
नवी दिल्ली: दिल्लीतील एका व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली फरार असलेला स्वघोषित स्वामी चैतन्यांनद सरस्वती याला दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक छळ, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार अशा अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.
चैतन्यांनद हा दिल्लीतील एका संस्थेत संचालक म्हणून काम करत होता. त्याच्यावर १७ हून अधिक विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांमधील मुलींना लक्ष्य करत होता. तो त्यांना परदेशात नेण्याचं आमिष दाखवून किंवा परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन लैंगिक छळाची मागणी करत असे.
चैतन्यांनदवर संस्थेच्या जवळपास २० कोटी रुपयांचा अपहार केल्याचाही आरोप आहे. त्याने संस्थेची मालमत्ता बोगस ट्रस्टच्या माध्यमातून भाड्याने दिली होती आणि त्यातून मिळणारे पैसे स्वतःकडे ठेवले होते.
त्याने स्वतःला शिकागो विद्यापीठातून एमबीए आणि पीएचडी केल्याचा दावा केला होता. तसेच, तो स्वतःला एक प्रसिद्ध प्राध्यापक, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळख देत होता. त्याच्याकडे संयुक्त राष्ट्राच्या (UN) बनावट नंबर प्लेट्स असलेल्या गाड्याही सापडल्या आहेत.
काही विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की, चैतन्यांनदने त्यांच्यासोबत केलेल्या अश्लील संभाषणांचे पुरावे मोबाईलमधून डिलीट करायला लावले होते. त्यामुळे पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दिल्ली न्यायालयाने त्याची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. त्यानंतर तो पोलिसांना चकमा देऊन अनेक राज्यांमध्ये फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला आग्रा येथून अटक केली.