
जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश
ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२५ रोजी ‘ऑरेंज अलर्ट’आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी ‘यलो अलर्ट’जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास व नागरिकांना मदत करण्यास सर्व प्रकारे सज्ज आहे असे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाचा इशारा : जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रात, सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार काम करण्यास निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये खालील प्रमुख सूचनांचा समावेश आहे.
रस्ते व दरड व्यवस्थापन : सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवर पडलेली झाडे तातडीने बाजूला करण्यासाठी वूड कटर आणि जेसीबी तयार ठेवावेत. तसेच, दरडी कोसळल्यास तत्काळ कार्यवाही करण्यासाठी 'क्विक रिस्पॉन्स टीम' तयार ठेवावी.
मच्छीमारांसाठी सूचना : मत्स्यव्यवसाय विभागाने हवामानाचा अंदाज मच्छीमारांपर्यंत पोहोचवावा आणि त्यांना समुद्रात जाण्यापासून थांबवावे.
आपत्कालीन साधने: सर्व विभागांनी त्यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापनाची साधने सुस्थितीत ठेवावीत आणि शोध व बचाव पथके तयार ठेवावीत.
नागरिकांसाठी ॲॅप्स : जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी 'दामिनी ॲॅप' आणि 'सचेत ॲॅप' डाऊनलोड करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना विजा पडण्याची आणि हवामानाची आगावू माहिती मिळू शकेल.
संपर्क : कोणत्याही आपत्कालीन घटनेची माहिती तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाला ०२२-२५३०१७४० किंवा ९३७२३३८८२ या क्रमांकावर कळवावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरी या कालावधीत सर्व विभागांनी दक्ष राहून तसेच एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले आहे.