Saturday, September 27, 2025

आनंदाश्रम

आनंदाश्रम

जीवनगंध : पूनम राणे

साठे बाई वर्गात आल्या. सर्वांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. एका सुरात प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर बाईंनी ‘संवेदनशीलता’ या मूल्यावर माहिती सांगितली. सारी मुले एकाग्रतेने कान देऊन ऐकत होती.

“मुलांनो, आपल्याला एका वृद्धाश्रमात जायचे आहे. विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला. विद्यार्थ्यांनी एका सुरात, “हो बाई चालेल, आम्ही तयार आहोत,” असे म्हणत बाईंचे बोलणे कान देऊन ऐकू लागली.

बाई म्हणाल्या, मी संपूर्ण माहिती मिळवते. आपल्या संस्थापक. मुख्याध्यापकांशी चर्चा करते आणि केव्हा जायचं हे निश्चित करून तुम्हाला सांगते. आपण त्या वृद्धांना काहीतरी भेटवस्तू द्यावी असे मला वाटते. बाई, आम्ही सर्व विद्यार्थी मिळून वर्गणी काढू व जमलेल्या पैशातून भेटवस्तू खरेदी करू. असे वर्ग मॉनिटर अनिकेत म्हणाला. हे ऐकून बाईंनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

आपल्याला बाहेर फिरायला जायला मिळणार तसेच आपल्या आजी-आजोबांसारख्या तेथील आजी-आजोबांनाही पाहायला मिळणार, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळणार, याचा अत्यंत आनंद विद्यार्थ्यांना झाला.

साठे बाईंनी संस्थापक व मुख्याध्यापकांशी बोलून तारीख निश्चित केली. वृद्धाश्रमाचा पत्ता, बसची व्यवस्था, जायला लागणारी वेळ याची चौकशी करून सारेच नियोजन साठे बाईंनी केले.

दुसऱ्याच दिवशी वर्गात जाऊन साठे बाईंनी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या.आपल्याला दोन दिवसांत सकाळी ७ वाजता सहलीला निघायचे आहे. सर्वांनी आपापली तयारी करून वेळेत हजर राहावे.

आपल्या पाल्यांना घेऊन जाण्यासाठी संध्याकाळी शाळेच्या पटांगणात उपस्थित राहावे. अशा सूचना पालकांना देण्यात आल्या. “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष करत

७ वाजता बस निघाली. बाई म्हणाल्या, आपण एक कार्यक्रम वृद्धांच्या मनोरंजनासाठी घेऊया. स्वतःची कला तुम्ही त्यांच्यासमोर सादर करा. गाणे गप्पागोष्टी करत वृद्धाश्रमाचे ठिकाण केव्हा आले हे समजलेच नाही.

विद्यार्थी वृद्धाश्रमाचे निरीक्षण बारकाईने करू लागले. जवळच्याच बागेत खूप पक्षी होते. बसण्याचीही व्यवस्था होती. समोरच चार माळ्याची इमारत होती. तिचे नाव सहवास होते. वृद्धाश्रमाच्या अध्यक्षांनी मुलांचे हसून स्वागत केले. साठे बाई अध्यक्षांना म्हणाल्या, माझे विद्यार्थी आजी -आजोबांची मुलाखत घेणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्यासमोर सादर करणार आहेत आणि आमचे विद्यार्थी त्यांना भेटवस्तू देणार आहेत.

अध्यक्षांना फार आनंद झाला. मी सारी व्यवस्था करतो. शाळेत जशी बेल वाजवतात तशीच बेल कार्यक्रमासाठी वाजवली गेली. अवघ्या दहा मिनिटांत सर्व मंडळी जमा झाली. आमची सर्वांशी ओळख करून दिली. अध्यक्षांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहेत असेही सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच केले. एकपात्री अभिनय, गीतगायन, स्वरचित काव्य वाचन व विनोदी किस्से सांगून विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे मनोरंजन केले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी त्यांना भेटवस्तू दिले सर्वासमक्ष ती भेटवस्तू उघडून पाहिली तर तो कॅरम बोर्ड होता.

विद्यार्थ्यांनी दिलेली भेटवस्तू सर्वांनाच आवडली. यावर जोरदार टाळ्या झाल्या. तेवढ्यात एक आजी उठल्या आणि त्यांनी स्वतःचा परिचय दिला. त्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी लहानपणापासून खूप वाईट परिस्थिती पाहिली होती. त्यांना तीन मुलं होती. ते तिघेही परदेशात राहत होते. पती निधनानंतर त्या या वृद्धाश्रमात राहत होत्या. त्या म्हणाल्या,” तुमच्यासारखी मुले येऊन आम्हाला भेटतात त्यामुळे नातवंड भेटल्याचा आनंद होतो. आम्ही सुद्धा आमच्यातील कला सादर करतो. पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतं.” या समवयस्क परिवारासोबत राहताना आम्हाला खूप मजा येते. खरं म्हणजे हा वृद्धाश्रम नसून आनंदाश्रम आहे.या वाक्यावर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सर्वांचाच परिचय ऐकताना त्यांच्या आयुष्यातील घटना ऐकताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपला.

प्रत्येकाच्या खोलीत जाऊन विद्यार्थ्यांनी मुलाखती घेतल्या. संपूर्ण परिसर फिरून पाहिला. वृद्धाश्रम अत्यंत स्वच्छ आणि सुंदर होता. वृद्धाश्रमात प्रत्येक गोष्टीची सोय होती आणि तिथे वाचनालयाची व्यवस्था केली होती. त्या वृद्धाश्रमात कॅन्टीन होते आणि त्या कॅन्टीनमध्ये घरगुती जेवण मिळत होते. विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था तिथे केली गेली होती. निघायची वेळ झाली. एकमेकांच्या सहवासात राहून आनंदाचे क्षण विद्यार्थी व आजी-आजोबांनी घालवले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांवर प्रेम करण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण होता.

तात्पर्य : दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करावा आणि नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवावी.

Comments
Add Comment