Sunday, September 28, 2025

Asia Cup 2025 Final: ट्रॉफीवरून वाद, सूर्यकुमार ट्रॉफी स्वीकारणार का?

Asia Cup 2025 Final: ट्रॉफीवरून वाद, सूर्यकुमार ट्रॉफी स्वीकारणार का?
नवी दिल्ली : आशिया कप २०२५ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. हा महत्त्वाचा सामना दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. ACC अध्यक्ष मोहसिन नकवी विजेता संघाला ट्रॉफी प्रदान करणार आहेत. पण भारतीय संघ मोहसिन नकवींच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार का? "भारताने आशिया कपचा अंतिम सामना जिंकल्यास मोहसीन नकवी यांच्याकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नाही", असं मत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आशियाई क्रिकेट परिषदकडे व्यक्त केलं आहे. सामान्यतः कोणताही क्रिकेट बोर्ड प्रमुख अंतिम सामना पाहण्यासाठी येतोच. परंतु नकवींच्या या सामन्यातील उपस्थितीमुळे नवा वाद सुरु होताना दिसत आहे. नकवी ACC चे अध्यक्ष असून त्यांच्यावर विजेत्या संघाचा सन्मान करण्याची जबाबदारी आहे. तसेच, नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुखही आहेत. त्यामुळे ते ट्रॉफी देताना दोन्ही संघांच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणार आहेत. मात्र, भारतीय संघ सध्या पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याच्या विरोधात भूमिका घेत आहे. त्यामुळे बीसीसीआय आपल्या खेळाडूंना नकवींसोबत हस्तांदोलन करण्याची परवानगी देईल की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बीसीसीआयने या प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिले नसून बीसीसीआयची भूमिका काय असेल याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. पूर्वीच्या सामन्यानंतर पीसीबीने एसीसी अध्यक्ष नकवी यांच्या सांगण्यावरून सामना पंच अँडी पाइक्राफ्ट यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी दोन्ही संघांना एकमेकांचे अभिवादन करण्यापासून रोखले. मात्र, ICC ने हा आरोप फेटाळून लावला आहे. याचबरोबर, मोहसिन नकवी यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर बंदीची मागणी केली होती. सूर्या यांनी आपल्या विजयाचे श्रेय भारतीय सेनेला दिले आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पीडितांप्रती आपली संवेदना व्यक्त केली होती. त्यामुळे नकवी यांना सूर्या विरोधात आक्षेप होता. नकवी यांनी अलीकडेच ‘एक्स’ वर भारतविरोधी पोस्ट्स केल्या होत्या. यामध्ये त्यांनी क्रिस्टियानो रोनाल्डोच्या सेलिब्रेशन स्टाईलचा वापर करून विमान अपघाताचा इशारा दर्शवला होता. हाच इशारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने भारताविरुद्ध दिला होता, ज्यामुळे त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, नकवी ACC अध्यक्ष म्हणून विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करतील. मात्र, भारतीय संघ त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारेल का? बीसीसीआयचा पुढील निर्णय काय असेल? ICC ला यात हस्तक्षेप करावा लागेल का, हे अंतिम सामन्यादरम्यान स्पष्ट होईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा