
प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं?
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली. प्रेयसीसोबत झालेल्या वादानंतर एका २२ वर्षीय तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मृत तरुणाचे नाव ऋषिकेश परब असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी होता. महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीशी त्याची ओळख झाली होती आणि ती हळूहळू प्रेमसंबंधात बदलली. काही महिन्यांपर्यंत हे नातं सुरळीत चाललं, पण अलीकडे त्यांच्यात वादविवाद सुरू झाले होते.
सुदामा इमारतीत सहाव्या मजल्यावर ऋषिकेश आपल्या कुटुंबासोबत राहत होता. शनिवारी सकाळी झालेल्या वादानंतर ऋषिकेशने संतापाच्या भरात मोबाईल घरात फेकून दिला आणि थेट इमारतीच्या अकराव्या मजल्यावर गेला. तिथे डक्ट भागात उभं राहून तो उडी मारण्याच्या तयारीत असल्याचं पाहून इमारतीतील रहिवाशांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. लगेचच विष्णुनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाचे जवानही मदतीला आले.
पोलीस आणि नागरिकांनी खूप प्रयत्न करूनही ऋषिकेश ऐकायला तयार झाला नाही. अचानक त्याने सज्ज्यावरून खाली झेप घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी व्यक्त केला आहे. पण नेमकं कारण काय? नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. खरंच प्रेयसीसोबतचा वाद या टोकाच्या निर्णयामागे होता का, की इतर काही कारणं होती, याचा तपास पोलीस करत आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, तरुण आयुष्याचं असं अकाली संपवणं ही समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. नात्यातील मतभेद, मानसिक तणाव आणि भावनिक दबावाचा परिणाम किती भयंकर असू शकतो, हे या घटनेतून स्पष्ट झालं आहे.