
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात सुरक्षा पथकांनी देशातील नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला यश मिळू लागले आहे. मागील काही महिन्यांत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले जात आहेत अथवा शरण येत आहेत. अलिकडेच नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी काही जणांनी शरणागती पत्करली आहे. यामुळे नक्षलवाद्यांची स्थिती कमकुवत होत आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधी प्रस्ताव सादर केला आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.
जीवंत असलेले सर्व नक्षलवादी शरण आले तर त्यांना सरकारी अभय योजनेचा लाभ होईल. पण शरण आले नाही तर त्यांना मरावे लागेल, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला.
डाव्या पक्षांनीच डाव्या अतिरेकी विचारांना वैचारिक बळ दिले. समाजात वावरणाऱ्या लोकांनीच या विचारांचे समर्थन केले. माओवादी हिंसाचार हा अपुऱ्या विकासाशी संबंधित नाही. याउलट रक्तरंजित दहशतवादामुळेच देशातील अनेक भागांमध्ये काही दशकांपासून विकास पोहोचला नाही. जोपर्यंत समाजातूनच माओवादाला मिळणारे वैचारिक समर्थन, कायदेशीर साह्य आणि आर्थिक मदत रोखली जात नाही, तोपर्यंत माओवाद संपुष्टात येणार नाही; असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.