Monday, September 29, 2025

म्हाडा राज्यात साडेअकरा हजार घरे बांधणार

म्हाडा राज्यात साडेअकरा हजार घरे बांधणार

मुंबईत सर्वसामान्यांसाठी १ हजार ४७४ घरे

मुंबई : म्हाडाकडून चालू आर्थिक वर्षांत सामान्यांसाठी किती घरे उपलब्ध होतील, याचा आढावा घेतला असून त्यानुसार मुंबईत सामान्यांसाठी १४७४ घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. मुंबईत गिरणी कामगारांसाठी चार हजार २१५ घरांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राज्यात साडेअकरा हजार घरे उभारली जाणार आहेत.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जायस्वाल यांनी राज्यात दोन लाख घर निर्मितीचा संकल्प आखला आहे. २०२५-२६ या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार, मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १०९, अल्प गटासाठी ७८९, मध्यम गटासाठी ४३७ आणि उच्च गटासाठी १३९ अशा १४७४ घरांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय ९८ संक्रमण शिबिरेही बांधण्यात येणार आहेत.

कोकण गृहनिर्माण मंडळाने या आर्थिक वर्षांत सात हजार ९५१ घरांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. यामध्ये अत्यल्प गटासाठी ३४६ तर अल्प गटासाठी सात हजार ३९९ आणि मध्यम गटासाठी २०६ घरांचा समावेश आहे.

  • गिरणी कामगारांसाठी चार हजार २१५ घरे
  • राज्यात दोन लाख घरांच्या निर्मितीचा संकल्प
  • ९८ संक्रमण शिबिरांचीही निर्मिती

अमरावतीत भुखंड विक्रीवर भर

अमरावतीत प्रामुख्याने भूखंड विक्रीवर म्हाडाने भर दिला आहे. त्यानुसार अत्यल्प गटासाठी ९५ तर अल्प गटासाठी १५४ मध्यम गटासाठी ३५२ भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. त्या तुलनेत फक्त ५४ सदनिकांची निर्मिती केली जाणार आहे. नागपूर गृहनिर्माण मंडळाने अत्यल्प गटासाठी १७६, अल्प गटासाठी २००, मध्यम गटासाठी २०२ आणि उच्च गटासाठी ४३ अशी ६२१ घरे निर्माण करण्याचे ठरविले आहे. याशिवाय अल्प गटासाठी ४२४ तर मध्यम गटासाठी २० भूखंड उपलब्ध करून दिले आहेत.

मार्च २०२५ अखेर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सदनिका 

मुंबई (दोन लाख ५७ हजार ९२१), कोकण (८६ हजार १८१), पुणे (५६ हजार ९९१), नागपूर (५१ हजार ६०३), नाशिक (नऊ हजार ६२२), अमरावती (सात हजार १८३), संभाजीनगर (२३ हजार २३६), याशिवाय इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (३६ हजार ६००).

Comments
Add Comment