Sunday, September 28, 2025

दसरा सणात मुलांचाही सहभाग महत्त्वाचा!

दसरा सणात मुलांचाही सहभाग महत्त्वाचा!

मुंबई : दसरा म्हणजे विजयाचा, उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस. पण आजच्या काळात या सणाचा अर्थ फक्त सुट्टी, नवीन कपडे आणि बाहेर जेवण इतकाच उरलेला आहे. विशेषतः लहान मुलांसाठी. अभ्यासाचा ताण, इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि आधुनिक जीवनशैली यामुळे सणांचे पारंपरिक स्वरूप आणि त्यामागचा खरा अर्थ मुलांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे यंदा दसरा साजरा करताना पालकांनी ठरवून मुलांनाही या आनंदात सहभागी करा आणि सणाचे महत्व समजावून सांगा.

सणासुदीच्या काळात मुलांना थोडी विश्रांती द्या

दसऱ्याच्या सुमारास बहुतांश शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू असतात. पण तरीही मुलांना अभ्यासापासून काही वेळ बाजूला ठेवून सणात सहभागी होण्याची संधी द्या. केवळ मौजमजा नव्हे तर भारतीय संस्कृती आणि परंपरा समजून घेण्याची ही एक योग्य वेळ असते.

दसऱ्याचा इतिहास आणि महत्त्व समजावून सांगा

रावणाचा पराभव करून प्रभू श्रीरामांनी धर्माचा विजय कसा साधला, हे मुलांना सोप्या शब्दांत समजवा. दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय — हे तत्व त्यांनी मनापासून समजून घेतलं पाहिजे. केवळ रावणाचा पुतळा जळतो, इतकं सांगणं पुरेसं नाही. त्यामागची गोष्ट, मूल्यं आणि संस्कृती त्यांना कळायला हवीत.

घर सजावटीत सहभागी करून घ्या

दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुलं, आंब्याच्या पानांचे तोरण, रांगोळ्या याने घर सजवलं जातं. मुलांना या सजावटीत सामील करून घ्या. त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन द्या. या निमित्ताने त्यांच्यात कला, संयम आणि सहकार्य यांचा विकास होतो.

सरस्वती पूजनात भाग घ्यायला लावा

या दिवशी ज्ञानदेवतेचं पूजन केलं जातं. मुलांना आपली वही, पुस्तकं, लेखन साहित्य पूजायला सांगा. त्यातून शिक्षणाचं महत्त्व, कृतज्ञता आणि नम्रतेची भावना त्यांच्या मनात रुजेल.

आपट्याच्या पानांचे महत्व शिकवा

दसऱ्याला सोनं समजून आपट्याची पानं एकमेकांना दिली जातात. ही परंपरा सांभाळण्यासाठी मुलांना सोबत घेऊन शेजाऱ्यांना, नातेवाईकांना ही पानं वाटा. यामुळे त्यांच्या सामाजिक कौशल्यात वाढ होते आणि त्यांना देणगी व परोपकाराचे मोल कळते.

रामलीला किंवा घरगुती नाटकांचे आयोजन करा

मुलांना मनोरंजक पद्धतीने रामायणातील कथा सांगण्यासाठी त्यांना रामलीला दाखवा किंवा घरातच लहानसं नाटक सादर करा. यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होईल आणि कथा लक्षातही राहतील.

दसरा म्हणजे केवळ सण नव्हे, संस्कारांची संधी!

एकत्रित सण साजरे करताना घरातला आनंद वाढतो आणि मुलांना चांगली सवय लागते. त्यामुळे यंदाचा दसरा फक्त ‘सण’ म्हणून न साजरा करता, तो एक संस्कृतीचे शिक्षण देणारा अनुभव बनवा, जो मुलांच्या मनात कायमचा घर करून बसेल.

मुलांना गरबा खेळण्यासाठी पाठवा

गरबा नृत्य हा केवळ मनोरंजन नाही तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर आहे. यामुळे त्यांची तंदुरुस्ती वाढते, शरीरातील चरबी वेगाने कमी होते, शरीरात ऊर्जा राहते आणि सांस्कृतिक ओळख मजबूत होते. तसेच, टीमवर्क आणि अनुशासन शिकण्यास मदत होते, जे मुलांच्या सामाजिक विकासासाठी आवश्यक आहे.

Comments
Add Comment