
रेल्वेचे नियम, बंधनांविरोधात मोटरमनची नाराजी
नवी दिल्ली : मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या निर्णयानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने आता मोटरमनच्या मोबाईलवरील इंटरनेटवर करडी नजर रोखली आहे. रेल्वे प्रशासनाने मोटरमनना कॉर्पोरेट सीमकार्ड दिली आहेत. ती सीमकार्ड असलेल्या मोबाईलवर मोटरमन काय पाहतात? कितीवेळा कॉल्स करतात? आदी गोष्टींचा डाटा गोळा करण्यास मध्य रेल्वेने सुरुवात केली आहे. या माध्यमातून कारवाई केली जाण्याच्या शक्यतेने मोटरमन चिंतेत असून रेल्वेच्या जाचक नियम, बंधनाविरोधात मोटरमनमध्ये नाराजी आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरी विभागात सद्यस्थितीत ७०० हून अधिक मोटरमन आहेत. सर्व मोटरमनना कॉर्पोरेट सीमकार्ड दिली आहेत. त्यात अनलिमिटेड इंटरनेट पॅक दिला असून मोबाईलच्या संपूर्ण बिलाचा भरणा रेल्वे प्रशासनाद्वारे केला जात आहे. सिग्नल उल्लंघनाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोटरमनच्या मोबाईलवर करडी नजर रोखली आहे. मोटरमन ऑन डय़ुटी तसेच डय़ुटी संपल्यानंतर मोबाईलवर काय पाहताहेत? डय़ुटीवर असताना कोणाला कॉल करतात? याचा डाटा गोळा करण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यामुळे मोटरमनमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आम्हाला भले रेल्वे प्रशासनाने सीमकार्ड्स दिली असली तरी डय़ुटी संपल्यानंतर मोबाईलवर काय पाहायचे? यात हस्तक्षेप का केला जात आहे, असा सवाल मोटरमन उपस्थित करीत आहेत. रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारे सातत्याने पाळत ठेवण्याचे काम बंद करावे, अन्यथा सीमकार्ड प्रशासनाकडे सरेंडर करू, असा पवित्रा मोटरमनच्या संघटनांनी घेतला आहे.ट्रेन चालवताना ‘फ्लाईट मोड’ ठेवण्यास मनाई
मोटरमनना लोकल ट्रेन चालवताना मोबाईल पूर्णपणे बंद ठेवण्याचे बंधन आहे. तथापि, एक ट्रेन चालवल्यानंतर विश्रांती घेण्याच्या काळात त्यांना मोबाईल पुन्हा सुरू करण्यास मुभा आहे. या अवधीत त्यांनी किती कॉल्स केले? मोबाईलवर काय पाहिले? याचा डाटा रेल्वे प्रशासनाने गोळा केला असून संबंधित मोटरमनकडून स्पष्टीकरण मागवल्याचे समजते. मोटरमनना ट्रेन चालवताना मोबाईल ‘फ्लाईट मोड’वर ठेवण्यासही मनाई आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मोबाईल सुरू करणे मुश्कील होते, असे काही मोटरमननी सांगितले.मोटरमनच्या मोबाईलवर पाळत ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण चुकीचे आहे. ड्युटी संपल्यानंतर मोटरमनने त्यांच्या मोबाईलवर काय पाहिले, यावर बंधन घालणे ही दडपशाही आहे. – संजय जोशी, कार्याध्यक्ष, रेल कामगार सेना