Saturday, September 27, 2025

राजा शतधनूची कथा

राजा शतधनूची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे

पापी नास्तिक अथवा पाखंडी व्यक्तीच्या सहवासात राहिल्यास अथवा त्याचा सन्मानही केल्यास पाप लागते व त्या पापाचे प्रायश्चित्त आपल्याला विविध जन्म घेऊन फेडावे लागते. अशा अर्थाची एक कथा विष्णू पुराणात सांगितलेली आहे.

फार पूर्वी शतधनू नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव शैब्या होते. ती अत्यंत सज्जन व धर्मनिष्ठ होती. ती दोघेही देव- देवतांची व जनार्दनाची आराधना करीत असत. एकदा त्रिपुरी पौर्णिमेला ते दोघेही गंगा स्नान करून बाहेर पडत होते. तोच त्यांना समोरून एक व्यक्ती येताना दिसली. ती व्यक्ती नास्तिक व पाखंडी होती. त्या व्यक्तीने राजाला धनुर्विद्या शिकविली होती, त्यामुळे तो राजाचा गुरू होता. गुरू असल्याने शतधनू राजाने त्याचा आदरसत्कार करून त्याला वंदन केले. राणीने मात्र त्या व्यक्तीकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

कालांतराने राजा मरण पावला व राणीने सहगमन केले. राणीच्या पूण्य कर्मामुळे पुढच्या जन्मात ती काशी नरेशच्या राजघराण्यात राजकन्या म्हणून जन्माला आली; परंतु राजाने व्रतस्थ असताना धर्मद्रोही व पाखंडी व्यक्तीशी संबंध ठेवला. त्यामुळे तो पुढच्या जन्मात कुत्र्याच्या जन्मात गेला. पुण्य कर्मामुळे राणी जातीस्मरणी म्हणजे मागच्या आणि त्याही पूर्वीच्या जन्मांचा वृत्तांत जाणवणारी होती.

ती वयात येताच राजाने तिच्या लग्नाविषयी हालचाल सुरू केली. जेव्हा पित्याने तिच्या लग्नाची गोष्ट केली तेव्हा तिने त्यांना थांबविले व आपल्या दिव्यदृष्टीने शोध घेतला तेव्हा तिला आपला पती कुत्र्याच्या जन्मात असल्याचे आढळले. तिने त्याचा शोध घेऊन त्याला उत्तम अन्न खाऊ घातले. कुत्रा स्वभावानुसार तिच्यासमोर गोंडा घोळू लागला. तेव्हा ती त्याला म्हणाली, “महाराज तुम्ही तीर्थ स्नानानंतरचे अनाठायी औदार्य आठवा कारण त्यामुळेच तुम्हाला कुत्र्याच्या योनीत जन्म घ्यावा लागला.” तिचे म्हणणे ऐकल्यावर राजाने चिंतन केले व त्याला सर्व आठवले. त्याने गावाबाहेर जाऊन अन्न त्याग करून प्राण सोडला. पुढच्या जन्मात तो लांडगा झाला. राजकन्येने पुन:श्च त्याचा शोध घेऊन पूर्वीप्रमाणे त्याला वृत्तांत कथन केले व तो पूर्वजन्मीचा राजा शतधनू असल्याचे तिने सांगितले. हे ऐकल्यावर सुद्धा त्याने अन्नत्याग करून प्राण सोडला. पुढच्या जन्मी तो कावळा झाला. तेव्हाही राजकन्येने त्याला उपदेश केला तेव्हा त्याने कावळ्याचा देह सोडला. पुढच्या जन्मात मोराच्या जन्माला आला. तेव्हाही त्या पतीव्रतेने त्याची पूर्ण काळजी घेतली. यावेळी राजा जनकाने अश्वमेध यज्ञ केला. त्या यज्ञात तिने स्वतः स्नान केले व त्या मोरालाही स्नान घातले.

पुढे तो राजा जनकाच्या घरी पुत्र म्हणून जन्मला. तेव्हा राजकन्येने आपल्या पित्याला सांगून स्वतःच्या लग्नासाठी स्वयंवर मांडले आणि त्या स्वयंवरात तिने जनकपुत्राशी म्हणजेच पूर्वजन्मीच्या शतधनूशी विवाह केला. उभयतांनी पुढे अनेक वर्षं संसार केला. जेव्हा जनक राजा परलोकवासी झाला. तेव्हा तो राजसिंहासनावर बसला व अनेक वर्षांपर्यंत न्यायनितीनुसार राज्यकारभार केला. शेवटी तो एका युद्धामध्ये मरण पावला तेव्हा ती त्याच्या चितेवर सती गेली. दोघेही उत्तम गतीला गेले.

तेव्हा नास्तिक म्हणजेच अधार्मिक व पातकी लोकांशी काया अथवा वाचेनेही मुळीच संपर्क ठेवू नये. त्यांचे विषयी कधीही सहानुभूती बाळगू नये. त्यांच्यापासून नेहमी दूर राहावे. असा संपर्क झाल्यास तेही मोठे पाप कर्म होते, असे विष्णुपूराणात सांगितले आहे.

Comments
Add Comment