थोर स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब कालेलकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर


दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, ऊर्फ काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, इतिहासकार, शिक्षण तज्ज्ञ, पत्रकार, साहित्यिक तसंच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक तथा गांधीवादी म्हणून परिचित आहेत. काकासाहेब कालेलकरांचा जन्म १ डिसेंबर १८८५ साली झाला. कालेलकर घराणे मूळचे सावंतवाडीचे. फर्ग्युसन महाविद्यालयातून ते १९०७ मध्ये बी.ए. झाले आणि एलएल.बी.चे पहिले वर्ष पूर्ण केले. फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी राष्ट्रमत या दैनिकात संपादकीय विभागात काम केलं. त्यानंतर बडोदा येथील गंगाधर विद्यालयात कालेलकर शिक्षक म्हणून रुजू झाले, पण या विद्यालयात सरकार विरोधी कारवाया चालतात असे कारण दाखवून ब्रिटिश सरकारने हे विद्यालय बळजबरीने बंद केले.


गंगाधर विद्यालय बंद झाल्यावर काकासाहेब महात्मा गांधीजींच्या गुजरात येथील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी सर्वोदय या महात्मा गांधीजींच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले, हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी मोलाचे योगदान बजावले, त्यासाठी हिंदुस्थानी प्रचार सभेच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला. भारत देशाचं ऐक्य टिकून राहण्यासाठी हिंदी भाषेच्या प्रचाराची नितांत आवश्यकता असल्याचे ते मानत, त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमणही केले. त्यांच्या मनावर आधी सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव, पण पुढे महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा संस्कार होऊन ते पूर्णपणे गांधीवादी झाले. १९१७ साली ते अहमदाबादच्या गांधीजींच्या साबरमती आश्रमात गेले. १९३७ मध्ये ते वर्धा-सेवाग्रामला आले. गांधीजींच्या नवजीवन साप्ताहिकात ते लिहीत. गुजराती भाषा आत्मसात करून ते गुजरातीमधले नामवंत साहित्यिक झाले.


स्वातंत्र्याच्या आंदोलनात सतत भाग घेऊन त्यांनी बरेचदा कारावास सोसला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची दोन वेळा राज्यसभेत नियुक्ती झाली. अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले. गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष तसेच हिंदी विश्वकोश समितीचे ते सदस्य होते. त्यांना भारत सरकारचे ‘पद्मविभूषण’, ‘साहित्य अकादमी’चे पारितोषिक व फेलोशिप असे बहुमानही मिळाले. त्याशिवाय अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य अशी ‘डी.लिट.’ची पदवीही अर्पण केली. त्यांना प्रवासाची विलक्षण हौस होती. हिमालय, ब्रह्मदेश, जपान, पूर्व आफ्रिका आणि संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला आणि गुजराती भाषेत त्या प्रवासांची रसाळ आणि काव्यात्म वर्णने करून गुजराती साहित्यात प्रवास वर्णनांचे दालन समृद्ध केले. गुजराती भाषेतला पहिला शब्दकोश ‘जोडणी-कोश’ त्यांनीच तयार केला. तुरुंगात असतानाच त्यांनी उत्तरेकडील भिंती नावाचे पुस्तक लिहिले.


त्याशिवाय हिंडलग्याचा प्रसाद, वनशोभा, खेळकर पाने ही ललितगद्यपर पुस्तके लिहिली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’चा प्रभाव त्यांच्या मनावर होता व त्यातूनच ‘रवींद्रमनन’सारखे पुस्तक निर्माण झाले. विष्णुभट गोडसे ह्यांचे ‘माझा प्रवास’(१८५७ सालच्या बंडाची हकिकत) हे प्रवासाच्या हौसेमधूनच त्यांनी वाचले. ते वाचल्यावर त्यांना ते काल्पनिक पुस्तक - कादंबरी आहे, असे वाटले आणि त्यांनी इतिहासाचार्य चिं. वि. वैद्य ह्यांना पत्र लिहून तसे विचारले. ह्याचे कारण त्या पुस्तकाची भाषा हेही होते. त्यांच्या प्रवास वर्णनांची मराठीत भाषांतरे झाली व मराठी साहित्यात भाषांतरित प्रवास वर्णनांचे दालन खुले झाले. कालेलकरांची आमच्या देशाचे दर्शन अनुवाद : वामन चोरघडे, ब्रह्मदेशचा प्रवास अनुवाद : श्रीपाद जोशी, भक्तिकुसुमे अनुवाद : वामन चोरघडे, ‘लाटांचे तांडव’ अनुवाद : वामन चोरघडे ही प्रवास वर्णने मराठीत आली. लोकमाता भारतातील नद्यांचे वर्णनही मराठीत आले होते. लेखक सतत लिहिता राहावा, हे कालेलकरांच्या संदर्भात सत्य ठरते.


महात्मा गांधीजींच्या प्रेरणेमुळे साकारलेल्या गुजरात विद्यापीठाच्या स्थापनेत काकासाहेब कालेलकरांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. काही काळ कालेलकर गुजरात विद्यापीठाचे कुलगुरूही होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे १९५३ साली ‘मागास वर्गीय आयोग’ नेमण्यात आला होता, काकासाहेब कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. १९५५ ला या आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात दलित तसंच अस्पृश्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.


काकासाहेब कालेलकरांवर मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती जनतेने सुद्धा भरभरून प्रेम केले, कालेलकरांना गुजराती लोक आदराने ‘सवाई गुजराती’ म्हणत असत. काकासाहेब कालेलकरांनी लेखन आणि शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने १९६४ साली ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरविले, तर कालेलकरांच्या साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामासाठी १९६६ साली ‘जीवन व्यवस्था’ या गुजराती भाषेतील निबंध संग्रहसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला, तर १९७१ साली ‘साहित्य अकादमीचे सदस्यत्व’ही बहाल करण्यात आले. २१ ऑगस्ट १९८१ साली वयाच्या ९६ व्या वर्षी काकासाहेब कालेलकरांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काकासाहेब कालेलकरांना ९६ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. टिळक-आगरकरांच्या कालखंडापासून इंदिरा गांधींच्या कारकिर्दीच्या अनुभवापर्यंत.


(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Comments
Add Comment

संस्मरणीय

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड मी मराठी विश्वकोशाची प्रमुख संपादक होते तेव्हा वाई येथे महिन्यातून १० दिवस (३-३-४)

मद्र नरेश ‘शल्य’

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे शल्य हा महाभारत युद्धातील प्रभावी योद्ध्यांपैकी एक होता. शल्य हा मद्र

जागतिक वारसास्थळ, सिंधुदुर्ग किल्ला

विशेष : लता गुठे छत्रपती शिवरायांच्या शौर्याने आणि पराक्रमाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. या भूमीवरच उभी

आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही...

डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे एक हुरहूर लावणारा काळ असतो. वर्ष संपत आलेले, वर्षाच्या सुरुवातीला केलेले अनेक

टायगर सफारी : पेंचच्या मोगली लँडमध्ये ६ तास

सफर : प्राची शिरकर “टायगर सफारी... हे नाव जरी काढलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात! वाघ पाहण्याची ओढ कोणाला नसते?

भारतीय चित्रपट निर्माते - दादासाहेब तोरणे

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर मचंद्र गोपाळ तोरणे तथा दादासाहेब तोरणे’ हे मराठी, भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांना