लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, विचार, वर्तन आणि आचरण हे त्याच्या सोबतीवर बरेचसे अवलंबून असते. याच सत्याला अधोरेखित करणारी म्हण म्हणजे ‘फुलासंगे मातीस वास लागे.’
फूल जिथे उमलते तिथल्या मातीला स्वतःचा सुगंध देऊन टाकते. ही माती मुळात साधी असते, पण फुलांच्या सहवासामुळे तिच्यातही सुगंधाची झाक येते. त्याचप्रमाणे चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणारा मनुष्यही त्यांच्या गुणांचा, सद्गुणांचा, विचारांचा आणि संस्कारांचा आपोआप अंगीकार करतो.
संगती चांगली असेल तर व्यक्तिमत्त्व घडते, विचारांची शुद्धता टिकते आणि आयुष्याला योग्य दिशा मिळते; परंतु संगत वाईट असेल तर वाईट सवयी, चुकीचे विचार आणि चुकीच्या वाटा यांकडे मन झुकते. त्यामुळे आपण कोणाच्या सहवासात राहतो, याचा आपल्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होतो.
शिक्षणाच्या, समाजकारणाच्या, आध्यात्मिक क्षेत्रातही हेच सत्य आहे. महान संत, समाजसुधारक, विद्वान यांच्या संगतीत राहिल्यास त्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा सुगंध आपल्यात उतरतो. उलट चुकीच्या व्यक्तींच्या संगतीमुळे आयुष्याचं सुगंधी फूल कोमेजून जातं.
म्हणूनच जीवनात नेहमी चांगली संगत निवडावी, आदर्श व्यक्तींचा सहवास ठेवावा आणि सकारात्मक विचारसरणीला अंगीकारावे. फूल जिथे उमलते तेथल्या मातीलाही स्वतःचा गंध देत असते. फुलांच्या सहवासामुळे तिच्यातही हलकीशी सुगंधी झाक निर्माण होते. हे निसर्गातील आश्चर्यकारक सत्य आहे. त्याचप्रमाणे माणूस ज्या सहवासात राहतो त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर खोलवर होतो.
विद्यार्थ्याने चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिल्यास अभ्यासाची आवड निर्माण होते, शिस्त लागते, आदर्श विचार आत्मसात होतात. उलट वाईट संगतीत गेल्यास चुकीच्या सवयी जडतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष होते व आयुष्य चुकीच्या दिशेने वळते. त्यामुळे संगत नेहमी उत्तमच असावी.
इतिहासातही अशी अनेक उदाहरणे आढळतात. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, महात्मा गांधी यांसारख्या महान व्यक्तींच्या सहवासामुळे अनेकांचे जीवन बदलले. त्यांच्या विचारांचा सुगंध आजही समाजात दरवळतो आहे. यावरून असे दिसून येते की, संगत ही केवळ मैत्रीपुरती मर्यादित नसून ती आपल्या विचारविश्वालाही दिशा देणारी असते. माणूस कोणत्या पुस्तकांच्या, कोणत्या मित्रांच्या, कोणत्या गुरुजनांच्या किंवा कोणत्या वातावरणाच्या सहवासात राहतो हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची घडण ठरवते. म्हणून प्रत्येकाने आपला सहवास नीट निवडला पाहिजे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, जसे फुलांच्या सहवासामुळे मातीही सुगंधित होते तसेच चांगल्या संगतीमुळे मनुष्य जीवन समृद्ध होते. योग्य संगत आपल्याला जीवनात यश, आदर्श आणि समाधान देते. त्यामुळे आपले आयुष्य फुलांसारखे सुगंधी करण्यासाठी आपणही चांगली संगतच निवडली पाहिजे.
झाडावरती फुले फुलतात, आपल्या रंगांनी साऱ्यांच्या डोळ्यांना आनंद देतात. वाऱ्यावरती डोलतात, वाऱ्याच्या संगतीने आपला परिवार परिमल सर्वत्र पसरवून सर्वांना सुखवितात आणि इतक्या कार्यानेही त्यांना समाधान वाटत नाही की काय कोण जाणे? दुसऱ्या दिवशी गळून मातीत पडल्यावरही आपला सुगंध मातीला देऊन तिला सुगंधित करतात. क्षुल्लक माती, पायदळी तुडवली जाणारी माती, परंतु पुष्पांच्या संगतीने तिलाही सुगंध प्राप्त होतो. खरोखरी फुले ही संतांचे, सज्जनांचे प्रतीक आहेत.
फुलांच्या सहवासात ज्याप्रमाणे मातीला सुगंध प्राप्त होतो त्याप्रमाणे सज्जनांच्या सहवासात दुर्जन देखील सज्जन बनतात. म्हणून संगतीचे महत्त्व फार आहे. लहान मुलाला कशी संगत मिळेल यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. लहानपणी जर भोवताली चांगली अभ्यासू मुले असतील तर सामान्य मुलेही अभ्यासू बनतात आणि ती जर उनाड, शिवीगाळी करणारी मुले संगतीला मिळाली तर आपली मुलेही तेच करू लागतात. मुलांचेच कशाला, संगतीने दुराचारी बनलेली वडील मंडळीही आपल्या माहितीत असतील. मित्रांच्या संगतीने जुगार, रेस खेळणारे थोडे का असतात? गुटखा खाणारे कमी का असतात? त्याचप्रमाणे स्नेह्यांच्या सहवासाने आपल्या व्यसनांवरही पाणी सोडणारे आढळतात. संत नामदेव, लहानपणी विठ्ठलाकडे भोजनाचा हट्ट धरून बसणारा नामदेव मोठेपणी दरोडेखोरांच्या संगतीत आल्यामुळे दरोडेखोर बनला; परंतु विसोबा खेचराचा शिष्य बनल्यावर आणि ज्ञानदेवांच्या प्रभावळीत आल्यावर महान विठ्ठल भक्त बनला. ज्ञानदेवांच्या संगतीत आल्यामुळे नामदेवाच्या घरातील सर्वजण विठ्ठल भक्त बनले आणि त्या सर्वांची काव्यरचना आज उपलब्ध झाली आहे. केवढा हा संगतीचा महिमा! म्हणूनच संस्कृत सुभाषितात म्हटले आहे - ‘पुष्पमालानुषंगेण सूत्रं शिरसी धार्यते |’(फुलांच्या माळेमुळे दोराही डोक्यावर बसतो!)
सज्जनांची संगत जितकी लाभदायक तितकीच दुर्जनांची संगत घातक असते. संगत निवडताना चांगली संगतच निवडली पाहिजे. सज्जनांची संगत ही केव्हाही चांगली, ‘आपणासारिखे करिती तत्काळ, नाही काळवेळ तया लागी || म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, “संग जया जैसा लाभ तया तैसा | होतसे अपैसा अनायासे ||
एका बागेत एक सुंदर गुलाबाचे फूल उमलले होते. त्या फुलाच्या आजूबाजूला माती होती, जी नेहमीसारखी गढूळ आणि साधी होती. पण हळूहळू त्या गुलाबाच्या गोड सुगंधामुळे त्या मातीपासूनही मंद ससुवास यायला लागला. लोकांना ते फूल आवडायचेच, पण आता मातीचाही वास घेण्यासाठी ते थांबू लागले. हे पाहून दुसऱ्या झाडाने विचारले, “तुला सुगंध कसा आला?”
माती हसून म्हणाली, “मी काही वेगळी नाही झाले, पण या फुलाच्या संगतीने मीही सुगंधी झाले!”
चांगल्या व्यक्तींचा सहवास आपल्यातही चांगले गुण निर्माण करतो. म्हणून नेहमी सत्प्रेरणा देणाऱ्या, सुसंगत लोकांशी नातं ठेवावं.