
मुंबई : भारताची स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओज यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा दुसरा टीझर ‘१२० बहादुर’ प्रदर्शित केला आहे. दमदार मोशन पोस्टरनंतर आलेला हा नवीन टीझर रोमांच आणि थराराने परिपूर्ण आहे.
टीझरमध्ये “ए मेरे वतन के लोगों” या अमर गीताची गूंज ऐकायला मिळते. कवी प्रदीप यांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांसाठी हे गीत लिहिले होते आणि लता मंगेशकर यांच्या आत्मीय स्वरांनी त्याला अमरत्व दिले. याच युद्धावर आधारित आहे ‘१२० बहादुर’ची कथा. हा चित्रपट रेजांग ला येथील ऐतिहासिक लढाई, त्यात चार्ली कंपनीच्या सैनिकांचे शौर्य, बंधुत्व आणि बलिदान यांचे चित्रण करतो. टीझरमधील प्रत्येक फ्रेममध्ये सैनिकांचा जाज्वल्य उत्साह आणि अढळ धैर्य प्रकर्षाने दिसते.
चित्रपटात फरहान अख्तर हे मेजर शैतानसिंह भाटी यांची भूमिका साकारत आहेत. १३ कुमाऊ रेजिमेंटच्या जवानांसह त्यांनी शत्रूंच्या प्रचंड सैन्याशी सामना करत शौर्याचा इतिहास घडवला होता. चित्रपटाचे चित्रीकरण लडाखच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये झाले असून त्यामुळे त्याचा दृश्यात्मक प्रभाव अधिक प्रभावी ठरला आहे.
Parakram. Deshbhakti. Balidan. Commemorating the valour and sacrifice of the heroes of Rezang La, 1962. 120 Bahadur — Teaser 2 Out Now. #120Bahadur, releasing in cinemas on 21st November. #120Bahadur #EkSauBeesBahadur .... पराक्रम। देशभक्ति। बलिदान। रेज़ांग ला, १९६२ के वीरों… pic.twitter.com/rhUoO9EGLf
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) September 28, 2025
या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले असून निर्माते आहेत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर. ‘१२० बहादुर’ ही केवळ एक युद्धकथा नाही तर रेजांग ला येथील त्या अनामिक शूरवीरांना मोठ्या पडद्यावर वाहिलेली एक भावपूर्ण आदरांजली आहे, ज्यांचे शौर्य आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणा देते.
हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस सिनेमागृहांमध्ये येणार आहे.