
शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगदा
मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे स्वप्न आता खऱ्या अर्थाने वास्तवाकडे वाटचाल करत आहे. या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पात एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या प्रकल्पातील एक मोठे यश नोंदवले गेले. शिळफाटा आणि घणसोली या दोन महत्त्वाच्या ठिकाणांदरम्यानचा ४.८८ किलोमीटर लांबीचा बोगदा आता पूर्णपणे बांधून तयार झाला आहे. प्रकल्पातील सर्व रेल्वे स्थानके आता अंतिम टप्प्यात आहेत.
रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ही बुलेट ट्रेन केवळ उच्चभ्रूंसाठी नसून, ती मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी असेल. या ट्रेनचे भाडे वाजवी ठेवले जाईल. सुरत आणि बिलीमोरा दरम्यानचा हाय-स्पीड कॉरिडॉरचा हा पहिला टप्पा डिसेंबर २०२७ मध्ये कार्यान्वित होणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरत ते बिलीमोरा या महत्त्वाकांक्षी पहिल्या टप्प्याच्या कामाची नुकतीच पाहणी केली. या पाहणीदरम्यान, या विभागाच्या कामातील प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच रेल्वेमंत्र्यांनी सांगितली की, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा पहिला भाग असून, येथील स्टेशन आणि ट्रॅक टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी ट्रॅकचे काम करताना अनेक नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा ५० किमीचा भाग गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा या दरम्यान २०२७ मध्ये सुरू होईल. तसेच २०२९ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुंबई आणि अहमदाबाद या दरम्यानचा संपूर्ण भाग कार्यान्वित होईल. जो दोन प्रमुख शहरांमधील अंतर फक्त दोन तास आणि सात मिनिटांत पूर्ण करेल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. बांधकाम सुरू असलेल्या सुरत बुलेट ट्रेन स्टेशनला भेट दिल्यानंतर आणि ट्रॅक बसवण्याच्या कामांची पाहणी करताना अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली.
यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले की, “पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण प्रगती खूप चांगली आहे. सुरत ते बिलीमोरा दरम्यानच्या प्रकल्पाचा पहिला ५० किमीचा भाग २०२७ पर्यंत सुरु होईल. आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत. २०२८ पर्यंत ठाणे-अहमदाबाद विभाग सुरू होईल आणि २०२९ पर्यंत संपूर्ण मुंबई-अहमदाबाद विभाग सुरू होईल.”
गाड्या ३२०, ३३० आणि ३४० किमी/ताशी वेगाने
वैष्णव म्हणाले, “जर तुम्ही स्टेशनकडे पाहिले तर ते देखील अद्वितीय आहे. सर्व गाड्या सुरत स्टेशनवर थांबतील. बाजूला दोन ट्रॅक आणि मध्यभागी दोन ट्रॅक आहेत आणि दोन प्लॅटफॉर्म आहेत – एक मुंबईसाठी आणि दुसरा अहमदाबादसाठी.” मध्यभागी एक मोठा कॉन्कर आहे… हाय-स्पीड रेल्वे टर्नआउट्स विशेषतः डिझाइन केलेले आहेत, कारण जेव्हा गाड्या ३२०, ३३०, ३४० किमी/ताशी वेगाने प्रवास करतात आणि जेव्हा दोन ट्रॅक एकमेकांना जोडतात तेव्हा कोणतेही अंतर नसावे. सुरत ते बिलीमोरा हा पहिला विभाग २०२७ मध्ये कार्यान्वित होईल.
ट्रॅकसाठी खास सिस्टीम
ट्रॅकमधील व्हायब्रेशनवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जोरदार वारे किंवा अचानक भूकंप आल्यावरही ट्रेन पूर्णपणे स्थिर राहावी यासाठी काही फीचर्स जोडण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतीही आपत्ती आली तरी ट्रेनमधील प्रवाशांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.