नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी दोनच सिनेमात एकत्र काम केले. ‘आनंद’(१९७१) आणि ‘नमकहराम’(१९७३). दोन्हीचे दिग्दर्शक होते सिनेक्षेत्रातील एक बंगाली जादुगार- हृषिकेश मुखर्जी! याला अपवाद होता फक्त ‘नसीब’(१९८१) ज्यात अमिताभ नायक होता आणि राजेश खन्ना फक्त एकदा दिसला होता.
या दोघा दिग्गजांबरोबर सहकलाकार होते ललिता पवार, सुमिता सन्याल, सीमा व रमेश देव, दुर्गा खोटे, असित सेन, जॉनी वॉकर, दारा सिंग, ब्रह्म भारद्वाज आणि देव किशन. आनंद केवळ एक सिनेमा नव्हता, तो होता एक भयंकर अनुभव!
रक्ताच्या कर्करोगाने आजारी पडलेला आनंद सहगल (राजेश खन्ना) डॉ. प्रकाश कुलकर्णीकडे (रमेश देव) उपचार घेतोय. डॉ. कुलकर्णी हे पूर्णत: व्यावसायिक डॉक्टर, मात्र त्यांचा मित्र असलेल्या डॉ. भास्कर बॅनर्जीने (अमिताभ) डॉक्टरी पेशा निवडलाय तो गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी!
डॉ. कुलकर्णी आनंदची ओळख भास्करशी करून देतात आणि ते दोघे चांगले मित्र बनतात. आपले आयुष्य केवळ ६ महिनेच शिल्लक आहे हे माहीत असलेला आनंद आपल्या आजारामुळे येणारी निराशा जाणीवपूर्वक टाळतोय. उलट सतत अत्यंत आशावादी राहून जाता जाता तो इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हे सर्व रोज पाहणे अमिताभला स्वत:च्या अगतिकतेमुळे असह्य होत आहे. त्याला स्वत:चाच राग येऊ लागतो.
शेवटी आनंदचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूनंतर अमिताभ स्वत:च्या डायरीतील नोंदीचेच एक पुस्तक प्रकशित करतो. त्याला पारितोषिकही मिळते. त्या सोहळ्यातील अमिताभच्या भाषणानेच हा सिनेमा सुरू होतो.
आपण वैद्यकीय शास्त्राचा इतका अभ्यास करूनही आनंदसारख्या निरागस मित्रासाठी काहीच करू शकत नाही ही अगतिकता अमिताभला अस्वस्थ करत असते. आपल्या भाषणात तो म्हणतो, ‘मैं रोगसे लड सकता था, लेकीन भूख और गरिबीसे कैसे लडता? जिस जंग के लिये मैं मैदानमे उतरा था, उसके हथियारही मेरे पास नही थे!’
सिनेमात केवळ ४ गाणी होती. संगीत होते सलीलदांचे! दोन गाणी योगेश गौड यांनी लिहिलेली आणि दोन गुलजार यांची. ‘आनंद’चे प्रत्येक गाणे प्रेक्षकांना अस्वस्थ करते. हा सिनेमा आपल्याला एकदातरी ढसढसा रडवल्याशिवाय राहत नाही. पण हे रडणे वेगळेच असते. वेदनादायी असले तरी ते प्रेक्षकाला चिंतनशील बनवते, एकंदर आयुष्याबद्दलच गंभीर विचार करायला भाग पाडते! जीवनाकडे बघण्याचा एक अगदी नवाकोरा दृष्टिकोन देते.
प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडतो तो एक वेगळाच माणूस बनून! भलेही हे वेगळेपण काही काळाने संपत असले तरी ‘आनंद’ तुम्हाला आमूलाग्र बदलवून टाकतो हे नक्की! हा सिनेमा प्रत्येक डॉक्टरने पाहिलाच पाहिजे असा आहे. प्रसिद्ध सिनेपत्रकार अनुपमा चोप्रा यांनी म्हटल्याप्रमाणे ‘मरण्यापूर्वी एकदा पाहावाच’ केवळ असा हा सिनेमा नाही, तो सर्वांनी आयुष्यात १०० वेळा पाहावा असा आहे!
आपले क्षणाक्षणाला संपत चाललेले आयुष्य आनंदाने घालवण्याची राजेशची धडपड सुरू आहे. खरे तर, त्याची काही तक्रारही नाही. प्रत्येकाशी प्रेमाने वागून त्याने स्वत:चे एक विश्व उभे केलेय. ते कधीही सोडून जावे लागेल म्हणून त्याने निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करत अतूट नाती निर्माण केलीयेत.
मात्र ऋषीदांनी त्याच्या अंतर्मनातले दु:ख प्रकट करणारे एक गाणे योगेश यांच्याकडून लिहून घेतले होते. एका सायंकाळी राजेश एकटाच बसला आहे. त्याला प्रेयसीची आठवण येते. कर्करोगाच्या उपचारासाठी मुंबईला येताना त्याने तिला कायमचा निरोप देऊन ‘लग्न करून सुखी व्हायला’ सांगितले आहे. तरीही अवघे भावविश्व घेरणाऱ्या जिवलगाची आठवण अशी थोडीच जाते?
मुकेशजींच्या नितळ, सात्विक आवाजातल्या या गाण्याच्या शब्दांप्रमाणे ‘मेरे खयालोके आंगनमें कोई सपनोके दीप जलाये.’ अशी आनंदची तिच्या आठवणीने झालेली टोकाची उदास मन:स्थिती आहे. तिच्याशी पुन्हा भेट तर या जन्मात शक्य नाही. तरीही आनंदच्या मनाच्या अदृश्य अंगणात येऊन ती सायंकाळी दिवे लावते!! किती अस्वस्थ करणारी कल्पना!
“कहीं दूर जब दिन ढल जाये,
साँझकी दुल्हन बदन चुराए,
चुपकेसे आये.
मेरे खयालोंके आंगनमें,
कोई सपनोंके दीप जलाए.”
समोर मृत्यू दिसतो आहे, तो एकेक पाऊल जवळ येतोय. एकेक श्वास घेणे अवघड होते आहे. अशावेळी सर्वात जिवलग व्यक्तीच्या आठवणीने डोळे भरून येणारच ना! आणि आनंद म्हणतो अशा वेळी ती अल्लडपणे माझ्या अवतीभोवती वावरू लागते. मला स्पर्श करते पण दिसत नाही...
‘कभी यूंही जब हुई बोझल सांसें,
भर आईं बैठे-बैठे जब यूंही आंखें,
तभी मचलके प्यारसे चलके,
छुए कोई मुझे पर नज़र न आये.
कहीं दूर जब दिन ढल जाये...’
मुळात मने इतकी घट्ट जुळणे किती अवघड असते. पण ती जुळली होती, इतकी की त्या दोघांचे नाते जन्मोजन्मीचे आहे असे वाटू लागले होते. पण जीवनाचे कोडे किती विचित्र असते, नेमके जिथे मन जुळले तेच नाते संपवावे लागते! मन मग त्या विरहाचे दु:ख स्वत:हून आयुष्यभर सोसत राहते!
“कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते,
कहींपे निकल आये जन्मोंके नाते.
है मीठी उलझन बैरी अपना मन,
अपनाही होके सहे दर्द पराये.
कहीं दूर जब दिन ढल जाये...”
आनंदच्या मनात घालमेल आहे. तो दाखवत नसला तरी समुद्रात जशा लाटा याव्यात तसे मनात दु:खाचे कढ येताहेत. सोन्यासारखी स्वप्ने कायमची हरवली. तो स्वत:शीच म्हणतो, ‘स्वप्नांचा तेवढा एकच तर आधार होता, तोही सुटला. आता मनातून त्यांच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत. तरीही जेंव्हा दूर कुठेतरी सगळ्या जीवनाचीच शेवटची ठरणारी ही सायंकाळ येते, आसपास रेंगाळते, तेंव्हा माझ्या मनाच्या अंगणात हळूच येऊन ती सगळीकडे दिवे लावत असते-
दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे,
खो गये कैसे मेरे सपने सुनहरे,
ये मेरे सपने, यही तो हैं अपने.
मुझसे जुदा न होंगे इनके ये साये,
कहीं दूर जब दिन ढल जाये...
सिनेमाच्या शेवटी अमिताभच्या आवाजात एक वाक्य येते, ‘आनंद मरा नही, आनंद मरते नही.’ केवढे विलक्षण भाष्य! प्रचंड दु:खात असूनही विनातक्रार आयुष्य घालवणारे, शेवटपर्यंत दुसऱ्यांना आनंद देणारे असे कुणीतरी अगदी आपल्या जवळून निघून गेलेले असते.
आपल्या सिनेसृष्टीने, अर्थात पूर्वीच्या चित्रपटसृष्टीने, निर्माण करून ठेवलेल्या अशा अक्षय आनंदांची आठवण ताजी राहावी म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!