Saturday, September 27, 2025

प्रार्थना

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी सामायिक प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेतून कोणते तरी महत्त्वाचे संदेश दिले जातात. उदा. आम्ही योग क्लास सुरू होण्याच्या आधी एक प्रार्थना म्हणतो : सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ॥ या प्रार्थनेचा अर्थ आहे की सर्वांनी सुखी राहावे, सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, सर्वांनी नेहमी कल्याणकारी आणि शुभ गोष्टी पाहाव्यात. यापुढे असे म्हटले आहे की, कोणीही दुःखी नसावे किंवा दुःखाचे भागीदारही नसावे. हा मंत्र किंवा प्रार्थना जगाच्या कल्याणाची कामना करणारा एक मंगलदायी संदेश आहे. खरंतर अशा प्रार्थनेची खूप सारी उदाहरणे देता येतील. प्रार्थना म्हटल्याने एक चांगली सुरुवात होते. शिवाय समूहाने जेव्हा म्हटली जाते तेव्हा त्याचा एक वेगळाच आनंद आणि परिणाम असतो. आपल्या सगळ्या व्यापापासून, दगदगीपासून प्रार्थना सहज दूर नेऊन आपल्यात सकारात्मकता जागवते. ‘मी’पणा संपून आपल्या विचारांना व्यापकता मिळते. या प्रार्थनेविषयीची एक कथा ऐकिवात आली आहे. एका छोट्याशा हॉटेलमध्ये एक लहान मुलगी रोज येऊन जेवून जायची. त्या हॉटेलमध्ये नव्यानेच लागलेल्या वेटरच्या ही गोष्ट लक्षात आली. तो वेटर आपल्या मालकाला म्हणाला, “मालक, आपल्या हॉटेलमध्ये दुपारी जेवणासाठी जेव्हा खूप गर्दी होते तेव्हा त्या गर्दीचा फायदा घेऊन एक लहान मुलगी रोज इथे जेवून जाते. तिने आत येताना कुपन फाडलेले नसते, हे तुमच्या कधी लक्षात नाही आले का?” आपण खूप चांगले काम केले असे वाटून, मालक कौतुक करेल अशा आशेने वेटरने मालकाकडे पाहिले. मालक शांतपणे उत्तरले - “तू प्रामाणिकपणे आणि बरोबर माहिती दिलेली आहे. ती या मंदिराचा आवार स्वच्छ करणारी मुलगी आहे. जवळजवळ सहा महिन्यांपासून ती गर्दीचा फायदा घेऊन जाते. तू इथे नव्याने लागला आहेस त्यामुळे तुला माहीत नाही पण तू तिच्याकडे कधीच पैसे मागू नकोस किंवा पैसे न देता आत आली म्हणून ओरडूही नकोस. मी आणि इतर वेटर जसे तिच्याकडे दुर्लक्ष करतो तसेच तूही दुर्लक्ष कर.” वेटरने मालकाच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले, “पण मालक, हे रामकृष्ण हॉटेल आहे. इथे काही मंदिराचा भंडारा चालू नाही की कोणीही असं घुसायचं आणि फुकट खाऊन जायचं. जर तिला तुम्ही असंच फुकट खाऊ दिलं तर उद्या ती तिच्याबरोबर आणखी चार लोकांना घेऊन येईल. ते चार लोक कदाचित आणखी पाच-पन्नास लोकांना घेऊन येतील. पुढे कदाचित हे हॉटेल बंदच होईल!” मालक हसत म्हणाले, “तुला माहीत नसलेली मी एक गोष्ट सांगतो. मी रोज सकाळी जेव्हा हॉटेलमध्ये येतो तेव्हा ती समोरच्या गणपतीच्या मंदिराकडे गुडघे टेकून खाली बसलेली असते आणि ती एक प्रार्थना करते. त्या प्रार्थनेत ती देवाला म्हणते की देवा रामकृष्ण हॉटेलमध्ये खूप ग्राहक जेवणासाठी येवोत, जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन मी फुकट जेवू शकेल!” हे ऐकून वेटर म्हणाला, “याचा अर्थ काय मला कळला नाही.” मालक उत्तरले, “अरे बाबा, ‘हॉटेलमध्ये गर्दी होवो’, ही तिची प्रार्थना देव ऐकतो आहे. त्यामुळेच माझ्या हॉटेलमध्ये इतकी गर्दी होत आहे. त्या गर्दीचा तिला फायदा मिळत असेलही. तो फायदा देणारा मी कोण? तिला अशा तऱ्हेने पोटभर जेवता येते ही तिच्या प्रार्थनेची ताकद आहे, असे मला तरी वाटते! तर प्रार्थना किंवा मनापासून एखाद्या गोष्टीची याचना केली, सातत्याने चांगला विचार केला तर तो नक्कीच फळतो. मग चला तर आपणही रंजल्यागांजल्यासाठी, दुःखी पंडितांसाठी मनोमन प्रार्थना करूया. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । दुसऱ्यांसाठी केलेल्या प्रार्थनेचे फळ आपल्यालाही निश्चितपणे लाभतेच! pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment