टी तसेच प्रवासी जेट्टीचे काम पावसाळी हंगामात निसर्ग, तोक्ते आदी वादळांमुळे जोरदार वारे व काशिद समुद्र किनारी उसळणाऱ्या लाटांचा जोर आदी कारणांमुळे रखडले. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी सदर प्रकल्पाचे काम अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक येथे भेट देऊन समुद्र सफरीचा आनंद लुटतात. या सर्व पर्यटकांना मुंबईहून मांडवा, रेवस लॉन्चने अलिबागला येवून पुढे रस्त्याने खासगी अथवा भाड्याच्या गाडीने येतात. या प्रवासात त्यांचा बहुतांशी वेळ वाया जातो. परिणामी त्यांना येथे समुद्रस्नानाचा व सहलीचा खरा आनंद लुटता येत नाही. रो-रो सेवेमुळे त्यांचा वेळ वाचेल व पर्यटकांमध्येही वाढ होणार असल्याने येथील छोटे-मोठे व्यावसायिक देखील सदर रो-रो सेवा लवकर सुरू करण्याची मागणी करीत आहेत. येथील प्रवासी जेट्टीचे काम राज्य शासनातर्फे करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ४२ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे कळते. जवळपास ११२ कोटींच्या या प्रकल्पावर आतापर्यंत शंभर कोटी खर्च करण्यात आले आहे. समुद्राच्या लाटांचा मारा थोपविण्यासाठी ब्रेक वॉटर बंधारा, रो-रो जेट्टी, प्रवासी जेट्टी, टर्मिनल, पार्किंग, रस्ता आदी कामे सुरू असली तरी ती संथगतीने सुरू आहेत ती डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून कळते. सदर सेवा लवकर सुरू झाली तर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन त्याचा फायदा पर्यटकांसह स्थानिकांनाही होईल.

मुंबईहून काशिदला रस्त्याने येण्यासाठी जवळपास पाच ते सहा तास लागतात. रो-रो सेवेमुळे दोन-तीन तासांत काशिदला पोहोचता येईल त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. - मिलिंद माजगावकर
Comments
Add Comment