
ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा
अमरावती: देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून अमरावतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला कमलताई गवई या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर डॉ. कमलताई गवई यांच्या नावाचे एक पत्र व्हायरल झाले, ज्यात त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते. आता याच पत्रामुळे एक नवा 'ट्विस्ट' आला आहे.
काय आहे नेमका 'सस्पेन्स'?
आरएसएसच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झालेला असतानाच, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले 'कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही' हे पत्र खोटे (फेक) असल्याची माहिती पुढे येत आहे. इतकेच नाही, तर डॉ. कमलताई गवई नेमक्या कुठे आहेत, याची माहिती खुद्द त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनाही नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या संपूर्ण प्रकरणातील सस्पेन्स चांगलाच वाढला आहे.
राजेंद्र गवई यांचा मोठा खुलासा
डॉ. कमलताई गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीला होत आहे आणि त्याचे निमंत्रण आईसाहेबांना मिळाले आहे. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे."
?si=JcBoJqhoEtiHQT79
गवई कुटुंबाचे संघासोबतच्या संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "संघाच्या मुख्य कार्यक्रमांना यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील नागपूरमध्ये गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहेत." त्यांनी उदाहरणे देत स्पष्ट केले की, इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते आणि विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे चांगले संबंध होते. "कार्यक्रमाला गेले म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच नाही," असेही राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.
'विरोधकांच्या पोटात दुखते आहे!'
राजेंद्र गवई यांनी डॉ. कमलताई गवई यांच्या उपस्थितीचे समर्थन केले. "त्या कार्यक्रमात गेले पाहिजे, अशा मताचा मी आहे. आमची मैत्री कायम राहील, परंतु आमची विचारधारा पक्की आहे. गवई साहेबांच्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे उलट्या-सुलट्या टीका सोशल मीडियावर केल्या जात आहेत. भूषण गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे मुद्दामून विरोधक टीका-टिप्पणी करत आहेत," असा थेट आरोप त्यांनी केला.
राजेंद्र गवई यांनी पुढे सांगितले की, "मी आईसाहेबांना सांगेल, आईसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे. एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. या खुलाशानंतर डॉ. कमलताई गवई नेमक्या कधी आणि कुठे संपर्क साधतात आणि या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.