Sunday, September 28, 2025

'ISPL'चा तिसरा सीझन भव्यदिव्य, एमव्हीपीला मिळणार ब्रँड न्यू 'पोर्शे ९११' कार!

'ISPL'चा तिसरा सीझन भव्यदिव्य, एमव्हीपीला मिळणार ब्रँड न्यू 'पोर्शे ९११' कार!

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग २०२६, सीझन ३ मध्ये ८ संघांचा समावेश; ५ ऑक्टोबरपासून १०१ शहरांमध्ये निवड चाचण्या सुरू

९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या सीझनचे यजमानपद सुरतकडे

मुंबई : सलग दोन यशस्वी हंगामानंतर, भारतातील आघाडीची टेनिस-बॉल टी-१० क्रिकेट स्पर्धा 'इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग' (ISPL) आता तिसऱ्या आणि अधिक व्यापक, भव्यदिव्य हंगामासाठी सज्ज झाली आहे. अमिताभ बच्चन (माझी मुंबई), सैफ अली खान आणि करीना कपूर खान (टायगर्स ऑफ कोलकाता), अक्षय कुमार (श्रीनगर के वीर), सुरिया (चेन्नई सिंगम्स), हृतिक रोशन (बंगलोर स्ट्रायकर्स), अजय देवगण (अहमदाबाद), सलमान खान (नवी दिल्ली) आणि राम चरण (फाल्कन रायझर्स हैदराबाद) यांसारख्या मोठ्या कलाकारांचा सहभाग असलेली ही स्पर्धा यंदा अधिक चांगली, धाडसी आणि मजबूत असणार आहे. ९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सुरत शहरात तिसऱ्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे.

यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी आणि आकर्षक गोष्ट म्हणजे, 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर' (MVP) म्हणजेच 'सर्वात मौल्यवान खेळाडू'ला बक्षीस म्हणून एक आलिशान ब्रँड-न्यू 'पोर्श ९११' ही स्पोर्ट्स कार दिली जाणार आहे. जागतिक क्रीडा स्पर्धांच्या मानकांशी लीगला जोडून खेळाडूंना सर्वोत्तम प्रोत्साहन देण्याचा आयएसपीएलचा हा प्रयत्न आहे.

आयएसपीएलचे कोअर कमिटी सदस्य सचिन तेंडुलकर, आशिष शेलार, मीनल अमोल काळे, लीग कमिशनर सूरज सामत, लीग ऑपरेशन्सचे अध्यक्ष दीपक चौहान आणि अहमदाबादच्या नवीन संघाचे मालक सुपरस्टार अजय देवगण यांच्या उपस्थितीत एका पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा करण्यात आली.

२०२४ मध्ये स्थापन झाल्यापासून, आयएसपीएलने कमी वेळात मोठे यश मिळवले आहे. प्रत्येक वर्षी या लीगची दर्शकसंख्या आणि स्टेडियममधील उपस्थिती लक्षणीयरित्या वाढली आहे. या लीगने अभिषेक दल्होर, सागर अली, रजत मुंढे, केतन म्हात्रे, जगन्नाथ सरकार आणि फरदीन काझी यांसारखे अनेक प्रतिभावान खेळाडू दिले, जे आता राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत.

या वर्षी लीगचा विस्तार करण्यात आला असून, विद्यमान रोस्टरमध्ये आणखी दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. आता अहमदाबाद आणि दिल्ली या दोन शहरांचे संघ आयएसपीएल कुटुंबात जोडले गेले आहेत. सुपरस्टार अजय देवगण (अहमदाबाद) आणि सलमान खान (नवी दिल्ली) हे या नवीन संघांचे मालक आहेत.

देशभरातून जबरदस्त प्रतिसाद

स्पर्धेसाठीच्या निवड चाचण्यांचे (ट्रायल) वेळापत्रकही जाहीर झाले आहे. आयएसपीएलमुळे हजारो खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक मोठा मंच मिळाला आहे. या स्पर्धेच्या लोकप्रियतेमुळेच सीझन ३ साठी आतापर्यंत ४.३ दशलक्षाहून अधिक खेळाडूंनी आधीच नोंदणी केली आहे.

आगामी सीझन ४ साठी लीगमध्ये 'झोनल इन्स्टिट्यूशन अँड सिलेक्शन टूर्नामेंट' लागू करण्याची घोषणा आशिष शेलार यांनी केली आहे. हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे, जो प्रादेशिक स्तरावर प्रतिभा शोधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळवून देण्यासाठी एक मजबूत आणि संरचित व्यवस्था निर्माण करेल.

 

खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी

सचिन तेंडुलकर म्हणाले, "आयएसपीएलची भूमिका आता केवळ एक लीग एवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भारतीय क्रिकेटमधील प्रतिभा ओळखण्याची आणि त्यांचे संगोपन करण्याची एक चळवळ झाली आहे. सीझन ३ सह लीगचा विस्तार होत असल्याने खेळाडूंना त्यांचे कौशल्य राष्ट्रीय स्तरावर दाखवण्यासाठी अधिक संधी मिळत आहेत. याचा फायदा देशाच्या तळागाळातील क्रिकेटला होईल, असा मला विश्वास आहे."

आशिष शेलार यांनी सांगितले की, लीगला पारंपरिक केंद्रांपलीकडे घेऊन जाण्यासाठी सुरतची निवड करण्यात आली आहे. "आम्ही सादर करत असलेले 'झोनल इन्स्टिट्युशनल मॉडेल' हे संपूर्ण भारतीय क्रिकेटसाठी दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे, ज्यामुळे तळागाळातील प्रतिभेचा विकास होईल," असे ते म्हणाले.

कोअर कमिटी सदस्या मीनल अमोल काळे म्हणाल्या, "सीझन ३ हा आमचा सर्वात महत्त्वाकांक्षी हंगाम आहे. सुरतला यजमानपद देऊन, क्रिकेटला त्याच्या मुळांकडे परत नेण्याचे, स्थानिक समाजाला सक्षम करण्याचे आणि स्थानिक क्रीडांगणांना राष्ट्रीय स्तरावर रूपांतरित करण्याचे आमचे ध्येय आहे."

लीग कमिशनर सूरज समत म्हणाले, "पोर्श ९११ चा एमव्हीपी पुरस्कार म्हणून समावेश करणे हा केवळ एक सनसनाटी पुरस्कार नाही, तर खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि अधिकाधिक उत्तम कामगिरी करण्यास प्रेरित करणारा संदेश आहे."

अहमदाबाद फ्रँचायझीचे मालक अजय देवगण म्हणाले, "सिनेमाप्रमाणेच, क्रिकेट ही अहमदाबादमध्ये एक मोठी सांस्कृतिक घटना आहे आणि मला खात्री आहे की येथे अप्रयुक्त प्रतिभा भरलेली आहे. आयएसपीएलद्वारे आम्ही नवीन नायकांना समोर आणू शकू."

 

महत्त्वाचे बदल आणि निवड चाचण्या

५ ऑक्टोबर २०२५ पासून १०१ शहरांमध्ये सीझन ३ साठीच्या निवड चाचण्या सुरू होतील.

आयएसपीएलमध्ये आता प्रत्येक संघात खेळाडूंची संख्या १८ पर्यंत वाढवली आहे, यात १९ वर्षांखालील दोन खेळाडूंचा समावेश असणे अनिवार्य आहे.

संघाच्या निधीत ५०% वाढ करण्यात आली असून, तो आता १.५ कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे, ज्यामुळे फ्रँचायझींना अधिक मजबूत संघ बनवण्याची संधी मिळेल.

Comments
Add Comment