Saturday, September 27, 2025

मनाचा मोठेपणा

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे

शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते. गेली चार वर्षे विद्याधरच प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावत होता. यावर्षी ‘छत्रपती शिवरायांचे स्वराज्य’ या विषयावर स्पर्धकांना तीन मिनिटे बोलायचे होते.

विद्याधरने नेहमीप्रमाणे स्पर्धेची तयारी सुरू केली. विद्याधर वर्गातला हुशार आणि विनयशील विद्यार्थी. सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने बोलणारा, सर्वांना मदत करणारा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमात नियमितपणे भाग घेणारा! हे त्याचं स्पर्धेत भाग घेण्याचं पाचवं आणि शेवटचं वर्ष. यावर्षी प्रथम क्रमांकाचं पहिलं बक्षीस पटकावून तो दहा हजार रुपयांची घसघशीत कमाई करणार होता. यावर्षी दहावीची परीक्षा देऊन तो शाळेचा निरोप घेणार होता. शिवाय जाता जाता सलग पाच वेळा वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस पटकावून! स्पर्धेला केवळ चारच दिवस उरले होते. विद्याधरची पूर्ण तयारी झाली होती. विद्याधरच्याच मागे बसणारा अजिंक्य नावाचा त्याचा मित्र; तोही या स्पर्धेत नेहमी भाग घ्यायचा. पण विद्याधर पहिला आणि अजिंक्य नेहमीच दुसरा! त्यामुळे अजिंक्यच्या मनात विद्याधरबद्दल असूया होती. प्रत्येक वेळी आपला दुसरा क्रमांक! असे का होते? विद्याधर चांगल्या घरातला, त्याचे आई-बाबा उच्चशिक्षित, श्रीमंत म्हणूनच त्याचा पहिला क्रमांक येतो. असा विचार अजिंक्य सतत करायचा. त्याच्या मित्रांशी बोलताना विद्याधरबद्दल नको नको ते बोलायचा. विद्याधरला हे सर्व कळत होतं. शाळा सोडताना अजिंक्य सारखा आपला एक मित्र आपल्याबद्दल वाईट का बरे बोलतो? गेली दहा वर्षे आपल्या सोबत असणारा आपला हा मित्र असे का बरं वागतो? याचं कोडं त्याला उलगडत नव्हतं. आपण भाषण स्पर्धा जिंकण्यापेक्षा आपल्या मित्राचं मन जिंकलं पाहिजे असा विचार विद्याधरच्या मनामध्ये येऊ लागला. त्याचं मन आपण कसे जिंकू याचा विचार करता करता स्पर्धेचा दिवस उजाडला.

शाळेचे सभागृह गच्च भरले होते. व्यासपीठावर एक माईक उभा करून ठेवला होता. परीक्षक पहिल्या रांगेत बसून परीक्षण करणार होते. विद्यार्थी, शिक्षक यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सगळ्यांच्याच मनात उत्सुकता होती, कोण जिंकणार? एक, दोन, तीन, चार अशा क्रमांकाचे वक्ते येऊन गेले. सगळ्यांची भाषणे छान होत होती. तेवढ्यात अजिंक्य राणेचं नाव पुकारलं गेलं. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. कारण अजिंक्यसुद्धा एक उत्तम वक्ता होता. तोही गेली चार वर्षे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवतच होता. मोठ्या आवेशात, खणखणीत आवाजात, स्पष्ट शब्द उच्चारात, योग्य हातवारे आणि छान हावभावाचे प्रदर्शन घडवत अजिंक्यने सगळे सभागृह जिंकून घेतले. यावर्षी पहिलं बक्षीस अजिंक्यच मिळवणार याची खात्री सर्वांना पटली.

आता विद्याधर कुलकर्णीच्या नावाचा पुकारा झाला. एकदा, दोनदा, नव्हे तीनदा झाला. पण विद्याधर व्यासपीठावर आलाच नाही. सगळी मुलं, शिक्षकवृंद विद्याधरला शोधू लागले. पण विद्याधर तर कुठेच दिसेना. काय झाले? कुठे गेला? मुलांची कुजबूज सुरू झाली. पण दोन मिनिटांनंतर पुढचे नाव पुकारले गेले अन् स्पर्धा सुरू झाली. अजिंक्य मनातून खूप खूश झाला. आता पहिला क्रमांक आपलाच येणार याची त्याला खात्री पटली. पण विद्याधर स्पर्धा सोडून कुठे गेला? हा प्रश्न मात्र अजिंक्यला छळू लागला. यथावकाश स्पर्धा संपली. दहा हजार रुपयांचं पहिलं बक्षीस अजिंक्यलाच मिळालं. मोठ्या अभिमानानं त्यानं ते स्वीकारलं.

शाळा सुटण्याची बेल वाजली. अजिंक्य शाळेबाहेर पडला. तोच समोर विद्याधर उभा! अजिंक्यने मोठ्या उत्साहाने त्याला मिळालेलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दाखवलं. विद्याधरने त्याला मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं. मग अजिंक्यने त्याला विचारलं, “अरे नेमका स्पर्धेच्याच वेळी तू कुठे गेला होतास? किती वेळा तुझे नाव पुकारले!” विद्याधरला बघताच तिथे मुलांचा घोळका जमला. विद्याधर सांगू लागला, “अरे अजिंक्य, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तुझा लहान भाऊ शाळेत आला होता. आईला बरं वाटत नाही असं तो रडत रडत सांगत होता. मग मीच त्याच्या सोबत गेलो आणि आईला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून आलो. आता ती बरी आहे.” हे ऐकताच अजिंक्य ओरडला, “काय? माझ्या आईसाठी तू स्पर्धा सोडलीस!” अजिंक्यचे डोळे भरून आले. त्याने विद्याधरला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाला, “विद्याधर किती मोठ्या मनाचा आहेस रे तू! मला पहिलं बक्षीस मिळावं म्हणून तू मला न सांगता स्वतः गेलास. हे खरं आहे ना? अजिंक्य भरल्या डोळ्यांनी विद्याधरकडे बघत होता अन् त्याच्या मनाचा मोठेपणा अनुभवत होता. दुसरीकडे विद्याधरला मात्र मित्राच्या रूपानं एक अमूल्य बक्षीस मिळालं होतं.

Comments
Add Comment