आदिशक्ती जगन्माता

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर


सध्या नवरात्री सुरू आहे. आदिशक्ती जगन्मातेचा उत्सव सुरू आहे. देवीच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना सर्वत्र सुरू आहे.
केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात नवरात्रीच्या निमित्ताने या स्त्रीशक्तीचा जागर केला जातोय. या स्त्री शक्तीची उपासना करण्याचे अनेकविध प्रकार आहेत.... होमहवन, अनुष्ठान, रास-गरबा, जोगवा, भोंडला, जागर....
पण मला जो प्रकार सर्वोत्तम वाटतो तो म्हणजे.....
आपल्या घरातील, शेजारपाजारच्या, ओळखीपाळखीतील, समाजातील प्रत्येक स्त्रीचा योग्य तो सन्मान करणं. तिला कोणत्याही प्रकारची दुय्यम वागणूक न देता आपल्या बरोबरीनं वागवणं. तिची देवी म्हणून पूजा नाही केली तरी चालेल, पण तिला आपल्याहून हलकी मानून पायदळी तुडवू नका. या संगणक युगातही अनेक पुरुष स्त्रीकडे पाहताना केवळ बाई याच दृष्टीनं पाहतात. अद्यापही ‌‘तिला काय कळतंय?‌’ अशाच भावनेनं तिला वागवतात.
काही ठिकाणी तर बाई ही केवळ आणि केवळ उपभोगापुरती आणि उपभोगासाठीच असते. काही ठिकाणी तर तिला केवळ पुरुषाची वासना शमवण्यासाठी आणि वंश वाढवण्याचं एक जिवंत यंत्र असल्यासारखी वागणूक दिली जाते. पण कोणतीही स्त्री ही केवळ बाई नसते... ती परिपूर्ण स्त्री असते. तिला मन असतं. भावना असतात. बुद्धी असते. तिच्या मनाचा, भावनांचा आणि बुद्धीचा योग्य तो आदर राखून सन्मान करणं हीच त्या आदीशक्तीची पूजा असं मी म्हणेन.....
या पूजेनंतर आरती ही हवीच....
म्हणून माझ्या लेखणीतून उतरलेली ही आरती त्या “आदीशक्तीच्या” चरणी अर्पण करतोय.
नवरात्री नऊरात्री उत्सव बहु चाले |
आनंदे उल्हासे मन अमुचे डोले |
प्रसन्नवदना पाहुनि मन प्रसन्न झाले |
दैन्य दुःख क्लेशादी दिगंतरा गेले ॥ १ ॥
जयदेवी जगदंबे विश्वाची जननी |
शरण आम्ही तुज आलो आश्रय दे चरणी ॥ धृ ॥ जयदेवी जयदेवी
रणरागिणी रणचंडी, दैत्यांतक माये |
महाकालीच्या रूपे, सत्वर आता ये |
पद्मवदन तू पद्मा, पद्मासनी राहे |
बहुलावण्या लक्ष्मी, वैभव घेऊनि ये |
बुद्धीची तू दात्री, सरस्वती देवी |
वरदहस्त तू अमुच्या, शिरावरी ठेवी |
आदिशक्ती गे माये, तू विमला विपुला |
तूचि भारतमाता,
तू सुजला सुफला ॥२॥ जयदेवी जयदेवी
काश्मितरातली अंबा, बंगालची काली |
महाराष्ट्री गे माये, भवानी तू झाली |
गुर्जर म्हणती दुर्गा, मुंबईची देवी |
भक्तीभावे तुजला, कोणीही मानावी |
म्हैसुरची चामुंडा,
गोव्याची शांता |
भद्रकालीची कोकण, गातो महंता |
कांचीची कामाक्षी, मदुराईची मीना |
किती किती वर्णावे, बुद्धी चालेना ॥ ३ ॥ जयदेवी जयदेवी
कृष्णाची तू रुक्मिणी, रामाची सीता |
विठूची तू गे रखमा, सूर्याची सविता |
तू शरयू तू गोदा, तू यमुना गंगा |
तू कृष्णा कावेरी, सिंधू चंद्रभागा |
अश्विनि भरणी आदी, नक्षत्रे तूची |
उत्तम उदात्त उन्नत, रुपे तव साची |
गायत्री सावित्री, तू धरणी धात्री |
सुखदा शुभदा वरदा, तू मंगलदात्री ॥ ४ ॥ जयदेवी जयदेवी
तू वाणी तू रसना, नेत्रांतिल ज्योती |
तू चिन्मय चैतन्या, गात्रांतिल शक्ती |
योगिजनांची मुक्ती, मनुजाची प्रगती |
देवांनाही अगम्य, अद्भुत तव महती |
चित्रा शिल्पा कशिदा, कविता सर्व कला |
गुणमंडित ऐश्वर्या, वानिति सर्व तुला |
कलाजननी तू प्रतिभा, सौदामिनी नभिची |
स्त्री शक्ती तू सृजना, माता विश्वाची ॥ ५ ॥ जयदेवी जयदेवी
Comments
Add Comment

अष्टमी: अंतर्मनाचा आरसा

कुठलाही धर्म असो…, कुठलाही पंथ असो… प्रत्येकाने शेवटी सत्, सुंदर आणि अहिंसेचीच शिकवण दिली आहे. कुणी कुर्निसात

प्रश्न आणि उत्तर!

प्रल्हाद जाधव दुपारची निवांत वेळ होती. घरात बसूनच होतो. एक छानसा लेख लिहावा असे मनात आले. पण कोणत्या विषयावर

थोर स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब कालेलकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, ऊर्फ काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसैनिक,

तुम्ही मुलांना घाबरताय का?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नएजर्सच्यां मॅन्युप्युलेटिव्ह वागण्याने तुम्ही घाबरून गेला आहात का? मुलांवर

‘मेरे खयालोके आंगनमें...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी दोनच सिनेमात एकत्र काम केले. ‘आनंद’(१९७१) आणि

राजा शतधनूची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पापी नास्तिक अथवा पाखंडी व्यक्तीच्या सहवासात राहिल्यास अथवा त्याचा