
निरोप नव्हे... हा तर नवीन लढा स्वमालकीचा, अस्तित्वाचा. बेस्टच्या स्वमालकीचा बसगाड्यांचा ताफा पुढील काही दिवसांतच केवळ २५४ गाड्यांवर येऊन ठेपणार आहे. हे खरंच वास्तव आहे. हा आकडा ऐकताना हृदय अक्षरश: पिळवटून जातं, कारण अजूनही जर स्वमालकीचा बसताफा घेतला गेला नाही तर लवकरच आपण आपल्या पुढच्या पिढीला 'एक होती बेस्ट' असं सांगण्याची वेळ येणार आहे. मुंबईसारख्या महाकाय शहरात सार्वजनिक वाहतुकीचं कणा मानली गेलेली बेस्ट आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद हरवून बसली आहे आणि आम्ही मुंबईकर मात्र सगळं डोळ्यांसमोर असूनही शांतपणे तमाशा पाहत आहोत. ही उदासीनता, ही निष्क्रियता, हीच खरी अपराधी भावना आहे. १९४२, तुझ्या रूपाने आम्ही एका सुवर्णयुगाची झलक हरवली. माफ कर गं, आम्ही तुला वाचवू शकलो नाही!
बेस्टच्या स्वमालकीच्या ताफ्यातील आणखी एक तेजस्वी तारा कायमचा निखळला आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्विकास अभियानांतर्गत २००९ साली बेस्टला लाभलेल्या अशोक लेलँडच्या स्वमालकीच्या बसगाड्यांपैकी बहुतांश गाड्या आधीच निष्कासित झाल्या गोराई आगाराची १९४२ देखील 'सुरक्षितता हेच आमचे ध्येय' या अखेरच्या घोषवाक्यासह आम्हा मुंबईकरांचा निरोप घेऊन गेली. ही फक्त एका गाडीची सेवानिवृत्ती नाही, तर एका अखंड परंपरेचा अवसानगंड आहे. कधी काळी हजारोंच्या संख्येने धावणाऱ्या स्वमालकीच्या ह्या बसगाड्या मुंबईच्या शहरी जीवनशैलीचा अविभाज्य भाग होत्या. प्रवाशांची सुरक्षितता, बस गाड्यांची योग्य वारंवारता, सोयीस्कर आणि प्रवाशांना परवडणारे वाजवी दर आणि बेस्टचे स्वतःचे स्वामित्व या चार स्तंभांवर उभ्या राहिलेल्या या गाड्या आज नामशेष होत आहेत. यामागचं कारण केवळ तांत्रिक किंवा आर्थिक नाही; तर कुचकामी प्रशासन आणि उदासीन नागरिकवृत्ती ही यामागची खरी कारणे आहेत.
गेल्याच आठवड्यात एक वेगळा निरोप समारंभ मुंबई शहरात पार पडला. मुंबई शहराच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बेस्ट बसच्या स्वमालकीच्या बस गाड्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आता तर त्या फक्त पाचशेच्या आसपास राहिल्या आहे. त्यातील बेस्टचे एक एक वेगवेगळे प्रकारही इतिहास जमा होत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई शहरातील बेस्ट बसगाड्या या पंधरा वर्षांपेक्षा जास्त चालवता येत नाही. म्हणून त्या १५ वर्षांनंतर भंगारात काढाव्या लागतात. मात्र त्याजागी पूर्वी नवीन बस गाड्या घेतल्या जात असत. त्यामुळे कधी ठरावीक बसच्या प्रकारांचे निरोप समारंभ कधी घडत नव्हते मात्र आज इंटरनेट इंस्टाग्राम या आधुनिक जमान्यात काही हौशी मंडळींनी इतिहास जमा होत चाललेल्या बेस्ट बसचे निरोप समारंभ आयोजित केले. कोरोना काळात एमयूटीपीसारख्या बस या न कळताच भंगारत गेल्या, मात्र त्यानंतर मागच्याच वर्षी बेस्टच्या स्वमालकीच्या दुमजली बसच्या शेवटच्या फेरीचेही अंधेरीत आयोजन केले गेले. याच आठवड्यात बेस्टच्या जेएनएनयूआरएम च्या अंतर्गत व त्यात 'सुरक्षितता हेच आपले ध्येय' ही जनजागृती मोहिमेतील लिव्हरी असलेली बस गाडी मंगळवारी भंगारात गेली. त्याचा निरोप समारंभ काही हौशी मंडळींनी रविवारी साजरा केला. बेस्ट ताफ्यात आता स्वमालकीच्या फक्त पाचशे गाड्या उरल्या आहेत. त्यात टाटा एसीजीएलच्या बस व तेजस्विनी बस या बस गाड्यांसोबतच जेएनएनयुआरएम अंतर्गत मिनी बस गाड्या बाकी आहे. त्याच्या निरोप समारंभाचे आयोजने येत्या काळात होणार आहे. भविष्यात बेस्टच्या स्वमालकीच्या बस गाड्या असणार आहे. कारण बेस्टच्या प्रचलित धोरणाप्रमाणे बेस्टला स्वमालकीच्या बस गाड्या खरेदी करण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने चालू असलेल्या बस गाड्यांवर पूर्णपणे अवलंबून राहवे लागणार आहे. खरंच वेदनादायी अनुभव होता तो, मुंबईकरांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या बेस्टवर ही अशी आलेली अवस्था पाहून खरच दुःख होत होते. काहीही म्हणा पण हे देखील तितकच खरं आहे, की बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा हा हवा. सध्या बेस्टच्या बसताफ्यामध्ये ३ हजारहून जास्त बस या खासगी कंत्राटदारांच्या आहेत तर कोणे एकेकाळी ४ हजार ५०० मालकीचा असलेल्या बेस्टचा ताफा आज ५०० बस गाड्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. स्वमालकीच्या बस गाड्या नसल्यामुळे बेस्टचे बस चालक आता अतिरिक्त ठरू लागले आहेत.
त्यामुळे त्यांना बस आगारातील इतर कामे अथवा कंत्राटदारांच्या बसवरती जबरदस्ती पाठवले जात आहे. त्यामुळे आज जास्त कुचंबणा ही बस चालकांची होऊ लागली आहे. कोणे एकेकाळी याच बेस्ट बसगाड्या या त्यांच्यासाठी ईश्वरासमान होत्या. त्यांच्या आधारावर त्यांना त्यांची कुटुंबे उभी करता आली. प्रत्येकाचे आयुष्य घडवले. मात्र आज त्याच बसगाड्या बस आगारातील भंगारखान्यात व मुंबईतील ठिकठिकाणी असलेल्या बसस्थानकात निकामी झालेल्या पाहून त्यांचे मन किती विषन्न होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. बरं त्या बदल्यात दुसऱ्या बसगाड्याही न येण्याची खंत ही मनात कायम राहतेच. कितीही खासगीकरणाचा अथवा या धोरणाचा इतर गोष्टीचा विचार केल्यास मात्र स्वमालकीचा बस ताफा हा हवाच हे अधोरेखित होते. सध्या बेस्ट ला सेवा देणारे निरनिराळे असलेले सहा कंत्राटदार त्यांच्या लहरी स्वभावामुळे आता बेस्टलाच नव्हे तर आता प्रवाशांनाही डोकेदुखी ठरू लागले आहे. त्यात त्यांचा लहरी कर्मचारी वर्ग व त्यांच्या वाढत्या तक्रारी हे पाहता बेस्टचे खासगीकरणाचे हे धोरण चुकलेलेच व फसलेलेच दिसते मात्र आज त्याचे सोयरंसुतक कोणालाही राहिलेले नाही .
मात्र मनातून दुखावला गेला आहे तो बेस्टचा कर्मचारी व त्याच प्रमाणात बेस्टचा प्रवासी देखील. बेस्ट आज स्वमालकीच्या बस गाड्या खरेदी करू शकत नाही. कारण अगोदरच बेस्ट ही आर्थिकदृष्ट्या तोट्यात गेलेली संस्था आहे. त्यात आता वरून आलेली निरनिराळी धोरणे ही कारणीभूत आहेत. मुंबई शहरात आता डिझेल बस गाड्या नको. सीएनजी बस गाड्या नको फक्त विद्युत धावणारी वाहने हवीत. मात्र ही धोरणे नेहमी बेस्टवरच का थोपवली जातात. उदाहरण म्हणजे आज मुंबई महापालिका स्वतः बस अथवा इतर दैनंदिन वाहतुकीसाठी वाहने घेताना डिझेल बस गाड्यांना प्राधान्य दिले जाते. तसेच इतर शासकीय व निमशासकीय ठिकाणी आजही पेट्रोल व डिझेल वाहनांना खरेदी करण्यास प्राधान्य आहे. मुंबई अग्निशमन दल इतकेच काय तर नेव्ही, आर्मी यासारख्या ठिकाणी आजही डिझेलवरच गाड्या घेतल्या जातात मग प्रदूषण काय फक्त मुंबईची बेस्ट करते का? मग तिलाच काही अशी वेडीवाकडे धोरणे लागू का लागू केली जातात. विद्युत वाहने महागडी आहे. म्हणून बेस्ट स्वतः ती खरेदी करू शकत नाही म्हणून ती कंत्राटदारांकडून भाड्याने घेतली जातात व त्याचे भाडेही दिले जाते मग बेस्टला मिळणाऱ्या उत्पन्नापासून त्याची बेस्ट बस गाड्यांची भाडीच देण्यात निधी अपुरा पडतो मग बेस्टकडे काहीही न राहिल्यामुळे बेस्ट फायद्यात येणार तरी कधी असा सवालही उभा राहत आहे.
विशेष म्हणजे याच हौशी संघटनेमुळे इतिहासात गेलेल्या बेस्टच्या स्वतःच्या दुमजली बसचे बेस्टच्या आणि आगारात एक कायमस्वरूपी संग्रहिका बसचे जतन केले गेले आहे. यापूर्वीच्या काळातही अशाच निरनिराळ्या बस गाड्या जमा झाल्या. येणारी पिढी यांना फक्त फोटोतच पाहणार का? आज मुंबईतील बस गाड्यांचेच महत्त्व लक्षात घेऊन भंगारात गेलेल्या बस गाड्या या शेजारील राज्यानी खरेदी करून तेथे त्यांचे स्मारक उभे केले आहे. मात्र आपणच त्याबाबत एवढे उदासीन का?असो...ही गेलेली बस एक प्रातिनिधिक उदाहरण होते काळाच्या ओघात आणखीही अशा बस नामशेष होतील मात्र त्या जागी बेस्टच्या स्वतःच्या बस गाड्या नसतील याचे दुःख जास्त आहे. जगात आज कोणतीही सार्वजनिक सेवा ही फायद्यात नाही. मात्र ती कशी टिकली पाहिजे हे मात्र तेथील राज्यकर्त्यांवर अवलंबून असते. आता तरी आपल्या येथील राज्यकर्त्यांनी आपुलकीने बेस्टकडे बघितले पाहिजे व ती टिकवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मेट्रो सेवा ही येईलच मात्र तिलाही मर्यादा आहेतच, त्यासाठी मेट्रोला बेस्टची पूरक सेवा ही हवीच.
- अल्पेश म्हात्रे